Heart Attack symptoms in womans: गेल्या वर्षभरापासून देशात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहेत. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येणे, जो सावरण्याची संधीही देत नाही आणि लोकांचे प्राण घेत आहे. तारुण्यात हृदयविकार होऊन अकाली मृत्यू येणं यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव ही मोठी कारणं असावीत असं तज्ज्ञ सांगतात. आजकाल कमी वयाचे तरुण आणि महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर समस्या बनत चाललीय. ही समस्या आता स्त्रियांमध्येही दिसून येत आहे आणि अनेकदा पुरुषांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे स्त्रियांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण वयाच्या ३५ वर्षांनंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात वाढतो. रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) काळात आणि त्यानंतर स्त्रियांमधील हृदयविकाराचा धोका दुप्पट होतो, त्यामुळे याची लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे; स्त्रियांमधील हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे अनेकदा पुरुषांमधील लक्षणांपेक्षा वेगळी असतात, ज्यामुळे त्याकडे केवळ थकवा, गॅस किंवा तणाव समजून दुर्लक्ष करु नका.
छातीत दुखणे
छातीच्या मध्यभागी वेदना, जडपणा, आवळल्यासारखे वाटणे किंवा दाब जाणवणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. मात्र, स्त्रियांच्या बाबतीत ही वेदना नेहमीच तीव्र नसते आणि त्याऐवजी सौम्य दाब जाणवल्यासारखे वाटू शकते.
श्वास घेण्यास त्रास होणे
जर तुम्हाला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय किंवा जड वस्तू उचलल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा श्वास अपुरा पडत असेल, तर ही आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब असू शकते. अशी लक्षणे कधीकधी हृदयविकाराच्या झटक्याचे (हार्ट अटॅक) संकेत असू शकतात.
थकवा
कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अनेक दिवस असामान्य अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे सुरुवातीचे लक्षण असू शकते, त्यामुळे तुम्ही विश्रांती घ्यावी आणि हा थकवा दूर करण्यावर लक्ष द्यावे; कारण हे लक्षण कधीकधी एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकते.
मळमळ किंवा उलट्या
हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्यास काही महिलांना मळमळणे, उलट्या होणे किंवा पोटात जडपणा जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. अनेकदा या लक्षणांकडे ‘फूड पॉयझनिंग’ किंवा ‘ॲसिडिटी’ समजून दुर्लक्ष केले जाते. जर तुम्हाला सतत अस्वस्थता किंवा त्रास जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
कोणत्या महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो?
याबाबत नेमके सांगणे कठीण आहे, कारण हृदयविकाराचा झटका कोणालाही येऊ शकतो. तरीही संशोधनानुसार उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा लठ्ठपणा असलेल्या महिला; तसेच ज्यांची रजोनिवृत्ती (मेनोपॉज) झाली आहे किंवा ज्या तंबाखूचे सेवन करतात, अशा महिलांना याचा धोका अधिक असू शकतो.
परिस्थिती धोकादायक केव्हा बनू शकते?
जर तुम्हाला दीर्घकाळ छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या; जर वेदना तुमच्या हातापर्यंत, जबड्यापर्यंत, मानेपर्यंत किंवा पाठीपर्यंत पसरत असतील तर परिस्थिती गंभीर आहे हे ओळखा.
