Heart Attack What to Do When Alone: कल्पना करा… घरात तुम्ही एकटे आहात आणि अचानक छातीत दडपण जाणवू लागलं. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, अंगाला थंड घाम फुटला, चक्कर आली किंवा अचानक अशक्तपणा जाणवू लागला. अशा वेळी घाबरून जाणे सहाजिक आहे. पण, याच क्षणी घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. कारण हृदयविकाराचा झटका ही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती आहे आणि अशा वेळी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते.

अशा परिस्थितीत एकटे असल्यास काय करावे, याबाबत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुगंधा शर्मा यांनी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून काही सूचना दिल्या आहेत. मात्र, सोशल मीडियावरील कोणताही वैद्यकीय सल्ला प्रत्येक व्यक्तीला तंतोतंत लागू होईलच असे नाही. हृदयविकाराचा संशय आल्यास तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे.

१. सर्वांत आधी वैद्यकीय मदत घ्या

हृदयविकाराचा झटका आल्याची शंका वाटत असेल तर सर्वप्रथम आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी फोन करा. तुम्ही एकटे असाल तर स्वतः वाहन चालवून रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करू नका. भारतात ११२ हा एकात्मिक आपत्कालीन क्रमांक आहे. त्याचबरोबर जवळच्या नातेवाईकाला किंवा विश्वासू व्यक्तीलाही फोन करून तुम्ही एकटे असल्याची माहिती द्या.

डॉ. सुगंधा शर्मा यांच्या मते, ‘अशा वेळी सर्वांत पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे तातडीने वैद्यकीय मदत घेणं. स्वतः वाहन चालवण्याऐवजी आपत्कालीन सेवेशी संपर्क साधा.’

२. अॅस्पिरिनबाबत घाईने निर्णय घेऊ नका

मूळ पोस्टमध्ये हृदयविकाराच्या लक्षणांदरम्यान अॅस्पिरिनची गोळी चावून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, अॅस्पिरिन प्रत्येक व्यक्तीसाठी सुरक्षित किंवा योग्य असेलच असे नाही. अॅस्पिरिनची अॅलर्जी, रक्तस्रावाचा धोका, काही औषधे किंवा इतर आरोग्यविषयक कारणांमुळे ते टाळावे लागू शकते, त्यामुळे स्वतःहून औषध घेण्यापेक्षा आपत्कालीन वैद्यकीय सेवा किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसारच पुढील निर्णय घेणे सुरक्षित ठरते. विशेषतः हृदयविकाराचा संशय असल्यास औषध घेण्याच्या प्रयत्नात वैद्यकीय मदत घेण्यास विलंब होऊ देऊ नका.

सॉर्बिट्रेटची गोळी स्वतःहून घेऊ नका

छातीत दुखू लागल्यावर काही जण सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवतात. मात्र, ही औषधे रक्तवाहिन्या रुंद करण्याचे काम करतात आणि त्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. रक्तदाब आधीच कमी असल्यास चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे डॉक्टरांनी आधीपासून सांगितल्याशिवाय किंवा वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनेशिवाय अशी औषधे स्वतःहून घेणे टाळावे.

३. धावपळ करू नका; शांत राहण्याचा प्रयत्न करा

अचानक छातीत दुखू लागल्यावर घाबरून घरात धावपळ करणे किंवा स्वतः वाहन घेऊन रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करणे टाळा. अशा वेळी शरीरावर अतिरिक्त ताण पडू शकतो.

डॉ. सुगंधा शर्मा यांच्या पोस्टनुसार, ‘हृदयविकाराच्या संशयाच्या परिस्थितीत स्वतःला जास्त थकवू नका, धावपळ केल्याने शरीराची ऑक्सिजनची गरज वाढू शकते आणि हृदयावरचा ताणही वाढू शकतो.’

मदत येईपर्यंत सुरक्षित ठिकाणी बसा आणि शक्य तितकी हालचाल कमी करा.

हृदयविकाराचा झटका ओळखण्याची ‘ही’ लक्षणे लक्षात ठेवा

हृदयविकाराचा झटका प्रत्येक व्यक्तीमध्ये एकसारख्या पद्धतीने जाणवेलच असे नाही. मात्र, पुढील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये-

  • छातीत दडपण, घट्टपणा, जडपणा किंवा वेदना होणे.
  • वेदना खांदा, हात, पाठ, मान किंवा जबड्यापर्यंत जाणे.
  • श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वास जड होणे.
  • अचानक थंड घाम फुटणे.
  • चक्कर येणे किंवा अचानक अशक्तपणा जाणवणे.
  • मळमळणे किंवा उलटी होणे.
  • अचानक खूप थकवा किंवा अस्वस्थता जाणवणे.

ही लक्षणे गॅस, अॅसिडिटी किंवा इतर कारणांमुळेही होऊ शकतात. मात्र, घरच्या घरी त्याचे नेमके कारण ठरवण्याचा प्रयत्न करून वेळ घालवणे धोकादायक ठरू शकते. हृदयविकाराचा संशय असेल तर लक्षणे कमी होण्याची वाट न पाहता तातडीने वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.

(महत्त्वाची सूचना : ही माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. त्यातील औषधांशी संबंधित सूचना प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य असतीलच असे नाही. हृदयविकाराची लक्षणे जाणवल्यास तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. हा लेख वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही.)