scorecardresearch

चहा टाळा, लस्सी प्या, थंड पाण्याने अंघोळ करा, घरातून बाहेर पडताना…; Heat Wave चा सामना करण्यासाठी टीप्स

उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पुढील तीन ते चार दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे.

heat wave Does And Donts
हवामान खात्याने दिला इशारा (फाइल फोटो)

भारतीय हवामान खात्याने वायव्येकडून देशामध्ये येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे कोकण, गोव्यासहीत मुंबईमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिलाय. आकाश निरभ्र राहणार असून आर्द्रता कमी असल्याने उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पुढील तीन ते चार दिवस नागरिकांनी उन्हात फिरु नये आणि अगदीच कामानिमित्त फिरावे लागले तर अधिक काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील पत्रकच हवामान खात्याने जारी केलंय

नक्की पाहा >> Photos: मुंबई, कोकणासहीत सहा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा; काय करावे?, काय टाळावे जाणून घ्या

१४, १५, १६ मार्च रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा समान प्रभाव जाणवणार आहे. १४ आणि १५ तारखेला सर्वाधिक जास्त उष्णता असेल तर १६ तारखेला तुलनेने कमी उष्णता असली तरी सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय. पुढील दोन दिवस म्हणजेच १७ आणि १८ मार्च रोजी वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये १४ तारखेला सर्वाधिक उष्णता जाणवेल तर १५ आणि १६ तारखेलाही तुलनेने कमी पण नेहमीपेक्षा अधिक उष्णता जाणवण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्येही इतर जिल्ह्यांप्रमाणे वातावरण पुढील काही दिवस कोरडं असेल, असा अंदाज आहे. समुद्र किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३७ अंशांच्या वर जाणे हा उष्णतेच्या लाटेसाठी पहिला निकष आहे. सामान्यपणे तापमान ३७ अंशांच्या वर गेल्यानंतर उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो.

महाराष्ट्रामध्ये या उष्णतेच्या लाटेसंदर्भात यल्लो तसेच ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय. त्यानुसार यल्लो अलर्ट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उष्णता राहण्याची शक्यता आहे. यल्लो अलर्ट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सहन करता येईल असा उष्मा असेल. मात्र लहान मुलं, वयस्कर व्यक्ती तसेच आरोग्य विषयक समस्या असणाऱ्यांची विशेष काळजी या दिवसांमध्ये घ्यावी. यासंदर्भात हवामान खात्यानेच त्यांच्या पत्रकात काही सूचना केल्यात.

> यल्लो अलर्टच्या कालावधीमध्ये उन्हात जाणं टाळावं. कमी वजनाचे, सौम्य रंगाचे आणि सुटसुटीत कपड्यांचा वापर या दिवसांमध्ये करावा.

> डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ किंवा रुमाल बांधावा. उन्हात डोकं उघडं राहणार नाही याची काळजी घ्यावी.

> ऑरेंज अलर्टदरम्यान यल्लो अलर्टपेक्षा अधिक उष्णता जाणवेल. बराच वेळ उन्हात राहणाऱ्यांना, उन्हात अंगमेहनतीची कामं करणाऱ्यांना त्रास जाणवण्याची शक्यता.

> लहान मुलं, वयस्कर व्यक्ती तसेच आरोग्य विषयक समस्या असणाऱ्यांची विशेष काळजी या दिवसांमध्ये घ्यावी.

> ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेल्या प्रदेशामध्ये उन्हात जाणं टाळावं.

> शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही म्हणजेच शरीर डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी.

> हलक्या वजनाचे, सौम्य रंगाचे, कॉटनचे कपडे वापरावेत. उन्हातून प्रवास करताना डोकं झालेलं असेल याची काळजी घ्यावी.

> तहान लागली नसेल तरी सतत पाणी प्यावे.

> घरगुती पेय ज्यामध्ये लस्सी, ताक, लिंबूपाणी, तोरणी (तांदळाचं पाणी) यासारख्या गोष्टींची सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही.

> दारु, चहा, कॉफी, सोडा असणारी शीत पेयांचं सेवन टाळा. या पदार्थांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं.

> थंड पाण्याने अंघोळ करा.

> एखाद्या व्यक्तीला सन स्ट्रोक म्हणजेच उष्माघाताचा त्रास झाल्यास त्याला एखाद्या थंड जागेवर किंवा सावलीत पाठ टेकवून झोपवा.

> वेळोवेळी त्याचा चेहरा आणि हात पाय ओल्या कापडाने पुसा.

> त्या व्यक्तीच्या डोक्यावर साधं पाणी ओता. अशा वेळेस व्यक्तीच्या शरीराचं तापमान समान्य स्तरावर आणणं अधिक महत्वाचं असतं. थोडं बरं वाटू लागल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला देऊन पुढील निर्णय घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heat wave warning issued for mumbai thane by imd does and donts for next few days scsg

ताज्या बातम्या