White Food Health Risks: आजकाल अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ आणि कृत्रिम घटकांची भर इतकी वाढली आहे की, आपण नेमकं काय खातो आहोत याचाच विसर पडतो. दारू आणि सिगारेट शरीरासाठी अपायकारक आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे आपल्या रोजच्या जेवणात अशा काही गोष्टी नकळत समाविष्ट झालेल्या असतात, ज्या दारूपेक्षाही अधिक घातक ठरू शकतात. डॉक्टर त्यांना ‘हळूहळू परिणाम करणारे विष’ असे संबोधतात.
‘पांढऱ्या’ पदार्थांपासून सावध राहा!
शारदा रुग्णालयातील अंतर्गत औषध विभागाचे प्राध्यापक डॉ. भुमेश त्यागी यांच्या मते, विशेषतः साखर ही शरीरासाठी विषासारखीच आहे. साखर शरीरात विरघळून इन्सुलिन प्रतिकार (इन्सुलिन रेसिस्टन्स) वाढवते. परिणामी मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
अनेक जण थेट साखर खात नाहीत; मात्र गोड पदार्थ, बिस्किटे, पेये आणि प्रक्रिया केलेले अन्न यामधून ते मोठ्या प्रमाणात साखर सेवन करतात. ही लपलेली साखरच शरीरासाठी सर्वाधिक घातक ठरते.
दारूपेक्षाही धोकादायक ‘या’ ३ गोष्टी
१) टोमॅटो सॉस – चवीमागचं गोड विष?
घराघरांत पकोडे, समोसे, पराठे किंवा स्नॅक्ससोबत टोमॅटो सॉस खाल्ला जातो. पण, एका चमचाभर सॉसमध्ये जवळजवळ एक चमचाभर साखर असते हे कितीजणांना ठाऊक आहे? सॉसमध्ये साखरेसोबत कृत्रिम रंग आणि संरक्षक द्रव्येही असतात. विशेषतः मुलांना प्रत्येक पदार्थासोबत दिला जाणारा सॉस हा त्यांच्या शरीरात अनावश्यक साखर ढकलण्यास कारणीभूत ठरतो.
२) थंड पेये आणि सोडा – ‘डाएट’ नावाखाली फसवणूक?
उन्हाळा सुरू झाला की थंड पेयांचे सेवन वाढते. आरोग्याची काळजी घेणारे लोक ‘शुगर-फ्री’ किंवा ‘डाएट’ पेये निवडतात, पण ही केवळ जाहिरातीतील गोड गोष्ट आहे. बहुतांश शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाण प्रचंड असते, त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि इन्सुलिनची पातळी बिघडते.
बाजारातील पॅकेज्ड फळरसही तितकाच धोकादायक असू शकतो. त्यामध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील साखर वेगाने वाढवते. दीर्घकाळ असे पेय सेवन केल्यास लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
३) फ्लेवर्ड दही – आरोग्यदायी की फसवणूक?
घरच्या घरी लावलेले दही हे आरोग्यासाठी हितकारक असते. बाजारातील साधे (प्लेन) दहीही चालू शकते, मात्र फ्लेवर्ड दही किंवा गोड दह्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. अशा दह्यातून शरीराला अपेक्षित पोषणमूल्ये मिळत नाहीत; उलट अतिरिक्त साखरच मिळते.
सावध राहणेच शहाणपण
दररोजच्या आहारात नकळत शिरलेल्या या गोष्टींचा परिणाम लगेच दिसून येत नाही. पण, कालांतराने त्याचे दुष्परिणाम गंभीर स्वरूप धारण करतात. लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि यकृताच्या समस्या यामागे या ‘गोड’ सवयी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतात.
आरोग्य टिकवायचे असेल तर अन्नपदार्थांचे घटक नीट वाचा, साखरेचे प्रमाण तपासा आणि शक्य तितका नैसर्गिक व घरगुती आहार निवडा, कारण काही चटकदार चवींसाठी घेतलेला छोटा निर्णय भविष्यात मोठी किंमत मोजायला लावू शकतो!
