Heart Attack Symptoms: हृदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या धमन्या अचानक पूर्णपणे ब्लॉक झाल्या किंवा त्यातून रक्ताचा प्रवाह खूपच मंद झाला, तर हार्ट अटॅक येऊ शकतो. लोक अनेकदा हार्ट अटॅकच्या लक्षणांबद्दल बोलतात; पण त्यामागील कारणांकडे लक्ष देत नाहीत. हार्ट अटॅक येण्याची कारणं समजून घेतली आणि वेळेत जीवनशैलीत बदल केले, तसेच योग्य उपचार घेतले, तर हार्ट अटॅकचा धोका टाळता येऊ शकतो.

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या माहितीनुसार, काही आजार आणि आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे हार्ट अटॅकचा धोका (Heart Attack Risk) वाढतो. त्यामुळे या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

कोणत्या आजारांमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो?

१. एथेरोस्क्लेरोसिस (धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे)

धमन्यांमधून रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होत नसेल, तर शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पुरेशा प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नाही. शरीराला ऑक्सिजनची गरज जास्त असताना त्याचा पुरवठा कमी झाला, तर रक्ताची गुठळी न बनताही किंवा स्पष्ट ब्लॉकेज नसतानाही हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. या स्थितीला एथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis) म्हणतात. या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते.

२. हाय कोलेस्ट्रॉल

रक्तामध्ये लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं, तसेच ट्रायग्लिसराइड्स आणि एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त झाली, तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये साचून रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करू शकतं.

३. कमी रक्तदाब (लो ब्लड प्रेशर)

कमी रक्तदाबामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे हृदयाला आवश्यक असलेल्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, कमी रक्तदाबामुळे थेट हार्ट अटॅक येतोच असं नाही.

४. उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर)

उच्च रक्तदाबाला हायपरटेन्शन असंही म्हणतात. या समस्येमुळे रक्तवाहिन्यांवर सतत दबाव पडतो आणि त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

५. मधुमेह (डायबिटीज)

हार्वर्डच्या माहितीनुसार, मधुमेह असलेल्या लोकांनाही हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. रक्तातील साखरेचं प्रमाण दीर्घकाळ वाढलेलं राहिल्यास रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं आणि हृदयविकारांचा धोका वाढतो.

या आजारांव्यतिरिक्त, सिगारेट ओढणं, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव किंवा निष्क्रिय जीवनशैली यांमुळेही हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

हार्वर्डच्या माहितीनुसार, धमन्यांमध्ये चरबी आणि इतर पदार्थ साचून अडथळा निर्माण होणं, म्हणजेच एथेरोस्क्लेरोसिस, हे हार्ट अटॅक येण्याचं एक प्रमुख कारण आहे. इतर वैद्यकीय समस्यांमुळेही हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

हार्ट अटॅकच्या वेळी छातीत नेमकं कसं दुखतं?

छातीत दुखणं हे हार्ट अटॅकचं एक सामान्य लक्षण आहे. या वेळी छाती कोणीतरी घट्ट आवळल्यासारखी वाटू शकते. छातीवर जडपणा जाणवतो, दाब आल्यासारखं वाटतं आणि काही वेळा जळजळही होऊ शकते.

छातीच्या मध्यभागी सुरू झालेलं दुखणं बरगड्यांच्या खाली जाणवू शकतं. काही वेळा हा त्रास हात, पोट, मान, घसा आणि जबड्यापर्यंत पसरू शकतो.

हार्ट अटॅकची ही लक्षणंही दिसू शकतात

  • अचानक खूप अशक्तपणा जाणवणे.
  • खूप घाम येणे.
  • मळमळ होणे आणि उलटी येणे.
  • धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.
  • चक्कर येणे.

अनेकदा हार्ट अटॅकच्या वेळी छातीत दुखतं, मळमळ होते किंवा उलटी येते. अशा वेळी काही लोकांना हा त्रास अपचनामुळे होत असल्याचं वाटतं आणि ते त्याकडे दुर्लक्ष करतात.

त्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे घटक असतील, तर अशा लक्षणांकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. छातीत अचानक दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा इतर संशयास्पद लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)