high BP Foods: बीपी म्हणजेच रक्तदाबाची समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे. आता याला बदलती जीवनशैली म्हणा किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, कमी वयातच अनेक लोकांना बीपीचा त्रास होत आहे. अनेकदा लोक बीपीची औषधे नियमित घेत असतात, तरीही त्यांचा रक्तदाब वाढलेलाच राहतो. असं का होतं, याचा कधी विचार केला आहे का? यामागचं कारण म्हणजे तुमचा आहार. अनेकदा नकळत आपण अशा गोष्टी खात असतो, ज्यामुळे आपला रक्तदाब नेहमी वाढलेला राहतो.
न्यूरोसर्जन डॉ. अश्विनी कुमार यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले आहे की, जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल, तर आजच तुमच्या स्वयंपाकघरातून या ५ गोष्टी बाहेर काढा. या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे औषधे घेतल्यानंतरही रक्तदाब नियंत्रणात राहत नाही. चला तर जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या आहेत.
बीपीच्या रुग्णांनी स्वयंपाकघरातून या ५ गोष्टी काढून टाका
१) अतिरिक्त मीठ खाणे बंद करा
जर तुमचा रक्तदाब नेहमी वाढलेला राहत असेल, तर सर्वात आधी तुमच्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. डॉक्टरांच्या मते, एका दिवसात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. अनेकांना आपण किती मीठ खातो, याचा अंदाज येत नाही. अशावेळी सर्वात सोपा उपाय म्हणजे एका मोजण्याच्या चमच्याने ५ ग्रॅम मीठ मोजून पाहणे. हे प्रमाण साधारण १ छोट्या चमच्याएवढे असते. यापेक्षा जास्त मीठ खाणे पूर्णपणे टाळा.
२) लपलेले सोडियम (काळे मीठ, खडे मीठ आणि चाट मसाला)
अनेक लोक पांढऱ्या मिठाचे प्रमाण कमी करतात, पण त्याऐवजी खडे मीठ, चाट मसाला आणि काळे मीठ भरपूर खातात. विशेषतः सॅलड, रायता आणि चाटमध्ये याचा वापर केला जातो. डॉ. अश्विनी यांच्या मते, या सर्व पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
३) लोणचे आणि पापड (बीपीच्या रुग्णांसाठी धोकादायक)
लोणचे आणि पापड बनवताना त्यात भरपूर मीठ वापरले जाते, जेणेकरून ते लवकर खराब होऊ नयेत. याच कारणामुळे बीपीच्या रुग्णांनी हे पदार्थ खाणे टाळावे. अनेकदा योग्य माहिती नसल्यामुळे लोक लोणचे आणि पापड खात राहतात. त्यामुळे औषधे घेतल्यानंतरही त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहत नाही.
४) बाजारात मिळणारे सॉस आणि केचअप
बाजारात मिळणारे सॉस आणि केचअपदेखील बीपीच्या रुग्णांनी खाणे टाळावे. त्यांची चव वाढवण्यासाठी आणि ते जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम वापरले जाते. डॉक्टरांच्या मते, या पदार्थांऐवजी तुम्ही घरी बनवलेली चटणी खाऊ शकता. त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालावे.
५) कॉफी आणि कॅफिन (रक्तदाब अचानक वाढण्याचे मोठे कारण)
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी कॉफी आणि कॅफिन असलेल्या पदार्थांचे सेवनही मर्यादित प्रमाणात करावे. डॉक्टरांच्या मते, कॅफिनमुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो. त्यामुळे दिवसातून १-२ कपांपेक्षा जास्त कॉफी पिऊ नये. तसेच, एका पाऊचमधून एक कप कॉफी बनवण्याऐवजी त्याच पाऊचमधून २-३ कप कॉफी बनवून पिण्याचा प्रयत्न करा.
बोनस टिप्स – देशी तुपाचे प्रमाणही कमी ठेवा
डॉक्टरांच्या मते, बीपीच्या रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचा आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो. त्यामुळे देशी तुपाचे सेवनही मर्यादित प्रमाणातच करावे.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
