How long to soak various dal : कडधान्य आणि डाळी आपल्या आहाराचा महत्वाचा भाग आहेत. भारतात विविध प्रकारच्या डाळी मार्केटमध्ये उपल्बध असतात. डाळी खाण्याचे अनेक फायदेही शरीराला आहेत. त्यामुळे बहुतांश तज्ज्ञ रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. ज्यात मसूर, हरभरा, मूग आणि उडीद डाळ यांचा समावेश आहे. पण, स्वयंपाकापूर्वी डाळी व कडधान्ये भिजत घालावी लागतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? की, काही डाळींना भिजण्यासाठी फक्त काही मिनिटे लागतात, तर काहींना अगदी रात्रभर भिजत ठेवावे लागते
याचबद्दल आहारतज्ज्ञ रायन फर्नांडो म्हणतात की, भिजत ठेवल्याने कडधान्ये आणि डाळींमध्ये ओलावा चांगल्या प्रकारे शोषला जातो (हायड्रेशन) आणि त्यातील ‘अँटी-न्यूट्रिएंट्स’चे (पोषकद्रव्ये शोषण्यास अडथळा आणणारे घटक) प्रमाण कमी होण्यास मदत होते. मात्र, भिजवण्याचा कालावधी पूर्णपणे त्या डाळीच्या किंवा कडधान्याच्या आकारावर अवलंबून असतो.
स्वयंपाकापूर्वी डाळ का भिजवावी?
डाळ किंवा कडधान्ये भिजत घातल्याने ती शिजण्यापूर्वीच पाणी शोषून घेतात. परिणामी, ती मऊ होतात आणि शिजण्याची प्रक्रिया जलद होते. तसेच, यामुळे त्यातील काही हानिकारक घटक (अँटी-न्यूट्रिएंट्स) दूर होण्यासही मदत होऊ शकते. तरीही, सर्वच डाळींना भिजण्यासाठी एकच विशिष्ट वेळ लागते असे म्हणता येणार नाही.
कोणत्या डाळीला किती वेळ भिजवत ठेवावे?
पिवळी मुगाची डाळ आणि मसूर डाळ
लहान किंवा दळलेल्या स्वरूपातील डाळी सहसा लवकर पाणी शोषून घेतात. पिवळी मुगाची डाळ आणि मसूर डाळ स्वयंपाकापूर्वी सुमारे १५ ते ३० मिनिटे भिजत ठेवावीत. या लहान आणि डाळ स्वरूपातील डाळींना पाणी शोषण्यासाठी कमी वेळ लागतो.
चणा डाळ आणि अख्खा मसूर
काही मोठ्या किंवा अख्ख्या डाळींना भिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. चणा डाळ आणि अख्खा मसूर २ ते ४ तास भिजत ठेवता येतात. याचे कारण म्हणजे शिजण्यापूर्वी पाणी शोषून घेण्यासाठी या डाळींना अधिक वेळ लागतो.
अख्खा मूग, अख्खी उडीद डाळ, काळा चणा, काबुली चणा आणि राजमा
मोठ्या आणि कठीण कडधान्यांना भिजण्यासाठी बराच जास्त वेळ लागतो. अख्खा मूग, अख्खी उडीद डाळ, काळा चणा, काबुली चणा आणि राजमा सहसा ६ ते ८ तास किंवा रात्रभर भिजत ठेवता येतात. ही कडधान्ये अधिक दाट (घट्ट) असतात, त्यामुळे पाणी शोषून घेण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागतो.
डाळींनुसार भिजवण्याची वेळ का बदलते?
डाळीचा आकार, तिचा कठीणपणा आणि ती अख्खी आहे की, साल काढलेली किंवा डाळ स्वरूपात आहे, या सर्व गोष्टी ती डाळ किती लवकर पाणी शोषून घेते यावर परिणाम करतात. लहान, डाळ स्वरूपातील आणि साल काढलेल्या डाळी लवकर पाणी शोषून घेतात; याउलट, मोठ्या आणि दाट स्वरूपातील अख्ख्या कडधान्यांना पाणी शोषण्यासाठी काहीसा जास्त वेळ लागतो. त्यामुळे, सर्व डाळींसाठी भिजवण्याची एकच पद्धत वापरण्याऐवजी, आपण कोणत्या प्रकारची डाळ किंवा कडधान्य वापरत आहोत याचा विचार केला पाहिजे.
डाळी भिजवण्याचा लक्षात ठेवण्यासारखा सोपा नियम
एखादी विशिष्ट कडधान्य किती वेळ भिजवावी याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास.
लहान, मधोमध कापलेली आणि साल काढलेली कडधान्ये लवकर पाणी शोषून घेतात.
तर मोठी आणि कठीण अख्खी कडधान्ये जास्त वेळ भिजवावी लागतात.
दिलेला वेळ हा एक अंदाजित कालावधी आहे आणि तो कडधान्याच्या प्रकारानुसार व स्वयंपाकाच्या पद्धतीनुसार बदलू शकतो.
