Endometriosis symptomps: मासिक पाळीतील वेदनांकडे अनेकदा सामान्य म्हणून दुर्लक्ष केले जाते. तथापि, जर वेदना इतक्या तीव्र असतील की, त्यामुळे दैनंदिन कामे, अभ्यास, नोकरी किंवा झोपेत अडथळा येत असेल, तर त्याकडे केवळ पाळीच्या सामान्य वेदना म्हणून दुर्लक्ष करणेच योग्य ठरते. डॉक्टरांच्या मते, अशा वेदना एंडोमेट्रिओसिससारख्या आजाराचे लक्षण असू शकतात. जर याचे त्वरित निदान आणि उपचार केले नाहीत, तर त्याचा स्त्रीची जीवनशैली आणि प्रजनन क्षमता यांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून एंडोमेट्रिओसिस आणि त्याचे निदान कसे करावे याबद्दल जाणून घेऊ.

एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय?

एंडोमेट्रिओसिस ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील अस्तरासारखे ऊतक गर्भाशयाच्या बाहेर वाढते, ज्यामुळे सूज, वेदना आणि इतर लक्षणे दिसतात. डॉक्टरांच्या अंदाजानुसार, ही स्थिती अंदाजे १० पैकी एका स्त्रीमध्ये आढळते. याचे सर्वांत सामान्य लक्षण म्हणजे मासिक पाळीतील तीव्र आणि वारंवार होणाऱ्या वेदना. तथापि, प्रत्येक स्त्रीमध्ये लक्षणे वेगवेगळी असतात. काही प्रकरणांमध्ये, ओटीपोटात सतत वेदना, लैंगिक संबंधाच्या वेळी वेदना किंवा गर्भधारणा होण्यास अडचण येणे यांसारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात.

निदानाला लागतात अनेक वर्षे

भारतातील अनेक महिलांना एंडोमेट्रिओसिसचे निदान होण्यासाठी सात ते दहा वर्षे लागतात, अशी चिंता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. याचे एक कारण म्हणजे सुरुवातीच्या लक्षणांना मासिक पाळीच्या सामान्य वेदना समजण्याची चूक केली जाते. उशिरा निदान होण्याचा परिणाम केवळ वेदनांपुरता मर्यादित राहत नाही; तर त्याचा प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय उपचारास विलंब झाल्याने आर्थिक भारही वाढतो.

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

मासिक पाळीतील वेदना दर महिन्याला वाढत राहिल्यास किंवा इतक्या तीव्र होत असल्यास की, त्यामुळे दैनंदिन कामांमध्ये अडथळा येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, विशेषतः जर नेहमीची वेदनाशामक औषधे घेऊनही आराम मिळत नसेल. लघवी किंवा शौचास होताना वेदना होणे किंवा मासिक पाळीच्या काळात ओटीपोटात सतत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये. काही प्रकरणांमध्ये गर्भधारणा होण्यास अडचण येत असल्यास, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तज्ज्ञांच्या मते, किशोरवयीन मुलींमधील अशा लक्षणांकडे लक्ष देणेदेखील महत्त्वाचे आहे, कारण- ही समस्या लहान वयात सुरू होऊ शकते आणि कालांतराने अधिक त्रासदायक होऊ शकते.