Hibiscus Flowering Tips Easy Homemade Fertilizer: जास्वंदाचं रोप घराच्या अंगणात, गॅलरीत किंवा अगदी छोट्याशा कुंडीतही सहज पाहायला मिळतं. लाल, गुलाबी, पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची फुलं उमलली की घराचा कोपरा अगदी खुलून जातो. विशेष म्हणजे, या फुलांचा वापर पूजेसाठीही केला जात असल्याने अनेक जण आवर्जून जास्वंदाचं रोप लावतात. मात्र, रोप लावल्यानंतर काही काळाने एक वेगळीच अडचण सुरू होते.

रोपाची वाढ होत असते, पानंही येत असतात; पण फुलं मात्र दिसेनाशी होतात. कधी एखादं फूल उमलतं तर कधी अनेक दिवस कुंडी फक्त हिरव्या पानांनीच भरलेली दिसते. काही वेळा पानांचा रंगही बदलून ती पिवळसर होऊ लागतात. अशावेळी नेमकं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो.

महागडी खतं आणण्यापूर्वी घरातच असलेल्या काही वस्तूंचा वापर करून पाहण्याचा सल्ला एका बागकामविषयक व्हिडीओमध्ये देण्यात आला आहे. या उपायांमुळे रोपाला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे, यासाठी लागणाऱ्या गोष्टी फारशा वेगळ्या नाहीत.

आधी करा हा सोपा उपाय

जास्वंदाच्या पानांचा हिरवेपणा टिकवण्यासाठी एका लिटर पाण्यात एक चमचा एप्सम सॉल्ट मिसळण्याचा उपाय या व्हिडीओमध्ये सांगण्यात आला आहे. हे मिश्रण संध्याकाळी, विशेषतः सूर्यास्तानंतर रोपावर हलके शिंपडण्याची सूचना करण्यात आली आहे.

हा उपाय रोज करण्याची गरज नसून साधारण १५ दिवसांतून एकदा करण्याचे सांगितले आहे. एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर असतात. मात्र, कोणत्याही खताचा किंवा मिश्रणाचा वापर करताना रोपाची अवस्था आणि मातीची गरज लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

पण, फुलांची संख्या वाढवण्यासाठी यापेक्षा वेगळा उपाय सांगितला आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तू तर आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळू शकतात.

फुलांसाठी वापरा घरातल्या या गोष्टी

एक ग्लास पाण्यात एक चमचा चहाची पावडर, एक चमचा गूळ आणि एका केळीच्या सालीचे बारीक तुकडे घ्यायचे आहेत. हे मिश्रण काही तास तसेच ठेवायचे आणि त्यानंतर गाळून घ्यायचे.

व्हिडीओमध्ये हे मिश्रण साधारण आठ ते दहा तासांनंतर गाळून रोपाला देण्याची पद्धत सांगण्यात आली आहे. चहाची पावडर, केळीची साल आणि गूळ यांच्यापासून मिळणारे सेंद्रिय घटक मातीत मिसळल्याने रोपाच्या वाढीस मदत होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

हा उपाय आठवड्यातून एकदा करण्याचे सांगितले आहे. मात्र, कुंडीतील मातीमध्ये आधीपासून भरपूर सेंद्रिय पदार्थ असतील तर अतिरिक्त मिश्रण देण्याची गरज प्रत्येक रोपाला सारखी असेलच असे नाही, त्यामुळे प्रमाण आणि रोपाची अवस्था लक्षात घेणे आवश्यक आहे.

काही दिवसांत बदल दिसेल का?

जास्वंदाला फुलं न येण्यामागे केवळ खताची कमतरता हेच कारण असेल असं नाही. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे, पाण्याचं चुकीचं प्रमाण, मातीचा निचरा व्यवस्थित नसणे, कुंडीचा आकार किंवा रोपावर आलेली कीड यामुळेही वाढ आणि फुलोरा प्रभावित होऊ शकतो.

त्यामुळे घरगुती खताचा उपाय करूनही लगेच फुलांचा बहर येईलच असं निश्चितपणे म्हणता येत नाही. मात्र योग्य सूर्यप्रकाश, योग्य पाणी आणि पोषक मातीसोबत अशा सेंद्रिय उपायांचा वापर रोपाच्या निगेसाठी केला जाऊ शकतो.

म्हणजेच जास्वंदाचं रोप फुलत नाही म्हणून लगेच ते खराब झालं असं समजू नका. रोपाला नेमकी गरज काय आहे हे आधी पाहा आणि त्यानुसार निगा राखा. योग्य काळजी घेतल्यास हिरवीगार पानं आणि सुंदर फुलांनी भरलेलं जास्वंदाचं रोप पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता नक्कीच वाढू शकते.