Heart Attack Symptoms in Women: आजकाल हृदयविकाराचा धोका खूप वाढला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता पुरुषांबरोबरच महिलांमध्येही ही समस्या अधिक दिसून येत आहे. त्यामुळे महिलांनीही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

विशेषतः वयाच्या ३५ वर्षांनंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. रजोनिवृत्ती (मेनोपॉज)च्या काळात आणि त्यानंतर महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका दुप्पट होऊ शकतो. त्यामुळे वेळेत त्याची लक्षणे ओळखणे गरजेचे आहे. कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे अनेकदा वेगळी असतात. त्यामुळे ती साधा थकवा, गॅस किंवा तणाव समजून दुर्लक्षित केली जातात.

छातीत दुखणे

छातीच्या मध्यभागी दुखणे, जडपणा जाणवणे, आवळल्यासारखे वाटणे किंवा दाब जाणवणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. मात्र, महिलांमध्ये हे दुखणे नेहमीच खूप तीव्र असेल असे नाही. अनेकदा फक्त हलका दाब जाणवल्यासारखेही वाटू शकते.

श्वास घेण्यास त्रास होणे

कोणतेही काम न करता किंवा जड वस्तू न उचलता श्वास लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ते आरोग्यासाठी चांगले लक्षण नाही. काही वेळा हे हृदयविकाराच्या झटक्याचेही संकेत असू शकतात.

सतत थकवा जाणवणे

कोणतेही ठोस कारण नसताना अनेक दिवस सतत अशक्तपणा किंवा जास्त थकवा जाणवत असेल, तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या आणि थकवा कमी करण्यावर लक्ष द्या. कारण काही वेळा हे लक्षण धोकादायक ठरू शकते.

मळमळ किंवा उलटी होणे

काही महिलांना हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी मळमळ, उलटी किंवा पोटात जडपणा जाणवू शकतो. अनेकदा हे फूड पॉइझनिंग किंवा ॲसिडिटी समजून दुर्लक्षित केले जाते. जर ही समस्या बराच काळ जाणवत असेल, तर एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

कोणत्या महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो?

हे निश्चितपणे सांगता येत नाही, कारण हृदयविकाराचा झटका कोणालाही येऊ शकतो. मात्र, अनेक संशोधनांनुसार उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, रजोनिवृत्तीनंतरचा काळ किंवा तंबाखूचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये हा धोका अधिक असू शकतो.

परिस्थिती कधी गंभीर ठरू शकते?

जर छातीत बराच वेळ दुखत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तातडीने डॉक्टरांकडे जा. तसेच छातीतील वेदना हात, जबडा, मान किंवा पाठीपर्यंत पसरत असतील, तर ही गंभीर परिस्थिती असू शकते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)