केस चमकदार ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारचे हेअर मास्क आणि कंडीशनर वापरतात. पण बाजारात मिळणारे हे कंडिशनर्स खूप महाग असतात आणि बऱ्याचदा ते अपेक्षित परिणामही देत ​​नाहीत. तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने केसांसाठी कंडीशनर बनवू शकता. डिजिटल क्रिएटर श्वेता खैरनार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी जास्वंदीच्या फुलांपासून कंडीशनर बनवण्याची पद्धत सांगितली आहे. जास्वंदीची फुले केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात.

हे कंडीशनर बनवण्यासाठी तुम्हाला फक्त ४ वस्तू लागतील.

  • २० जास्वंदीची फुलं
  • अर्धा कप अळशीच्या बिया
  • गरजेनुसार पाणी आणि
  • आधीच भिजवून ठेवलेले डिंक

कंडीशनर कसे बनवायचे?

  • सर्वात आधी जास्वंदीची फुले पाण्याने धुवून पूर्णपणे स्वच्छ करून घ्या.
  • आता, एका पॅनमध्ये थोडं पाणी टाका, त्यात स्वच्छ केलेली जास्वंदीची फुलं टाका आणि हाताने ती चांगली कुस्करून घ्या. असं केल्यावर फुलांमधून जेलसारखा पदार्थ बाहेर येऊ लागेल.
  • यानंतर त्यात अर्धा कप जवसाच्या बिया टाका आणि चांगले मिसळा.
  • पॅन गॅसवर ठेवा आणि हे मिश्रण १५ मिनिटे उकळा. हे मिश्रण पॅनला चिकटू नये म्हणून ते हलवत राहा.
  • थोड्या वेळाने हे मिश्रण घट्ट होऊ लागेल, ते जेलसारखं दिसू लागलं तर गॅस बंद करा आणि थोडं गरम असतानाच गाळून घ्या.
  • हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात भिजवून ठेवलेले डिंक टाका आणि ब्लेंडरमध्ये मिक्स करून घ्या. अशा रितीने तुमचे हेअर कंडिशनर तयार होईल.

कंडीशनर केसांना कसे लावावे?

केस शाम्पूने धुतल्यानंतर तुम्ही तयार केलेले हे कंडीशनर लावू शकता. हे कंडिशनर मुळांवर नाही तर फक्त केसांवर लावून १५ ते २० मिनिटं तसंच ठेवा, त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस चांगले धुवा. श्वेता खैरनार यांच्यामते, हे कंडीशनर नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेण्यासाठी आणि केस सिल्की व चमकदार बनवण्यास मदत करते. याच्या नियमित वापराने केसातील कोरडेपणा निघून जाईल व ते चमकू लागेल. वापरताना जास्वंदीची फुलं पूर्णपणे स्वच्छ करा. तसेच वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.