Heart Attack Symptoms in Women: महिलांमध्ये हार्ट अटॅक नेहमी टीव्ही किंवा जाहिरातींमध्ये दाखवतात तसा दिसत नाही – म्हणजे अचानक जोरात छातीत दुखणे किंवा लगेच बेशुद्ध पडणे.

खरंतर, महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे खूप हलकी आणि हळूहळू दिसू लागतात, जसे की खूप थकवा जाणवणे, पोटात मळमळ होणे, श्वास घेण्यात त्रास होणे किंवा अस्वस्थ वाटणे. त्यामुळे ही लक्षणे अनेकदा दुर्लक्षित होतात आणि उपचार उशिरा होतात. ही लपलेली चिन्हे ओळखणे आणि वेळेवर डॉक्टरांकडे जाणे खूप महत्त्वाचे आहे.

महिलांमध्ये हार्ट अटॅकची न दिसणारी लक्षणे

हार्ट अटॅक म्हटलं की आपल्या मनात छातीत जोरात दुखण्याचीच कल्पना येते. पण, अनेक महिलांमध्ये अशी लक्षणे नसतात. त्यांच्या शरीरात हार्ट अटॅकचे संकेत खूप हलके असतात.

कार्डियोलॉजिस्ट डॉ. दिमित्री यारानोव सांगतात, “अनेकदा लोक जसा विचार करतात तसा हार्ट अटॅक अनेकदा महिलांमध्ये दिसत नाही. कधी कधी जबड्यात, पाठीत किंवा खांद्यात दुखणे किंवा फक्त थकवा आणि श्वास घेण्याचा त्रास होतो, पण ते याचा संबंध हृदयाशी लावत नाहीत.” त्या म्हणतात, महिलांना ही लक्षणे अनेकदा ताण किंवा कमजोरी वाटते, त्यामुळे त्या ते दुर्लक्षित करतात. पण, हीच लक्षणे हार्ट अटॅकची सुरुवातीची चिन्हे असू शकतात.

‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही सुरुवातीची लक्षणे दिसतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. असं करू नये.

थकवा किंवा कमजोरी

या लक्षणांबद्दल बोलायचे झाले, तर पहिले लक्षण म्हणजे खूप थकवा किंवा कमजोरी. जर कोणतंही भारी काम न करता तुम्ही खूप थकता किंवा आराम केल्यानंतरही कमजोरी वाटत असेल, तर हा हृदयाशी संबंधित इशारा असू शकतो.

धाप लागणे किंवा चक्कर येणा

दुसरे लक्षण म्हणजे धाप लागणे किंवा चक्कर येणे. जर मेहनत न करतादेखील धाप पटकन लागते किंवा अचानक चक्कर येते, तर याला फक्त कमजोरी समजू नका. हे हृदयाला पुरेसे ऑक्सिजन न मिळण्याचे चिन्ह असू शकते.

जबडा, मान, पाठ, खांदा, हात दुखणे

तिसरे लक्षण म्हणजे जबडा, मान, पाठ, खांदा किंवा हात दुखणे. या भागांमध्ये कारण न समजणारी दुखापत किंवा जडपणा जाणवत असेल, तर तेही हृदयाच्या समस्येचे संकेत असू शकतात.

पोटात जडपणा किंवा जळजळ

पोटात जडपणा, जळजळ जाणवणे हे चौथे लक्षण असू शकते. जर पोटात जळजळ, मळमळ, उलटीसारखे किंवा अपचनासारखे वाटत असेल तर ते फक्त गॅस किंवा अॅसिडिटी आहे असे समजू नका, अशी लक्षणे अनेकदा हार्ट अटॅकच्या वेळीही दिसू शकतात.

घाम येणे किंवा बेचैन वाटणे

पाचवे लक्षण म्हणजे घाम येणे किंवा बेचैन वाटणे. अचानक घाम येणे, त्वचा चिकट होणे किंवा कारण नसताना घाबरल्यासारखे वाटणे- हेही हार्ट अटॅकचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.

झोप नीट न लागणे

याशिवाय अजून एक लक्षण म्हणजे झोप नीट न लागणे किंवा बेचैन झोप. जर रात्री वारंवार जाग येत असेल किंवा पूर्ण झोप झाल्यावरही थकवा जाणवत असेल तर हेही शरीर सांगत असलेले संकेत असू शकतात की काहीतरी बरोबर नाही.

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?

अनेक वेळा महिलांना सायलेंट हार्ट अटॅक होतो, म्हणजे असा हार्ट अटॅक ज्यात मोठे किंवा स्पष्ट लक्षण दिसत नाहीत. लोक याला फक्त थकवा, अपचन किंवा ताण समजून दुर्लक्ष करतात. पण, नंतर तपासणी केली असता कळते की हृदयाला नुकसान झालेले असते.

महिलांमध्ये लक्षणे वेगळी का असतात?

महिलांच्या शरीरातील बदल आणि हार्मोन्समुळे त्यांची लक्षणे वेगळी दिसू शकतात. अनेकदा ब्लॉकेज नसतानाही हृदयाच्या छोट्या नसांवर परिणाम होतो, त्यामुळे दुखणे किंवा जडपणा जाणवतो. काही वेळा स्पॉन्टेनियस कोरोनरी आर्टरी डिसेक्शन ही स्थिती कारण ठरते, विशेषतः तरुण मुलींमध्ये किंवा प्रसूतीनंतरच्या महिलांमध्ये. याशिवाय अनेकदा डॉक्टरही महिलांच्या लक्षणांना ताण, गॅस किंवा सामान्य त्रास समजून दुर्लक्ष करतात, यालाच “Yentl Syndrome” असे म्हणतात.