Hair Loss From Helmet Use : रस्त्यावरून प्रवास करताना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालणे अत्यंत गरजेचे आहे. हे केवळ कायद्याचे पालन करण्यासाठीच नाही, तर एखाद्या अपघातात आपला जीव वाचवण्यासाठी ते सर्वांत मोठे सुरक्षा कवच ठरते. मात्र, गेल्या काही काळापासून दुचाकी चालकांमध्ये, विशेषतः तरुण पिढीमध्ये एक नवीन भीती निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ‘हेल्मेट हेअर लॉस’ (Helmet Hair Loss). हेल्मेट घातल्याने खरोखरच केस गळतात का, हा प्रश्न जर तुमच्याही मनात असेल, तर आज आम्ही तुम्हाला त्यामागचे सत्य आणि त्यापासून बचावाचे सोपे उपाय सांगणार आहोत.
हेल्मेटमुळे खरंच केस गळतात का? (Does Wearing a Helmet Cause Hair Loss?)
तज्ज्ञांच्या मते, हेल्मेट थेट तुमच्या डोक्याचे केस उपटत नाही किंवा केसगळतीला कारणीभूतही ठरत नाही. तर, हेल्मेट चुकीच्या पद्धतीने वापरणे आणि त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे यांमुळे ‘ट्रॅक्शन अलोपेशिया’ (Traction Alopecia) आणि स्कॅल्प इन्फेक्शन (डोक्याच्या त्वचेचा संसर्ग) होतो, ज्यामुळे केस वेगाने गळू लागतात.
रोज तुम्ही जर खूप तास हेल्मेट घालून प्रवास करीत असाल, तर अशाने डोक्याला मिळणारा हवेचा पुरवठा (व्हेंटिलेशन) थांबतो. जेव्हा तुम्ही खूप घट्ट (टाईट) हेल्मेट वापरता किंवा ते घाईघाईने डोक्यात घालता आणि काढता, तेव्हा केसांच्या मुळांवर सतत ताण पडतो. त्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस तुटू लागतात.
तसेच, उन्हाळ्यात आणि दमट हवामानात हेल्मेटच्या आत मोठ्या प्रमाणावर घाम जमा होतो. हा घाम आणि स्कॅल्पमधील नैसर्गिक तेल (Natural Oil) एकत्र आल्यामुळे तिथे जीवाणू (बॅक्टेरिया) आणि बुरशी (फंगस) वाढण्यास पोषक वातावरण तयार होते. परिणामी डँड्रफ (कोंडा), खाज सुटणे आणि केसांच्या मुळांना सूज येणे यांसारख्या समस्या उदभवतात, ज्या केसगळतीचा वेग वाढवतात.
हेलमेटमुळे होणारी केस गळती रोखण्यासाठी करा ‘हे’ ५ सोपे उपाय
सुती रुमाल किंवा स्कार्फ वापरा: हेल्मेट घालण्यापूर्वी डोक्यावर एक स्वच्छ, सुती (कॉटन) रुमाल, स्कार्फ किंवा ओढणी नक्की बांधा. हा कपडा घाम शोषून घेतो आणि हेल्मेटच्या आतील कडक भागाशी केसांचे होणारे थेट घर्षण (friction) रोखतो.
हेल्मेटची नियमित स्वच्छता : आपण हेल्मेट रोज वापरतो; पण अनेक महिने त्याची स्वच्छता करत नाही. हेल्मेटच्या आतील पॅडिंग (गादी) आठवड्यातून किमान एकदा सौम्य शॅम्पू किंवा अँटी-बॅक्टेरियल स्प्रेने स्वच्छ करावी आणि ती कडक उन्हात वाळवावी.
ओल्या केसांवर हेल्मेट घालणे टाळा: जर तुम्ही अंघोळ केल्यावर लगेच किंवा केसांना जेल अथवा तेल लावून हेल्मेट घालत असाल, तर डोक्याच्या त्वचेमध्ये ओलावा कोंडला जातो. हे फंगल इन्फेक्शनला थेट आमंत्रण आहे. त्यामुळे हेल्मेट घालण्यापूर्वी केस पूर्णपणे सुकलेले असावेत.
योग्य आकाराचे हेल्मेट निवडा : हेल्मेट खूप सैलही नसावे आणि इतके घट्टही नसावे की, ज्यामुळे डोके दुखू लागेल किंवा केस ओढले जातील. नेहमी योग्य फिटिंगचे आणि उत्तम हवेचा पुरवठा (Good Ventilation) असणारे हेल्मेट निवडावे.
हेल्मेट वापरताना घाई करू नका: हेल्मेट डोक्यावर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न करू नका. ते घालताना आणि काढताना थोडी काळजी घ्या, जेणेकरून केसांच्या मुळांवर अचानक झटका किंवा ताण येणार नाही.
