Heart Attack vs Heart Failure Difference : आपण जेव्हा ‘हार्ट अटॅक’ हा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्याला परिस्थितीचे गंभीर स्वरूप लगेच समजते. मात्र, ‘हार्ट फेल्युअर’बद्दल लोकांमध्ये अजूनही खूप गैरसमज आहेत. नावावरून जरी वेगळा अर्थ निघत असला, तरी याचा अर्थ असा अजिबात नाही की हृदयाने पूर्णपणे काम करणे बंद केले आहे. तसेच ही स्थिती हार्ट अटॅकसारखी अचानक येणारी नसते.
हार्ट फेल्युअर म्हणजे शरीराच्या गरजेनुसार आवश्यक प्रमाणात रक्त पुरवठा करण्यास हृदय असमर्थ ठरणे; तर दुसरीकडे, जेव्हा हृदयाच्या एखाद्या भागापर्यंत पोहोचणारा रक्तप्रवाह अचानक अडकतो किंवा ब्लॉक होतो, तेव्हा त्याला हार्ट अटॅक म्हणतात. हा फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण हार्ट फेल्युअरची समस्या एकाकी उद्भवत नसून ती हळूहळू आणि वेळेनुसार वाढते. अनेकदा याच्या सुरुवातीच्या लक्षणांना सामान्य थकवा किंवा इतर आरोग्याची समस्या समजून दुर्लक्ष केले जाते.
शरीरावर कसा होतो दोन्हीचा वेगवेगळा परिणाम?
इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रजनीश कपूर यांच्या मते, हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हार्ट अटॅक येतो, तर हार्ट फेल्युअर ही एक दीर्घकालीन आरोग्य समस्या (क्रॉनिक कंडिशन) आहे. यामध्ये हृदय शरीराच्या गरजेनुसार प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही. याचा अर्थ हृदयाचे ठोके अचानक थांबले असा होत नाही.
या दोन्ही समस्या एकमेकांशी जोडलेल्या असू शकतात. हार्ट अटॅकमुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान पोहोचू शकते, ज्यामुळे पुढे जाऊन काही रुग्णांमध्ये हार्ट फेल्युअरचा धोका निर्माण होतो. मात्र, हार्ट फेल्युअर होण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये हृदयाला कमकुवत करणाऱ्या विविध आजारांचा समावेश आहे, त्यामुळे प्रत्येक हार्ट फेल्युअरच्या रुग्णाला आधी हार्ट अटॅक आलेलाच असेल असे आवश्यक नाही.
भारताच्या संदर्भात हा फरक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. एका अंदाजानुसार, देशात सुमारे ८० लाख ते १ कोटी लोक हार्ट फेल्युअरच्या समस्येसह जगत आहेत. जगात हार्ट फेल्युअर रुग्णांची सर्वांत जास्त संख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. तरीही सुरुवातीच्या टप्प्यात ही समस्या ओळखणे कठीण जाते; कारण याची लक्षणे सामान्य थकवा किंवा इतर आजारांसारखीच दिसतात.
लक्षणे कमी झाली तरी बिघडू शकते स्थिती
हार्ट फेल्युअर हा दीर्घकाळ राहणारा आजार आहे. यामध्ये काही काळ रुग्णाची प्रकृती स्थिर राहू शकते, परंतु अचानक ही स्थिती बिघडण्याचा टप्पाही येऊ शकतो. उपचारानंतर लक्षणे काही प्रमाणात कमी होऊ शकतात, पण आजार पूर्णपणे निघून जात नाही, म्हणूनच नियमित वैद्यकीय तपासणी आणि सतत काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.
परिस्थिती बिघडल्यास याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. एका अभ्यासानुसार, हार्ट फेल्युअरमुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी सुमारे ३० टक्के रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर एका वर्षाच्या आत पुन्हा रुग्णालयात भरती व्हावे लागले. रुग्णालयात पुन्हा दाखल व्हावे लागणाऱ्या रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका इतर रुग्णांपेक्षा तब्बल सहा पटीने जास्त असल्याचे आढळून आले आहे.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते: रुग्णालयातून सुट्टी मिळाली किंवा लक्षणे कमी झाली तरी उपचार आणि काळजी थांबवणे योग्य नाही.
अशी लक्षणे सहज होतात दुर्लक्षित
हार्ट फेल्युअर वेळेवर ओळखण्यासाठी त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. धाप लागणे, सतत थकवा जाणवणे, घोट्यांवर सूज येणे आणि शारीरिक काम करण्याची क्षमता कमी होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. या बदलांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. एखादे काम करताना अचानक जास्त धाप लागल्यास लोक त्याला शारीरिक फिटनेसची कमतरता मानतात, तर सतत येणाऱ्या थकव्याला व्यस्त दिनचर्येचे कारण मानले जाते.
म्हणूनच आपल्या दैनंदिन शारीरिक क्षमतेत होणाऱ्या बदलांवर बारकाईने लक्ष दिले पाहिजे. जर एका मजल्याच्या पायऱ्या चढताना अचानक थांबून श्वास घ्यावा लागत असेल, नेहमीचे चालणे पूर्वीपेक्षा जास्त थकवणारे वाटत असेल किंवा पायाच्या घोट्यांवर सूज दिसत असेल तर या गोष्टींना वाढते वय किंवा सामान्य थकवा समजून सोडून देऊ नका.
ही लक्षणे जर सतत जाणवत असतील किंवा वेळेनुसार वाढत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी निदान झाल्यास हार्ट फेल्युअरवर नियंत्रण मिळवता येते आणि आजाराचा वेग मंदावता येतो.
बरे वाटणे म्हणजे धोक्यापासून सुटका नाही
हार्ट फेल्युअरच्या उपचारांमध्ये आता मोठी सुधारणा झाली आहे. मात्र, रुग्णाची स्थिती स्थिर वाटत असली तरी धोका पूर्णपणे टळलेला नसतो. क्रॉनिक हार्ट फेल्युअर असणाऱ्या लोकांसाठी लक्षणे कमी होणे ही दिलासादायक बाब असली तरी नियमित तपासणी सुरू ठेवणे तितकेच गरजेचे आहे.
डॉक्टरांच्या नियमित संपर्कात राहिल्याने रुग्णाची स्थिती खरंच स्थिर आहे की नाही हे समजायला मदत होते. यामुळे परिस्थिती बिघडण्याचे सुरुवातीचे संकेत ओळखता येतात आणि सध्या सुरू असलेले उपचार योग्य आहेत की त्यात बदलाची गरज आहे हे ठरवता येते.
संशोधनानुसार, नियमित उपचार सुरू असतानाही दर ७ पैकी एका रुग्णाला १८ महिन्यांच्या आत पुन्हा रुग्णालयात भरती व्हावे लागण्याचा किंवा गंभीर धोक्याचा सामना करावा लागतो, म्हणूनच परिस्थिती नियंत्रणात वाटत असली तरी सतत काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य उपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नव्या वैद्यकीय पद्धतींचा वापर केल्यास हार्ट फेल्युअर नियंत्रित ठेवता येते आणि भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात.
