Heart Disease Signs: आपल्यापैकी बहुतेक जण डोळ्यांची तपासणी तेव्हाच करतात, जेव्हा दिसण्यात अडचण येते किंवा चष्म्याचा नंबर वाढतो. पण तुम्हाला माहिती आहे का, डोळे फक्त पाहण्यासाठीच नसतात, तर ते शरीराच्या आतल्या आरोग्याचेही संकेत देतात? डोळ्याच्या मागील बाजूस असलेल्या रेटिनामध्ये अतिशय बारीक रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्यांमुळे शरीरातील इतर भागांची, विशेषतः हृदय आणि रक्ताभिसरण प्रणालीची स्थिती समजू शकते.
शार्प साइट आय हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मझहर नाझिम खान यांनी आमचे सहयोगी न्यूज18 इंग्रजीला सांगितले की, डोळे हे शरीरातील रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचे आरसे असतात. रेटिनामध्ये काही बदल दिसत असतील, तर ते उच्च रक्तदाब किंवा इतर रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतात. मात्र, केवळ डोळ्यांची तपासणी करून हृदयविकाराचे निदान करता येत नाही. पण काही संकेत असे असतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.
डोळ्यांमध्ये दिसणारे हृदयविकाराचे संकेत
अचानक दिसणे धूसर होऊ लागले किंवा वस्तू नेहमीपेक्षा वेगळ्या दिसू लागल्या, तर ते फक्त डोळ्यांचा त्रास समजून दुर्लक्ष करू नका. अनेकदा रेटिनापर्यंत रक्ताचा पुरवठा नीट न झाल्यासही असे होऊ शकते.
वय वाढल्यानंतर डोळ्यांसमोर लहान-लहान ठिपके किंवा फ्लोटर्स दिसणे सामान्य आहे. पण अचानक त्यांची संख्या वाढू लागली, चमकदार प्रकाशाचे फ्लॅश दिसू लागले किंवा डोळ्यांसमोर पडद्यासारखी सावली येऊ लागली, तर तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
डोळ्यांची तपासणी करताना डॉक्टरांना रेटिनामध्ये लहान-लहान रक्ताचे डाग दिसू शकतात. हे मधुमेह किंवा दीर्घकाळ वाढलेल्या उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. जरी हे थेट हृदयविकाराचे प्रमाण नसले, तरी पुढील तपासणीची गरज असल्याचे ते दर्शवू शकते.
दीर्घकाळ उच्च रक्तदाब राहिल्यास रेटिनामधील रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात. हा बदल व्यक्तीला स्वतःला दिसत नाही, पण डोळ्यांच्या तपासणीत तो लक्षात येऊ शकतो.
एका डोळ्याची दृष्टी अचानक कमी झाली किंवा पूर्णपणे दिसेनाशी झाली, तर ही वैद्यकीय आणीबाणीची स्थिती असू शकते. अशावेळी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे, कारण हे रक्तप्रवाहात गंभीर अडथळा निर्माण झाल्याचे लक्षण असू शकते.
डोळ्यांचा त्रास म्हणजे हृदयविकारच असतो का?
प्रत्येक डोळ्यांच्या समस्येचा संबंध हृदयविकाराशी असतोच असे नाही. धूसर दिसणे, फ्लोटर्स दिसणे किंवा रेटिनामध्ये बदल होण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. मात्र, हे संकेत शरीरातील रक्तवाहिन्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती देऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांच्या तपासणीत असे बदल आढळल्यास रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करून घेणे फायदेशीर ठरू शकते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
