Roti Causes Inflammation : आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत आरोग्य आणि आहाराविषयी लोकांच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या युगात ‘हे खाऊ नका’, ‘ते खाल्ल्याने वजन वाढेल’ किंवा ‘अमुक अन्नपदार्थामुळे शरीरात दाह (Inflammation) निर्माण होतो’ अशा प्रकारच्या अनेक आव्हानात्मक दाव्यांचा सुळसुळाट झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरची पर्सनल पोषणतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी भारतीय पारंपारिक आहाराबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या समजूतींवर आणि गैरसमजांवर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या एका विशेष सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, “आपली पारंपारिक गव्हाची पोळी शरीरात कोणताही दाह (छातीत जळजळ अन् पोटात आग) निर्माण करत नाही. उलट आपल्या भारतीय अन्नाची ताकद ओळखण्याची आणि पाश्चात्य मान्यतेवर (Western Validation) अवलंबून राहणे थांबवण्याची वेळ आता आली आहे.

पोळी, भात आणि वास्तव (Roti, Rice and Reality)

स्वातंत्र्याला ७५ हून अधिक वर्षे उलटून गेल्यानंतरही आपण आपल्याच देशातील पारंपारिक आहारावर शंका घेतो आणि पाश्चात्य देश जोपर्यंत एखाद्या घटकाला मान्यता देत नाहीत, तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाही, याबद्दल रुजुता दिवेकर यांनी तीव्र खंत व्यक्त केली.

आपल्याकडे पिढ्यानपिढ्या खाल्ली जाणारी पोळी, भात, तूप आणि डाळ यांसारख्या साध्या, घरगुती अन्नाबद्दल लोकांच्या मनात अकारण भीती निर्माण केली जात आहे. जेव्हा एखादी पाश्चात्य संस्था किंवा परदेशी ‘हेल्थ इन्फ्लुएन्सर’ आपल्या हळदीला ‘टर्मरिक लाते’ (Turmeric Latte) म्हणून विकतात किंवा तुपाला ‘क्लेरिफाईड बटर’ (Clarified Butter) म्हणून मान्यता देतात, तेव्हाच आपल्याला त्याची किंमत कळते.

रुजुता आठवण करून देतात की, भारताकडे हजारो वर्षांपूर्वीपासून योग, कडुनिंब, तुळस आणि ऋतूनुसार बनवलेले ताजे घरगुती अन्न यांसारख्या आरोग्याच्या अनमोल गोष्टी होत्या. मग असे असतानाही आज आपण आपल्याच ताटातील अन्नाला शत्रू का मानत आहोत? खरोखरच धोका आपल्या रोजच्या साध्या पोळीत आहे की आपल्या विचारात, हा विचार करणे गरजेचे आहे.

भारतीय आहाराचे खरे सत्य (The Real Truth of Indian Food)

आहाराबाबत निर्माण झालेला गोंधळ किंवा भीती ही स्वतः अन्नापेक्षा अधिक घातक ठरत आहे. लोक कोणत्याही प्रकारचा विचार न करता पॅकबंद बिस्किटे, चिप्स आणि प्रीझर्व्हेटिव्ह्ज असलेले पदार्थ सहज खातात. मात्र, जेव्हा घरात बनवलेली साधी पोळी किंवा चपाती ताटात येते, तेव्हा मात्र ‘याने दाह (Inflammation) होईल का?’, ‘याने वजन वाढेल का?’ असे प्रश्न उपस्थित केले जातात.

हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे. आपल्या पूर्वजांनी शतकानुशतके पोळी, भात आणि डाळ खाऊन अत्यंत निरोगी आणि दीर्घायुष्य जगले आहे. या पारंपारिक अन्नाने भारतीय हवामान आणि जीवनशैलीनुसार शरीराला आवश्यक ते सर्व पोषक घटक, ऊर्जा आणि संतुलित पोषण पुरवले आहे. आधुनिक काळात मिळणाऱ्या प्रक्रिया केलेल्या (Processed) स्नॅक्सच्या तुलनेत हे साधे अन्न पचनासाठी सर्वोत्तम आणि आरोग्यदायी आहे.

शरीरात ‘दाह’ निर्माण होतो म्हणजे काय होते?

‘दाह’ म्हणजे शरीराला झालेली इजा, संसर्ग किंवा विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी प्रतिकारशक्तीने (Immune System) दिलेली नैसर्गिक प्रतिक्रिया. जेव्हा शरीरात दाह निर्माण होतो, तेव्हा बाधित भागातील रक्तप्रवाह वाढून सूज येणे, भाग लाल होणे किंवा गरम लागणे आणि वेदना किंवा जळजळ होणे अशी लक्षणे दिसतात. थोडक्यात, शरीरातील ऊती (tissues) सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांची दुरुस्ती करण्यासाठी ही प्रक्रिया घडते; परंतु, हा दाह दीर्घकाळ टिकून राहिल्यास तो शरीराच्या निरोगी पेशी आणि अवयवांनाच हळूहळू हानी पोहोचवून मधुमेह, हृदयविकार व कर्करोगासारखे गंभीर आजार निर्माण करतो म्हणून तो हानिकारक ठरतो.

शरीरात होणाऱ्या दाहाचे (Inflammation) खरे कारण (The Real Cause of Inflammation)

पोळीमुळे शरीरात दाह निर्माण होतो हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. रुजुता दिवेकर यांच्या मते, पोळी खाल्याने थेट दाह निर्माण होत नाही. पोळी खाल्यानंतर छातीत होणारी जळजळ अन् पोटात पडणारी आग यामागे आपली आधुनिक जीवनशैली आणि अन्नाची बिघडलेली गुणवत्ता कारणीभूत आहे.

  • पॅकबंद आणि रिफाईंड पीठ: बाजारात मिळणारे महिना-महिने टिकणारे पॅकबंद गव्हाचे पीठ किंवा रिफाईंड धान्य (मैदा) यांमधील नैसर्गिक फायबर नष्ट झालेले असते.
  • शारीरिक हालचालींचा अभाव: आजकालची आळशी किंवा एकाच जागी बसून काम करण्याचीची जीवनशैली पचनक्रिया मंदावते.
  • अति-प्रक्रिया केलेले अन्न (Ultra-processed snacks): जंक फूड, सोडा, बेकरी प्रॉडक्ट्स आणि पॅकेज्ड स्नॅक्स हे शरीरातील सूज आणि दाहासाठी खरे जबाबदार आहेत.

त्याउलट, घरी दळून आणलेल्या ताज्या गव्हाची पोळी, तसेच ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची (रागी) भाकरी ही अत्यंत पौष्टिक, पचनास हलकी आणि आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी (Gut-friendly) उत्तम असते.

भात खरोखरच आरोग्यासाठी वाईट आहे का? (Is Rice the Real Villain?)

भारतीय आहारात भातालाही बर्‍याचदा ‘शत्रू’ ठरवले जाते. भात खाल्ल्याने वजन वाढते किंवा साखर वाढते असा गैरसमज पसरवला गेला आहे. परंतु, रुजुता स्पष्ट करतात की, भात हा भारतीय उपखंडातील सर्वात सोपा, पचायला हलका आणि आतड्यांना शांत करणारा (Gut-cooling) अन्नपदार्थ आहे.

तांदूळ पचनसंस्थेवर कोणताही ताण न आणता शरीराला त्वरित ऊर्जा देतो. जेव्हा भात आणि डाळ एकत्र खाल्ली जातात (डाळ-भात), तेव्हा ते एक ‘परिपूर्ण प्रथिन’ (Complete Protein) बनते. मांसाहारातून मिळणाऱ्या प्रथिनांइतकीच गुणवत्ता डाळ-भाताच्या मिश्रणातून शरीराला मिळते. त्यामुळे भाताला भीतीपोटी आहारातून वगळणे पूर्णपणे अयोग्य आहे.

पाश्चात्य मान्यतेची वाट का पाहायची? (Why Do We Wait for Validation?)

आपल्या देशात शतकानुशतके वापरल्या जाणाऱ्या गोष्टींना आपण तेव्हाच स्वीकारतो, जेव्हा परदेशात त्यांना ‘सुपरफूड’चा दर्जा मिळतो. तुळशीचा चहा किंवा काढा हजारो वर्षांपासून आपल्याकडे वापरला जात होता, पण आता पाश्चात्य देशांनी त्याला ‘हर्बल टी’ म्हणून स्वीकारल्यावर आपण त्याचे कौतुक करतो. उपवासाला खाल्ली जाणारी भगर (Vari) किंवा नाचणी आता परदेशात ‘ग्लुटेन-फ्री सुपरग्रेन’ म्हणून विकली जात आहे. आपल्या स्वयंपाकघरातील हळद, आले आणि तूप यांना परदेशात मागणी वाढल्यावरच आपल्याला त्यांचे महत्त्व पटू लागले आहे. हा मानसिक गुलामगिरीचा विचार सोडणे गरजेचे आहे. ज्या अन्नाने आपल्या कित्येक पिढ्यांचे रक्षण केले, त्याला परदेशी शिक्क्याची (Validation) अजिबात गरज नाही.

जागतिक ट्रेंड बनलेली भारतीय परंपरा (Indian Tradition that Became a Trend)

भारताने जगाकडून वेलनेस किंवा आरोग्याचे धडे घेतलेले नाहीत, तर भारताने संपूर्ण जगाला निरोगी राहण्याचा मार्ग दाखवला आहे. योग, ऋतूनुसार आहार (Seasonal Eating), आयुर्वेद, कडुनिंब आणि तुळशीचा दैनंदिन वापर या सर्व गोष्टी जगात ट्रेंड होण्यापूर्वीपासून भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग होत्या. खऱ्या आरोग्याची सुरुवात ही इतर देशांचे अंधानुकरण करण्याऐवजी आपल्या स्वतःच्या समृद्ध परंपरेचा आणि संस्कृतीचा आदर करण्यापासून होते.

भारतीय संस्कृतीत अन्न हेच प्रेम (Every Indian Loves Language as Food)

भारतात अन्न हे केवळ पोट भरण्याचे साधन नाही, तर ते भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. आपल्या संस्कृतीत प्रेमाची, काळजीची आणि आपुलकीची भाषा अन्नातून व्यक्त होते. आईने किंवा आजीने प्रेमाने बनवलेली गरम पोळी, डाळ आणि भात म्हणजे केवळ कॅलरीज किंवा प्रोटीन्स नाहीत, तर ती कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी आणि जिव्हाळा जपणारी एक भावना आहे. हे साधे घरगुती अन्न आपल्या मनाला आणि शरीराला तृप्त करते.

थोडक्यात काय तर “भारतीय अन्न आणि परंपरेवर विश्वास ठेवा.” आपला पारंपारिक भारतीय आहार हा अत्यंत शास्त्रीय, संतुलित आणि आरोग्यासाठी परिपूर्ण आहे. पाश्चात्य डाएटच्या चक्रव्यूहात किंवा फॅड डाएटच्या (Fad Diets) आहारी न जाता, बाहेरचे प्रक्रिया केलेले अन्न टाळा आणि घरी बनवलेले ताजे, सात्विक अन्न आनंदाने खा. निरोगी राहण्यासाठी आपल्या मूळ आहाराकडे परत जाणे हाच एकमेव आणि सर्वोत्तम मार्ग आहे.