Food Safety Meat Cooking Temperature: भारतामध्ये गेल्या काही वर्षांत पचनसंस्थेशी संबंधित कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. विशेषतः पोटाचा कर्करोग (गॅस्ट्रिक कॅन्सर) हा आजार पूर्वी जपान, कोरिया यांसारख्या देशांत जास्त आढळत असे; परंतु आता भारतातही त्याचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

तंबाखूचे सेवन, मद्यपान किंवा हेलिकोबॅक्टर पायलोरी या जीवाणूचा संसर्ग हे पोटाच्या कर्करोगाचे महत्त्वाचे कारण मानले जात असले तरी आहाराच्या सवयींमध्ये होत असलेला बदल हादेखील एक मोठा घटक ठरत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

बदलत चाललेला भारतीय आहार

पारंपरिक भारतीय आहार प्रामुख्याने भाजीपाला, डाळी आणि धान्यांवर आधारित होता. मात्र, गेल्या काही दशकांत शहरांमध्ये मांसाहारी पदार्थ, फास्टफूड, ग्रिल केलेले पदार्थ आणि बार्बेक्यू यांचा वापर वाढताना दिसतो. आधुनिक जीवनशैलीमुळे तयार झालेल्या या आहारपद्धतीकडे अनेक जण आकर्षित होत असले तरी त्यामागे काही आरोग्य धोकेही लपलेले असू शकतात.

Award Banner

विशेषतः मांसाहार करताना स्वयंपाकाची पद्धत आणि अन्न हाताळण्याची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. अनेकदा लोक चवीसाठी किंवा घाईगडबडीत अन्न योग्य तापमानावर शिजले आहे का, याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत.

स्वयंपाकातील सवयी आणि संभाव्य धोके

मांस खूप जास्त तापमानावर ग्रिल किंवा बार्बेक्यू केले गेले, तर हेट्रोसायक्लिक अमाइन्स (HCAs) आणि पॉलीसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) नावाचे काही रासायनिक घटक तयार होऊ शकतात. संशोधनानुसार हे घटक दीर्घकाळ शरीरात गेल्यास कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

तसेच अनेकदा शिजवलेले मांस वारंवार गरम करून खाणे किंवा अन्न सुरक्षितपणे साठवून न ठेवणे या सवयीही पचनसंस्थेवर परिणाम करू शकतात. दीर्घकाळ अशा सवयी राहिल्यास पोटाच्या आतील आवरणात सूज किंवा जळजळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

संशोधनातून समोर आलेली बाब

या संदर्भात इंडियन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, नियमितपणे मांसाहार करणाऱ्या आणि विशेषतः योग्यरीत्या न‌ शिजवलेले लाल मांस खाणाऱ्या लोकांमध्ये काही भागांत पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण तुलनेने जास्त दिसून आले.

या अभ्यासातून आहारपद्धती आणि पोटाच्या कर्करोगामधील संभाव्य संबंध अधोरेखित झाला. त्यामुळे डॉक्टरांच्या मते, केवळ काय खाल्ले जाते हेच नव्हे, तर ते कसे शिजवले जाते आणि किती सुरक्षित आहे हेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मांसाहार पूर्णपणे टाळणे हा उपाय नाही. मात्र, काही साध्या सवयी अंगीकारल्यास धोका कमी करता येऊ शकतो.

  • मांस योग्य तापमानावर पूर्णपणे शिजवणे
  • कच्चे मांस हाताळल्यानंतर हात आणि भांडी नीट धुणे
  • शिजवलेले मांस वारंवार गरम करून खाणे टाळणे
  • स्वच्छता आणि योग्य साठवणूक याकडे लक्ष देणे

या साध्या गोष्टी दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात.

मग नेमकी चूक कोणती?

तज्ज्ञांच्या मते, अनेक जण चव वाढावी किंवा वेळ वाचावा म्हणून मांस थोडे कच्चे राहिले तरी चालते, असे समजतात. परंतु, कमी शिजवलेले मांस खाणे हीच मोठी चूक ठरू शकते.

अशा कमी शिजवल्या गेलेल्या मांसामध्ये काही जीवाणू, परजीवी किंवा संसर्गकारक घटक राहण्याची शक्यता असते. दीर्घकाळ अशा अन्नाचे सेवन केल्यास पोटात जळजळ, संसर्ग आणि इतर गुंतागुंत निर्माण होऊन पचनसंस्थेच्या आजारांचा धोका वाढू शकतो.

म्हणूनच डॉक्टर स्पष्टपणे सल्ला देतात की, मांसाहार करताना चवीपेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि अन्न पूर्णपणे शिजलेले असल्याची खात्री करा. कारण- कधी कधी स्वयंपाकातील छोट्या चुकादेखील मोठ्या आरोग्य धोक्याचे कारण ठरू शकतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)