Heart Attack Signs: अनेकांना वाटतं की कोलेस्ट्रॉल म्हणजे शरीराचा शत्रू. पण प्रत्यक्षात समस्या कोलेस्ट्रॉल नसून, चुकीची जीवनशैली आणि इतर कारणांमुळे रक्तातील त्याचं संतुलन बिघडणं ही आहे. रक्तात असणारा हा मेणासारखा पदार्थ शरीरातील पेशी, हार्मोन्स आणि व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी आवश्यक असतो. तो पेशींच्या बाहेरील आवरणाला मजबुती देतो आणि यकृतात (लिव्हरमध्ये) पित्त तयार करून अन्न पचवण्यास मदत करतो.

मात्र, रक्तातील गुड कोलेस्ट्रॉल (एचडीएल) कमी होऊ लागलं आणि बॅड कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढू लागलं, तर ते धोकादायक ठरू शकतं. अनेक लोक बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतानाही सामान्य आयुष्य जगत असतात. पण जेव्हा हे कोलेस्ट्रॉल हळूहळू धमन्यांमध्ये साचू लागतं, तेव्हा हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अलीकडील अभ्यासानुसार, भारतातील ८७.३ टक्के प्रौढांमध्ये लिपिड प्रोफाइलमध्ये बिघाड आढळून आला आहे. लिपिड प्रोफाइल या रक्त तपासणीत कोलेस्ट्रॉलचं मोजमाप केलं जातं.

यातील विशेष बाब म्हणजे सुमारे ३५.५ कोटी लोकांना ना मधुमेह, ना उच्च रक्तदाब, ना लठ्ठपणा असूनही त्यांच्या लिपिड प्रोफाइलमध्ये बिघाड आढळला आहे.

मग वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची काळजी का घ्यावी? फक्त कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्याने हार्ट अटॅक किंवा हृदयविकार टाळता येतो का? कोलेस्ट्रॉल वाढल्यास औषधं कधी सुरू करावीत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.

कोलेस्ट्रॉल सामान्य असलं तरीही धोका असू शकतो

अनेकांना वाटतं की कोलेस्ट्रॉल सामान्य असेल तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका कमी असतो. पण हे पूर्णपणे खरं नाही. अनेक रुग्णांचे लिपिड प्रोफाइल सामान्य असूनही त्यांना हार्ट अटॅक आला आहे.

याचं कारण म्हणजे हार्ट अटॅक फक्त एलडीएल किंवा एकूण कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे होत नाही. धमन्यांमधील सूज, आनुवंशिक कारणं, लिपोप्रोटीन (A), एपोलिपोप्रोटीन (B), उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा आणि कोरोनरी आर्टरीमध्ये कॅल्शियम साचणं यांसारखी अनेक कारणंही यामागे असू शकतात.

म्हणून हृदयविकाराचा धोका ओळखताना फक्त एलडीएल किंवा एकूण कोलेस्ट्रॉल पाहणं पुरेसं नसतं. इतर सर्व जोखीम घटकांचाही विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल, तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि धूम्रपान यांसारख्या सवयींबाबतही जागरूक राहणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने जीवनशैलीत आवश्यक बदल करावेत.

एलपीए (LPA) हा महत्त्वाचा मार्कर

पूर्वी हृदयविकाराचा संबंध मुख्यतः कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाशी जोडला जात होता. पण गेल्या काही वर्षांत लिपोप्रोटीन (A) म्हणजेच LPA हा एक महत्त्वाचा मार्कर मानला जात आहे. रक्तातील हा घटक हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि कमी वयात होणाऱ्या हृदयविकाराचा धोका ओळखण्यास मदत करतो.

एखादी निरोगी व्यक्ती अचानक हार्ट अटॅकची शिकार झाली तर आश्चर्य वाटतं. पण त्यामागे वाढलेलं LPA हेही एक कारण असू शकतं. त्यामुळे धमन्यांना इजा होते आणि त्या कठीण व अरुंद होऊ लागतात. ज्यांच्या शरीरात LPA ची पातळी 50 mg/dL पेक्षा जास्त असते, त्यांना कमी वयातच हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते.

जर तुमच्या कुटुंबात हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा इतिहास असेल, तर कोलेस्ट्रॉल तपासणीसोबतच LPA तपासणीही करून घ्या. त्यामुळे भविष्यात अचानक उद्भवणाऱ्या हृदयाच्या समस्यांपासून बचाव होऊ शकतो.

मुलांमध्येही वाढतोय धोका, तपासणी कधी करावी?

वयाच्या १० ते १२ वर्षांदरम्यान मुलांच्या शरीरातील चयापचय (मेटाबॉलिझम) वेगाने बदलत असतो. जर मुलं पौष्टिक आहार घेत असतील, नियमित खेळत असतील आणि व्यायाम करत असतील, तर त्यांची वाढ चांगली होते.

पण आजकाल मुलांच्या आहारात जंक फूड, पॅकेज्ड स्नॅक्स, गोड पेयं आणि तेलकट-तिखट पदार्थांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे लहान वयातच बॅड कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये साचू लागतं. तासन्तास मोबाईल किंवा संगणकासमोर बसणं, पुरेशी झोप न घेणं, अभ्यास आणि करिअरचा ताण यामुळेही मुलांच्या हृदयावर ताण वाढतो. म्हणून वयाच्या १०व्या वर्षी मुलांची पहिली लिपिड प्रोफाइल तपासणी करून घ्यावी. यामुळे हायपरकोलेस्ट्रोलेमिया आहे का हे समजू शकतं.

कुटुंबात कोलेस्ट्रॉलचा इतिहास असेल तर ही तपासणी आणखी महत्त्वाची ठरते. यानंतर २० व्या वर्षी दुसरी तपासणी, त्यानंतर एक वर्षाने, आणि मग प्रत्येक ४ ते ५ वर्षांनी लिपिड प्रोफाइल तपासणी करून घ्यावी.

लिपिड प्रोफाइल म्हणजे काय?

रक्त तपासणीद्वारे लिपिड प्रोफाइलमध्ये खालील घटक तपासले जातात.

  • एकूण कोलेस्ट्रॉल : रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण.
  • एचडीएल (गुड कोलेस्ट्रॉल) : याचं प्रमाण जितकं जास्त, तितका हृदयविकाराचा धोका कमी. हे धमन्यांमध्ये साचलेलं बॅड कोलेस्ट्रॉल परत लिव्हरमध्ये नेण्याचं काम करतं.
  • एलडीएल (बॅड कोलेस्ट्रॉल) : हे धमन्यांमध्ये साचतं. त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
  • ट्रायग्लिसराइड्स : रक्तातील एक प्रकारची चरबी. याचं प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.

बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं

  • सतत बराच वेळ बसून राहणं
  • चुकीचा आहार
  • नियमित व्यायाम न करणं
  • अपुरी झोप
  • ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन न होणं
  • धूम्रपान आणि मद्यपान

हृदयासाठी चांगल्या सवयी

  • रोज फळं, भाज्या, कडधान्यं आणि संपूर्ण धान्यांचा आहार घ्या.
  • तेलाबरोबरच मीठाचं प्रमाणही कमी ठेवा.
  • वजन नियंत्रणात ठेवा.
  • धूम्रपान करत असाल तर ते कमी करा किंवा पूर्णपणे सोडा.
  • दररोज किमान ३० मिनिटे शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करा.

निरोगी जीवनशैली ठेवा आणि नियमित तपासणी करा

कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा अर्थ तेल किंवा चरबी पूर्णपणे बंद करणं असा नाही. शरीराला चांगल्या चरबीची गरज असते, मात्र तिचं प्रमाण मर्यादित असावं. भारतीयांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल (एलडीएल) आणि एकूण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं. यासोबतच पोटावरची चरबीही जास्त आढळते. यामुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. म्हणून आपण काय खातो याची काळजी घेणं आणि शारीरिक निष्क्रियता कमी करणं आवश्यक आहे.

दररोज व्यायाम केल्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. औषधांची गरज त्या व्यक्तींना असते, ज्यांच्यात जोखीम दर्शवणारे मार्कर्स जास्त असतात. कोलेस्ट्रॉल आणि LPA ची पातळी वाढलेली असल्यास अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. ज्यांचा एलडीएल १६०-१७० च्या आसपास असतो, त्यांना तो कमी करण्याचा सल्ला दिला जातो. जीवनशैलीत बदल करूनही तो कमी झाला नाही, तर औषधांचा पर्याय वापरला जातो. मात्र डॉक्टरांचा पहिला सल्ला नेहमीच जीवनशैली सुधारण्याचा असतो. आपला जोखीम घटक (Risk Factor) नक्की जाणून घ्या. नियमित रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि इतर आवश्यक तपासण्या करा. सावधगिरी हाच सर्वोत्तम बचाव आहे.

डॉ. अशोक सेठ, चेअरमन, फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली

योग्य आहार ठेवा, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील

बेकरी पदार्थ, कुकीज, केक, फ्रोजन पिझ्झा, मठरी, रोल, फ्रेंच फ्राईज, डोनट्स, फ्राईड चिकन यांसारख्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट मोठ्या प्रमाणात असतं. हे ट्रान्स फॅट बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि गुड कोलेस्ट्रॉल कमी करतं. त्यामुळे हृदयविकाराबरोबरच लिव्हरचे आजार, लठ्ठपणा, किडनीचे विकार आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो.

जर तुमच्या आहारात रेड मीट, अंड्याचा पिवळा भाग, फुल क्रीम दूध, तूप, डालडा, वनस्पती तूप आणि सॅच्युरेटेड फॅट जास्त असेल, तर उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका वाढू शकतो. तसेच रेडी-टू-ईट आणि डबाबंद पदार्थांचं सेवनही टाळावं.

डॉ. स्वप्ना चतुर्वेदी, माजी वरिष्ठ आहारतज्ज्ञ, नवी दिल्ली

लक्षात ठेवा, एकूण कोलेस्ट्रॉल २०० mg/dL पेक्षा जास्त असल्यास तो इशारा समजावा. अशा वेळी लगेच आहारात बदल करणं आवश्यक आहे. बॅड कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढण्यामागे चुकीचा आहार हे सर्वात मोठं कारण असतं. गुड कोलेस्ट्रॉल (एचडीएल) वाढवण्यासाठी मोहरीचं तेल, बदाम, कॅनोला तेल आणि राईस ब्रॅन तेल यांसारख्या चांगल्या फॅटचा वापर करावा.

याशिवाय आहारात फायबरचं प्रमाण वाढवा. त्यासाठी ओट्स, ज्वारी, ब्राऊन राईस, क्विनोआ, राजमा, मूगडाळ आणि इतर कडधान्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, संत्री यांसारखी फायबरयुक्त फळं आणि भाज्या खा. मैदा, पांढरा ब्रेड, साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचं सेवन शक्य तितकं कमी करा, कारण ते गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)