Superfoods In Kitchen: आजच्या धावपळीच्या जीवनात आपला आहार हळूहळू असंतुलित होत चालला आहे. आपण अशा पदार्थांवर भर देतो जे चवीला तर चांगले असतात आणि पोटभरीचे असतात. मात्र, हेच पदार्थ आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी किती नुकसान करू शकतात हे आपण विसरतो. पारंपरिक, पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न आपल्या ताटातून अनेकदा गायब असते. महागडे किंवा विदेशी सुपरफूड्स आरोग्यासाठी आवश्यक असते असा भ्रम लोकांमध्ये आहे. मात्र सत्य वेगळंच आहे. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक स्वस्त आणि गुणकारी पदार्थ अगदी सहज उपलब्ध असतात जे आवश्यक पोषक तत्वे आपल्याला मिळवून देतात.

दिल्लीतील NUTRच्या सर्टिफाइड क्लिनिकल डायएटिशियन आणि संस्थापक लक्षिता जैन यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, योग्य अन्न निवडल्याने जास्त पैसे खर्च न करता निरोगी शरीर राखता येते. जर आपण आपल्या आहारात काही स्वदेशी स्वयंपाकघरातील सुपरफूड्स समाविष्ट केले तर निरोगी राहणे खूप सोपे होऊ शकते. पीसीओएस आणि सांधेदुखीच्या उपचारांसाठी तज्ज्ञ कोणते पदार्थ खाण्याचा सल्ला देतात याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

मोरिंगाची पाने

मोरिंगाची पाने औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात आणि महिलांचे आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. यामध्ये संत्रीपेक्षा सातपट जास्त व्हिटॅमिन सी आणि दुधापेक्षा १७ पट जास्त कॅल्शियम असते. मोरिंगा पीसीओएस असणाऱ्या महिलांसाठी वरदान ठरते. इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यासाठी ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध मोरिंगाची पाने खाणे महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अनियमित मासिक पाळी नियंत्रित करण्यासाठी, गर्भधारणा होण्यास मदत करण्यासाठी आणि पीसीओएसची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी ही पाने अत्यंत प्रभावी आहेत. ही पाने वाळवा, बारीक करा आणि पावडर बनवा. दररोज एक चमचा ही पावडर पाण्यात किंवा दह्यात मिसळून घ्या. यामुळे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होईल आणि शरीर निरोगी राहील.

तीळ खा

तीळाचे सेवन केल्याने हिवाळ्यात शरीर उबदार राहते. त्यांच्या तापमानवाढीच्या प्रभावामुळे गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचे सेवन करू नये. दररोज १० ते १५ ग्रॅम तीळ खाल्ल्याने शरीराला कॅळ्शियम, निरोगी चरबी आणि मॅग्नेशियम मिळते. त्यामुळे हाडे आणि सांधेदुखी कमी होते. त्यांचे सेवन केल्याने जळजळ नियंत्रणात राहते. संधीवाताच्या वेदना कमी करण्यात तीळाचा महत्त्वाचा वाटा आहे. तीळ खाण्यासाठी ते आधी भाजून घ्या आणि नाश्त्यात सॅलड किंवा भाज्यांसह एक चमचा खा. यामुळे हाडे मजबूत होतात आणि शरीर निरोगी राहते.

हळद खा

पीसीओएस हे एक प्रकारचं चयापचय आणि हार्मोनल असंतुलन आहे. या परिस्थितीत हळदीचे सेवन महिलांसाठी औषधासारखे काम करते. हळदीमुळे शरीरातील अँड्रोजनची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस आणि अनियमित मासिक पाळी यासारख्या समस्यांपैसून आराम मिळतो. कच्च्या हळदीचा १ इंचाचा तुकडा किंवा त्याचा अर्धा चमचा रस निरोगी ठेवण्यासाठी पुरेसा आहे. कच्च्या हळदीमध्ये कर्क्यूमिन हा गुणधर्म आढळतो. कर्क्यूमिनमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात. ते रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि ताण नियंत्रित करण्यात मदत करतात. त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. पाण्यात किंवा दुधात एक चिमूटभर हळद आणि एक चिमूटभर काळी मिरी उकळून त्याचे सेवन करा, ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

ममरा बदाम खा

ममरा बदाम हे एक काश्मिरी पीक आहे. यामध्ये मोठ्याप्रमाणात तेल असते. ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. ममरा बदाममध्ये नियमित बदामांपेक्षा जास्त मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात. ते खराब कोलेस्ट्रॉल (एलडीएल) नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यांचे सेवन केल्याने मेंदू आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. हे बदाम निरोगी त्वचा देखील राखतात. या बदामांचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी ते खाण्यापूर्वी भिजवा.