Best Sleeping Position for Heart Patients: रात्रीची वेळ म्हणजे शरीर आणि मनाला विश्रांती देण्याची वेळ. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आपण बिछान्यावर पडतो आणि आरामात झोपण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हृदयविकाराचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी झोप घेणे हा केवळ आरामाचा विषय नसतो. रात्री शरीराला जाणवणारे काही बदल हृदयाच्या आरोग्याबाबत महत्त्वाचा संकेत देऊ शकतात. विशेषतः झोपताना श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक जाग येणे किंवा नेहमीपेक्षा जास्त उशांची गरज भासणे याकडे दुर्लक्ष करू नये.
मात्र, हृदयविकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी झोपण्याची एकच पद्धत योग्य असते, असे नाही. व्यक्तीचा हृदयविकार, लक्षणे आणि एकूण आरोग्य यांनुसार झोपण्याच्या स्थितीची योग्यता बदलू शकते.
हृदयविकार असताना कोणत्या कुशीवर झोपावे?
हृदय शरीराच्या डाव्या बाजूला आहे आणि त्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्यास हृदयावर दबाव येतो किंवा त्यामुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते, असा समज अनेकांच्या मनात आहे. मात्र, हा समज सर्वसाधारणपणे योग्य नाही. हृदय छातीच्या पिंजऱ्यात सुरक्षित असते आणि डाव्या कुशीवर झोपल्याने सामान्यतः हृदयाला इजा होत नाही.
काही व्यक्तींना मात्र डाव्या कुशीवर झोपताना स्वतःच्या हृदयाची धडधड अधिक जाणवू शकते किंवा अस्वस्थ वाटू शकते. अशा वेळी उजव्या कुशीवर वळणे किंवा शरीराचा वरचा भाग किंचित उंच ठेवून झोपणे आरामदायी ठरू शकते.
हृदयरोग तज्ज्ञ डॉ. असीम धल, संचालक व विभागप्रमुख, हृदयरोग विज्ञान, ISIC मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, यांच्या मते, स्थिर स्थितीतील हृदयविकार असलेल्या व्यक्तीने झोपण्याची अशी स्थिती निवडावी, की ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणार नाही आणि आधीची लक्षणे वाढणार नाहीत. म्हणजेच झोपण्याची एखादी विशिष्ट स्थिती हृदयविकार बरा करू शकत नाही. ती केवळ झोपताना होणारी अस्वस्थता किंवा श्वास घेण्यातील त्रास कमी करण्यास मदत करू शकते.
झोपताना अनेक उशांची गरज का भासते?
महत्त्वाचा मुद्दा इथेच आहे, हृदयविकाराच्या काही रुग्णांना विशेषतः हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यास, पूर्णपणे पाठीवर झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा वेळी डोक्याखाली किंवा शरीराच्या वरच्या भागाखाली उशा ठेवून झोपल्याने श्वास घेणे तुलनेने सोपे वाटू शकते.
परंतु अचानक नेहमीपेक्षा जास्त उशा घेऊन झोपण्याची गरज भासू लागली, तर त्याकडे केवळ आरामाची सवय म्हणून पाहू नका. हृदयाच्या स्थितीचा पुन्हा आढावा घेण्याची गरज असल्याचे हे संकेत असू शकते.
झोपण्याच्या कोणत्या स्थितीबाबत सावध राहावे?
प्रत्यक्षात झोपण्याची स्थिती कोणती ते महत्त्वाचे नसून, त्या स्थितीत शरीराला नेमके काय जाणवते, हे अधिक महत्त्वाचे आहे.
एखाद्या स्थितीत झोपताना श्वास घेण्यास त्रास, छातीत अस्वस्थता किंवा वेदना, चक्कर येणे अथवा हृदयाची असामान्य धडधड जाणवत असेल, तर त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. हृदयाची कार्यक्षमता कमी झालेल्या काही रुग्णांना शरीर पूर्णपणे आडवे केल्यावर द्रव साचण्याशी संबंधित श्वासोच्छवासाचा त्रास वाढू शकतो.
पोटावर झोपणेही प्रत्येकासाठी धोकादायक असते, असे नाही. मात्र, या स्थितीत श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर दुसरी स्थिती निवडणे योग्य ठरू शकते.
झोपेतून अचानक धापा टाकत उठता?
रात्रीच्या वेळी आणखी एका समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. झोपेत श्वासोच्छवास थांबणे किंवा अडथळा येणे म्हणजेच निद्रानाशातील श्वसनविकार. काही व्यक्तींमध्ये पाठीवर झोपल्यामुळे हा त्रास वाढू शकतो; तर कुशीवर झोपल्याने काही रुग्णांना फायदा होऊ शकतो.
म्हणूनच हृदयविकाराच्या रुग्णांनी केवळ कोणत्या कुशीवर झोपतो यापेक्षा झोपताना शरीराकडून मिळणारे संकेत समजून घेणे महत्त्वाचे आहे.
रात्री ‘ही’ लक्षणे दुर्लक्षिणे धोकादायक
झोपण्याची नेहमीची पद्धत अचानक बदलली आहे का, हे सर्वांत महत्त्वाचे. उदाहरणार्थ- रात्री अचानक धापा टाकत जाग येणे, आडवे झाल्यावर नव्याने किंवा वाढलेला श्वास घेण्याचा त्रास, झोपण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक उशांची गरज भासणे किंवा पायांवर सूज वाढणे ही हृदयाची कार्यक्षमता बिघडत असल्याची संभाव्य चिन्हे असू शकतात.
अशी नवीन किंवा वाढलेली लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.
‘ही’ लक्षणे दिसल्यास तातडीच्या डॉक्टरी सल्ल्याची गरज
छातीत नवीन प्रकारची वेदना, बेशुद्ध पडणे, तीव्र श्वासोच्छवासाचा त्रास किंवा घाम आणि मळमळ यांसह छातीत दुखणे, अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
डॉ. असीम धल यांच्या मते, हृदयविकाराच्या रुग्णांनी झोपण्यासाठी ‘एकच परिपूर्ण कुशी’ शोधण्यापेक्षा हृदयाची स्थिती योग्य प्रकारे नियंत्रणात आहे का, याकडे अधिक लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर, हृदयाशी संबंधित प्रक्रिया झाल्यानंतर किंवा हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्याचे निदान झाल्यानंतर झोपण्याच्या स्थितीबाबतचा सल्ला व्यक्तीनुसार बदलू शकतो. त्यामुळे औषधे, नियमित तपासण्या आणि हृदयरोग तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांसोबत झोपण्याच्या सवयींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
