Hibiscus Plant Flowering Tips: सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होऊ लागला असला तरी हवेत अजूनही ओलावा आहे. अशा वातावरणात घरातील जास्वंदाचे रोप हिरवेगार दिसते; मात्र त्याला फुलेच येत नसतील, तर नेमकं कारण काय? विशेषतः पूजेसाठी जास्वंदाच्या फुलांची गरज असते. मग ऐन वेळी फुले मिळत नसल्याने अनेकांची पंचाईत होते. मात्र, काही छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास जास्वंदाचे रोप पुन्हा कळ्यांनी आणि फुलांनी बहरू शकते.

जास्वंद हे घराच्या अंगणाची किंवा बाल्कनीची शोभा वाढवणारे लोकप्रिय रोप आहे. रोप व्यवस्थित वाढत असतानाही कधी कधी त्याला कळ्याच येत नाहीत किंवा आलेल्या कळ्या उमलण्यापूर्वीच गळून पडतात. अशा वेळी रोपाला दिले जाणारे केवळ पाणी वाढवणे हा उपाय नाही, तर त्याला पुरेसा सूर्यप्रकाश, योग्य माती, खत आणि रोपाभोवतीच्या पाण्याचा निचरा वेळेवर होतोय का, हे तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

रोप आणताना मातीची योग्य तयारी करा

नर्सरीतून नवीन जास्वंदाचे रोप आणणार असाल, तर ते चांगल्या दर्जाचे आणि शक्य असल्यास विविध रंगांची फुले देणारे संकरित रोप निवडा. रोप घरी आणल्यानंतर सर्वप्रथम कुंडीतील मातीची योग्य प्रकारे तयार करून घेणे गरजेचे आहे.

जुनी कुंडीतील माती वापरणार असाल, तर ती काही तास उन्हात चांगली वाळवून घ्या. साध्या मातीमध्ये गांडूळखत मिसळा. त्यासोबत कडुनिंबाची पेंड आणि हाडांची भुकटीही मिसळता येते. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून कुंडीत भरा.

कुंडीच्या तळाला पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी छिद्रे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. छिद्रांवर छोटी खडी किंवा दगड ठेवून, त्यावर माती भरावी. त्यानंतर रोप लावून, मातीने मुळे व्यवस्थित झाकावीत. रोप लावल्यानंतर पाण्यात थोडे ह्युमिक आम्ल मिसळून देता येते.

फुले येत नसल्यास सूर्यप्रकाश तपासा

जास्वंदाला भरपूर फुले येण्यासाठी सूर्यप्रकाशाची भूमिका महत्त्वाची असते. रोप दिवसभर अंधाऱ्या किंवा सावलीच्या ठिकाणी असेल, तर त्याची वाढ चांगली होऊनही फुलांची संख्या कमी राहू शकते. त्यामुळे कुंडी अशा ठिकाणी ठेवा, जिथे त्याला नियमितपणे सकाळचा सूर्यप्रकाश मिळेल.

मात्र, सप्टेंबरमध्ये पावसामुळे माती सतत ओली राहत असेल, तर पाणी देण्याची घाई करू नका. कुंडीतील मातीचा वरचा थर कोरडा झाल्यानंतरच गरजेनुसार पाणी द्या. कुंडीत पाणी साठून राहिल्यास मुळांवर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.

पानं पिवळी होतायत? द्या कळ्यांकडेही लक्ष

जास्वंदाची पाने पिवळी पडत असतील, नवीन कळ्या येत नसतील किंवा कळ्या उमलण्याआधीच गळून पडत असतील, तर रोपाची बारकाईने पाहणी करा. मुळांभोवती बुरशी किंवा किडीचा प्रादुर्भाव तर नाही ना, हे तपासून बघा.

काही वेळा मिलीबगसारख्या किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळेही रोपाची वाढ मंदावते. या किडी रोपातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने आणि कळ्या कमकुवत होऊ शकतात. जुन्या पिवळ्या पानांसोबत सुकलेल्या कळ्याही वेळोवेळी काढून टाका.

फांद्यांची हलकी छाटणीही ठरू शकते उपयोगी

ज्या फांद्यांना बराच काळ फुले येत नाहीत, त्यांची हलकी छाटणी करता येते. छाटणीनंतर नवीन फांद्या फुटण्यास मदत होऊ शकते आणि त्यावर पुढे कळ्या येण्याची शक्यता वाढते. मात्र, छाटणी करताना फांद्या अति प्रमाणात कापू नयेत. छाटलेल्या भागावर योग्य त्या बुरशीनाशकाचा वापर करता येतो.

पावसाळ्यात विशेषतः कुंडीतील पाण्याचा निचरा होणारी छिद्रे बंद झालेली नाहीत ना, हे तपासा. महिन्यातून एकदा सेंद्रिय खत देणेही उपयुक्त ठरू शकते. मातीची हलकीशी मशागत करताना कडुनिंबाच्या पेंडीचा वापर करता येतो.

आणि आता सर्वांत महत्त्वाचा घरगुती उपाय…

जास्वंदाला फुले आणण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. त्यापैकी काही घरच्या घरी सहज करता येतात. मात्र, कोणताही उपाय करताना रोपाची अवस्था, मातीचा प्रकार, पाण्याचा निचरा आणि हवामान लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

आता जास्वंदाच्या रोपासाठी सांगितला जाणारा एक साधा घरगुती उपाय जाणून घेऊया. त्यासाठी केळीच्या साली वाळवून, त्यांची भुकटी तयार करता येते. ही भुकटी कुंडीत थोड्या प्रमाणात मिसळता येते. केळीच्या सालींमध्ये पोटॅशियमसह काही पोषक घटक असतात.

त्यासोबतच एप्सम मीठ (Epsom Salt) हा दुसरा पदार्थ वापरला जातो. हे साधे मीठ नसून, मॅग्नेशियम आणि सल्फेट या नैसर्गिक खनिजांपासून तयार झालेले एक रासायनिक संयुग (मॅग्नेशियम सल्फेट) आहे. मात्र, त्याचा वापरही योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे. या दोन गोष्टींचा योग्य वापर, पुरेसा सूर्यप्रकाश, पाण्याचा योग्य निचरा आणि रोपाची नियमित निगा राखल्यास जास्वंदाचे रोप अधिक सक्षम ठेवण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे शनिवारी पूजेसाठी जास्वंदाची फुले हवी असतील, तर आतापासूनच रोपाची व्यवस्थित निगा राखा.

(टीप : या लेखातील बागकामासंबंधीची माहिती सामान्य अनुभवांवर आणि घरगुती बागकामाच्या पद्धतींवर आधारित आहे. कोणतेही खत किंवा पूरक घटक वापरण्यापूर्वी आपल्या रोपाची स्थिती आणि मातीचा प्रकार लक्षात घ्या.)