Heart Attack Prevent Foods: हार्ट अटॅकनंतर फक्त औषधांवर अवलंबून न राहता आहारात अशा पदार्थांचा समावेश करा, जे हृदय मजबूत ठेवण्यास मदत करतात. काही पोषक घटकांनी भरपूर असलेले पदार्थ हृदय निरोगी ठेवण्यास उपयोगी ठरू शकतात.

पुण्यातील इनामदार हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. शालिनी सिंह साळुंखे यांनी काही आरोग्यदायी पदार्थांची यादी सांगितली आहे. हे पदार्थ खराब (LDL) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

सत्तू: सत्तू हा वनस्पतीजन्य प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. तो स्नायू मजबूत करण्यासोबतच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. त्यातील विद्रव्य तंतू (सोल्युबल फायबर) शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

जव: जवामध्ये बीटा-ग्लुकन नावाचे तंतू (फायबर) असतात. हे खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करतात. तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही उपयोगी ठरतात.

इसबगोल: इसबगोल केवळ पोट साफ करण्यासाठीच उपयोगी नाही, तर त्यामधील विद्रव्य तंतू खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतात. त्यामुळे तो हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो.

सोया चंक्स आणि भोपळ्याच्या बिया: सोया चंक्समध्ये भरपूर प्रथिने आणि तंतू असतात. हे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. तसेच भोपळ्याच्या बियाही हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानल्या जातात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)