How to Get More Hibiscus Flowers: घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावलेलं जास्वंदाचं रोप हिरवंगार दिसतं, पानांची वाढही चांगली होते; पण कितीही काळजी घेतली तरी त्याला कळ्या आणि फुलं येत नाहीत, अशी अनेकांची तक्रार असते. महागडी खते, विविध औषधं आणि अनेक घरगुती उपाय करूनही काहीच फरक पडत नसेल, तर माळ्याने सांगितलेला हा सोपा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. विशेष म्हणजे अर्धा लिटर पाण्यात एक साधा पदार्थ मिसळून हा उपाय केला जातो. मात्र, तो पदार्थ कोणता ते जाणून घ्या.

घरात जास्वंदाचं रोप असणं अनेकांना आवडतं. लाल, गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची जास्वंदाची फुलं घराचं सौंदर्य वाढवतात. अनेक जण धार्मिक पूजेतही या फुलांचा वापर करतात. त्यामुळे जास्वंदाचं रोप कायम फुलांनी बहरलेलं असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, अनेकदा रोपाची वाढ व्यवस्थित होत असूनही त्याला कळ्याच लागत नाहीत किंवा लागलेल्या कळ्या उमलण्याआधीच गळून पडतात. त्यामुळे बागकामाची आवड असलेले अनेक जण चिंतेत पडतात.

तज्ज्ञांच्या मते, अशा वेळी अनेक जण लगेच महागडी रासायनिक खते वापरण्यास सुरुवात करतात; पण प्रत्येक वेळी खतांची कमतरता हेच यासाठी कारण असतं, असं नाही. काही वेळा मातीत आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता असल्यामुळेही रोप फुलं देणं बंद करतं. त्यामुळे आधी रोपाची स्थिती समजून घेणं महत्त्वाचं असतं.

जास्वंदाचं रोप चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी किंचित आम्लयुक्त माती आणि काही विशिष्ट सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी एका घटकाची कमतरता निर्माण झाली की, पानांचा हिरवागार रंग फिका पडू लागतो. काही पानं पिवळीही दिसू लागतात. अशा अवस्थेत रोपाची वाढ सुरू असली तरी त्याची फुलं देण्याची क्षमता कमी होते.

याच कारणामुळे अनुभवी माळी वेळोवेळी रोपाला आवश्यक पोषण देण्याचा सल्ला देतात. मात्र, कोणताही उपाय करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते. ती म्हणजे कुंडीतील वरची माती खुरप्याच्या साहाय्याने हलक्या हाताने सैल करून घेणे.

छोट्या खुरप्याने किंवा योग्य साधनाने माती वरच्या बाजूने हलक्या हाताने सैल करून घ्यावी. त्यामुळे माती घट्ट राहत नाही आणि नंतर त्यात टाकलेला द्रवपदार्थ थेट मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे रोप आवश्यक ती पोषक द्रव्ये अधिक प्रभावीपणे शोषून घेऊ शकतं.

जर तुमच्या जास्वंदाला अनेक महिन्यांपासून फुलं आली नसतील किंवा कळ्या लागूनही त्या गळून पडत असतील, तर हा उपाय सुरुवातीला महिन्यातून एकदा करावा, असं तज्ज्ञ सांगतात. साधारण दोन ते तीन आठवड्यांत त्याचा परिणाम दिसू लागतो. मग स्वाभाविकपणे नवीन कळ्या तयार होऊ लागतात आणि फुलांचा बहर वाढल्याचं जाणवतं.

मात्र, एकदा रोप पूर्ववत फुलू लागलं की, हा उपाय वारंवार करू नये. कोणत्याही खताचा किंवा पोषक द्रव्याचा अतिरेक रोपासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे फुलांचा बहर सुरू झाल्यानंतर हा डोस कमी करावा. पुढे देखभालीसाठी तीन महिन्यांतून फक्त एकदाच हा उपाय करणं पुरेसं मानलं जातं.

आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्धा लिटर पाण्यात नेमकं काय मिसळायचं? माळ्याच्या मते, अर्धा लिटर स्वच्छ पाण्यात एक चमचा ‘लोखंडाची भुकटी (Iron Dust)’ मिसळून त्याचं द्रावण तयार करावं. माती हलकीशी उकरून सैल केल्यानंतर हे द्रावण कुंडीत ओतावं. त्यामुळे मातीतील लोहाची कमतरता भरून निघण्यास मदत होते आणि जास्वंदाच्या रोपावर पुन्हा भरपूर कळ्या व फुलं येण्यास साह्य मिळू शकतं.

लोखंडाची बारीक भुकटी किंवा लोखंडाचा सूक्ष्म चुरा म्हणजे लोखंड घासताना, कापताना किंवा मशिनिंग प्रक्रियेदरम्यान तयार होणारे अतिशय बारीक लोखंडाचे कण असतात. बागकामाच्या संदर्भात मातीत कमी पडणाऱ्या लोहाचा (Iron) पुरवठा करण्यासाठी याचा वापर केला जातो.

(टीप : ही माहिती सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. या उपायाचा परिणाम मातीचा प्रकार, हवामान आणि रोपाची स्थिती यांनुसार बदलू शकतो. अशा स्वरूपाचा कोणताही उपाय करण्यापूर्वी बागकाम तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरते.)