Heart blockage treatment : आजच्या काळात हृदयविकार सर्व वयोगटांतील लोकांना ग्रासत आहे. पूर्वी ६० वर्षांच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येणे सामान्य होते; पण आज ३०-३५ वयोगटातील तरुणसुद्धा छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या तक्रारी घेऊन रुग्णालयात येत आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तपासणी अहवालात हृदयाच्या धमन्यांमध्ये ७० किंवा ८० टक्के अडथळा असल्याचे उघड होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब हादरून जाते. लाखो रुपये खर्च करून बायपास शस्त्रक्रिया करावी लागेल आणि रुग्ण पूर्वीसारखा बरा होईल की नाही, ही मुख्य भीती कुटुंबीयांच्या मनात निर्माण होते. या भीतीचा गैरफायदा घेऊन, इंटरनेट आणि सोशल मीडियावर विविध दावे पसरवले जात आहेत. काही जण दावा करतात की, लसूण-आल्याचा काढा प्यायल्याने तुमच्या रक्तवाहिन्या लोण्यासारख्या स्वच्छ होतील; तर काही जण रक्तवाहिन्यांमधील अडथळे विरघळवणाऱ्या एका चमत्कारी पावडरचे वचन देतात. पण, मोठ्या शस्त्रक्रियेशिवाय हृदयातील अडथळे खरोखरच बरे होऊ शकतात का? चला, या प्रकरणातील सत्य सोप्या भाषेत समजून घेऊया…
हृदयातील अडथळा नेमका काय असतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा का येतो?
आपल्या हृदयाचे काम संपूर्ण शरीरात शुद्ध रक्त पंप करणे आहे. तथापि, हृदयाच्या स्नायूंना योग्यरीत्या कार्य करण्यासाठी रक्त आणि ऑक्सिजनचा सतत पुरवठा आवश्यक असतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या या विशेष नळ्यांना कोरोनरी धमन्या, असे म्हणतात. जेव्हा आपल्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL), ट्रायग्लिसराइड्स आणि चरबीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते, तेव्हा हे त्रासदायी घटक हळूहळू आपल्या धमन्यांच्या आतील भिंतींना चिकटू लागतात. कालांतराने, हा साचलेला थर कठीण होतो, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘प्लाक’, असे म्हणतात. जसा प्लाक जमा होतो, तसा रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह अरुंद होतो. जेव्हा रक्तपुरवठा कमी होतो, तेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. या अडथळ्याला सामान्यतः ‘हार्ट ब्लॉकेज’, असे म्हणतात.
शरीरात अडथळा असल्याची लक्षणे कोणती?
- सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णाला अनेकदा कोणतीही लक्षणीय अस्वस्थता जाणवत नाही, ज्याला ‘सायलेंट ब्लॉकेज’, असेही म्हणतात. तथापि, जसा अडथळा वाढत जातो, तसे शरीर स्पष्ट संकेत देऊ लागते.वेगाने चालताना, पायऱ्या चढताना किंवा जड वस्तू उचलताना छातीच्या मध्यभागी जडपणा, दाब किंवा जळजळ जाणवणे.
- थोडे चालल्यानंतर धाप लागणे आणि फुप्फुसांमध्ये हवा कमी झाल्यासारखे वाटणे.
- कोणतेही जड काम न करताही सतत सुस्ती आणि प्रचंड थकवा जाणवतो.
- छातीतील वेदना हळूहळू डाव्या हाता, खांद्याकडे, मानेकडे, जबड्याकडे किंवा पाठीकडे पसरते.
- कपाळावर अचानक थंड घाम येणे, सोबतच अस्वस्थता आणि चक्कर येणे.
शस्त्रक्रियेशिवाय हृदयविकाराच्या उपचारांमागील सत्य आणि सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यांविषयी जाणून घेण्यासाठी, आम्ही शारदाकेअर – हेल्थसिटी येथील हृदयरोग विभागाचे संचालक व प्रमुख डॉ. विवेक टंडन यांच्याशी संवाद साधला.डॉ. विवेक टंडन स्पष्ट करतात की, हार्ट ब्लॉकेज ही एक गंभीर स्थिती आहे, ज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्या कोलेस्ट्रॉल, चरबी आणि इतर पदार्थांच्या साठ्यामुळे अरुंद होतात. त्यामुळे हृदयाला होणाऱ्या रक्त आणि ऑक्सिजनच्या प्रवाहात अडथळा येतो. रुग्णांना छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा दैनंदिन कामे करण्यात लक्षणीय अडचण येणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात; मात्र काही प्रकरणांमध्ये कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नाहीत.
डॉ. टंडन स्पष्ट करतात की, रक्तवाहिनीतील अडथळ्याच्या प्रत्येक रुग्णाला ओपन-हार्ट किंवा बायपास शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते. उपचाराचे निर्णय अडथळ्याची व्याप्ती, रक्तवाहिनीचा नेमका कोणता भाग आहे, रुग्णाची लक्षणे आणि त्याचे एकूण आरोग्य यांंवर अवलंबून असतात. सुरुवातीच्या किंवा स्थिर प्रकरणांमध्ये, डॉक्टर सामान्यतः औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे स्थिती नियंत्रणात आणू शकतात.
कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधे (जसे की स्टॅटिन्स), रक्तदाबाची औषधे व मधुमेहाची औषधे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी करतात. तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की, ही औषधे जुने, कठीण झालेले अडथळे पूर्णपणे विरघळवू शकत नाहीत; त्याऐवजी ती नवीन अडथळे तयार होण्यापासून रोखतात आणि रक्तवाहिनी अचानक फुटू नये म्हणून अस्तित्वात असलेला प्लाक स्थिर करतात.
अँजिओप्लास्टी: छातीवर छेद न देता, रक्तवाहिनी उघडण्याची एक आधुनिक पद्धत
जर रुग्णाला गंभीर अडथळा असेल किंवा औषधांनी छातीतील वेदना कमी होत नसतील, तर अँजिओप्लास्टी हा एक अतिशय प्रभावी पर्याय ठरतो. बरेच लोक अँजिओप्लास्टीला ओपन-हार्ट सर्जरी समजतात; पण ती तशी नाही. ही एक कमीत कमी आक्रमक प्रक्रिया आहे.त्यामध्ये रुग्णाच्या मनगटातील (हातामधील) किंवा मांडीतील (पायातील) एका लहान शिरेमधून एक अत्यंत पातळ कॅथेटर ट्यूब हृदयातील बंद झालेल्या शिरेपर्यंत पोहोचवली जाते. त्यानंतर त्या अरुंद भागात एक छोटा वैद्यकीय फुगा फुगवला जातो, ज्यामुळे साठलेला प्लाक भिंतींच्या दिशेने दाबला जातो आणि रक्ताचा मार्ग मोकळा होतो. रक्तवाहिनी पुन्हा आकुंचन पावू नये म्हणून तिथे एक बारीक जाळीची स्प्रिंग म्हणजेच स्टेंट बसवला जातो. या प्रक्रियेसाठी मोठी शस्त्रक्रिया किंवा आठवडाभर रुग्णालयात राहण्याची आवश्यकता नसते. एक-दोन दिवसांत रुग्ण स्वतःच्या पायांवर चालत घरी जाऊ शकतो. तथापि, डॉ. टंडन यांच्या मते, प्रत्येक रुग्णाला अँजिओप्लास्टीची आवश्यकता नसते. डॉक्टर अँजिओग्राफीच्या निकालांच्या आधारे याबाबतचा निर्णय घेतात.
घरगुती पेये आणि चमत्कारी पेयांबद्दलचे सत्य
आजकाल इंटरनेटवर ही बातमी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे की, आले, लसूण, लिंबाचा रस आणि सफरचंद सायडर व्हिनेगर एकत्र उकळून प्यायल्याने हृदयाच्या सर्व बंद झालेल्या रक्तवाहिन्या आपोआप मोकळ्या होतात.
डॉ. विवेक टंडन यांनी असा ठाम इशारा दिला आहे की, कोणताही घरगुती उपाय, डिटॉक्स पेय किंवा आहारपुरके हृदयाच्या बंद झालेल्या रक्तवाहिन्या उघडू शकतात, याचा कोणताही वैज्ञानिक किंवा वैद्यकीय पुरावा नाही.
लसूण किंवा आल्याचे पाणी प्यायल्याने रक्त थोडे पातळ होऊ शकते किंवा पचनक्रिया सुधारू शकते; परंतु त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचलेला ८० टक्के कठीण थर धुऊन निघून जाईल, हा निव्वळ एक भ्रम आहे.
अशा उपायांमुळे तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेली रक्त पातळ करणारी किंवा कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधे घेणे कधीही थांबवू नका. औषध अचानक थांबवल्यास रक्तवाहिनीमध्ये रक्ताची मोठी गुठळी तयार होऊ शकते, ज्यामुळे तीव्र हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
तुमच्या हृदयाला सुरक्षित ठेवणारे जीवनशैलीतील ५ बदल
जर तुमचा अडथळा सुरुवातीच्या टप्प्यात असेल किंवा तुम्हाला भविष्यात हा आजार टाळायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये काही आवश्यक बदल करावे लागतील.
१. तुमच्या आहारातून चरबीचे प्रमाण कमी करा: रिफाईंड तेल, डालडा, लोणी आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळा. त्याऐवजी, हिरव्या भाज्या, ताजी हंगामी फळे, संपूर्ण धान्य, ओट्स व जवस यांचा आहारात समावेश करा.
२. दररोज ३० मिनिटे चालणे: जोपर्यंत तुमचे डॉक्टर वेगळा सल्ला देत नाहीत, तोपर्यंत दररोज किमान अर्धा तास वेगाने चाला. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या लवचिक राहतात आणि रक्ताभिसरण सुधारते.
३. तंबाखू आणि सिगारेट सोडा: धूम्रपानामुळे हृदयाच्या धमन्यांच्या आतील भिंतींना थेट इजा पोहोचते, ज्यामुळे वेगाने रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. तुम्ही विडी, सिगारेट किंवा गुटखा ओढणे ताबडतोब सोडून दिले पाहिजे.
४. रक्तदाब आणि साखरेच्या पातळीवर कडक नजर ठेवा: मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे हृदयाचे सर्वांत मोठे शत्रू आहेत. तुमची औषधे नियमितपणे घ्या आणि तपासणीही नियमितपणे करीत राहा.
५. तणाव कमी करा आणि पुरेशी झोप घ्या: सततच्या चिंतेमुळे शरीरातील तणाव संप्रेरके वाढतात, ज्यामुळे नसा आकुंचन पावतात. दररोज सात ते आठ तास गाढ झोप घेण्याचे ध्येय ठेवा आणि मन शांत करण्यासाठी ध्यान किंवा योगाभ्यास करा.
आणीबाणीच्या प्रसंगी कधीही विलंब करू नका
हृदयविकारात सर्वांत मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. जर एखाद्या व्यक्तीला अचानक छातीच्या मध्यभागी असह्य वेदना, तीव्र दाब, तीव्र धाप लागणे, थंड घाम येणे किंवा डाव्या हातापर्यंत आणि जबड्यापर्यंत वेदना पसरत असल्याचे जाणवत असेल,तर त्याकडे गॅसमुळे होणारी वेदना समजून घरगुती उपाय करण्यात वेळ दवडू नका. ते हृदयविकाराच्या झटक्याचेही लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, तातडीने रुग्णाला हृदयरोग आणि आयसीयू सुविधा असलेल्या जवळच्या आपत्कालीन रुग्णालयात घेऊन जा. केवळ योग्य डॉक्टरांचा वेळेवर मिळालेला सल्ला आणि योग्य ते उपचारच व्यक्तीचा जीव वाचवू शकतात.
