Heart failure warning sign: हार्ट फेल्युअर म्हणजे अशी अवस्था आहे की ज्या वेळी हृदयाच्या स्नायूंना शरीरात रक्त नीट पंप करता येत नाही. असे झाल्यावर रक्ताचा प्रवाह मंदावतो आणि शरीरात पाणी (द्रव) साचू लागते. कधी कधी हे पाणी फुफ्फुसांमध्येही साचते, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तज्ञांच्या मते, शरीरात काही असे संकेत दिसतात ज्यावरून हृदयाची तब्येत ठीक नाही हे ओळखता येते. त्यापैकी एक कमी लक्षात येणारा पण महत्त्वाचा संकेत म्हणजे टाचांमध्ये आणि पायांमध्ये येणारी सूज. चला तर मग, याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

हार्ट फेल्युअरचे संकेत काय असतात?

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, जर टाचा किंवा पाय वारंवार सुजत असतील तर ते हार्ट फेल्युअरचे लक्षण असू शकते. या अवस्थेला वैद्यकीय भाषेत “एडीमा” असे म्हणतात. एडीमा तेव्हा होतो जेव्हा शरीराच्या ऊतींमध्ये पाणी (द्रव) साचायला लागते. ही सूज शरीराच्या अनेक भागांमध्ये येऊ शकते, पण जास्त करून पाय आणि टाचांमध्ये दिसते. काही लोकांमध्ये सकाळी ही सूज थोडी कमी असते, पण दिवस जसजसा पुढे जातो तशी ती वाढत जाते.

असं का होतं तर, जेव्हा हृदय रक्त नीट पंप करू शकत नाही, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये दाब वाढतो. त्यामुळे द्रव पदार्थ नसांमधून बाहेर येऊन आसपासच्या ऊतींमध्ये साचतो आणि त्यामुळे सूज दिसू लागते.

याची लक्षणे काय असतात?

हेल्थविषयक माहिती देणाऱ्या मायो क्लिनिकच्या मते, एडीमाची लक्षणे म्हणजे टाचा, पाय किंवा पायांच्या खालच्या भागात सूज येणे, त्वचा ताणलेली किंवा चमकदार दिसणे, दाब दिल्यावर त्वचेत खड्डा पडणे, तसेच वेदना किंवा जडपणा जाणवणे अशी असू शकतात.

मात्र, सूज येण्याचे कारण नेहमी हार्ट फेल्युअरच असते असे नाही. बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे किंवा उभे राहणे, जास्त मीठ खाणे, लठ्ठपणा, गर्भावस्था, काही औषधांचा वापर, दुखापत, किडनी किंवा लिव्हरचे आजार, रक्ताची गाठ (ब्लड क्लॉट) किंवा इन्फेक्शन यामुळेही सूज येऊ शकते.

जर हार्ट फेल्युअरबद्दल बोलायचं झालं, तर यासोबत इतर काही लक्षणेही दिसू शकतात. यात श्वास लागणे, थोडंसं काम केलं तरी पटकन थकवा येणे, पाय आणि टाचांमध्ये सतत सूज राहणे, हृदयाचे ठोके जलद किंवा अनियमित होणे, व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे, छातीत घरघर होणे, खूप दिवस खोकला राहणे, पोटात सूज येणे, अचानक वजन वाढणे, मळमळ होणे, भूक कमी लागणे आणि लक्ष केंद्रित करण्यास अडचण येणे यांचा समावेश होतो. काही वेळा छातीत दुखणेही होऊ शकते, विशेषतः हार्ट अटॅकची शक्यता असल्यास.

कोणाला जास्त धोका असतो?

हार्ट फेल्युअरचा धोका काही लोकांमध्ये जास्त असतो. ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक, धूम्रपान किंवा मद्यपान करणारे, कमी शारीरिक हालचाल करणारे, जास्त मीठ आणि तेलकट (फॅट) अन्न खाणारे, उच्च रक्तदाब असलेले, कोरोनरी आर्टरीचा आजार असलेले किंवा कुटुंबात हार्ट फेल्युअरचे रुग्ण असतील तर धोका वाढतो.