3 Morning Drinks for Better Blood Pressure Control: रक्तदाबाची समस्या आज अनेकांना भेडसावत आहे. विशेष म्हणजे रक्तदाब वाढला तरी सुरुवातीला अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’, असे म्हटले जाते. दीर्घकाळ रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नियमित व्यायामासोबत संतुलित आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. औषधोपचार सुरू असतील, तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद न करता, आहाराचा भाग म्हणून काही आरोग्यदायी पेयांचा विचार करता येतो.
सकाळच्या सुरुवातीला ‘ही’ ३ पेये ठरू शकतात फायदेशीर
१. बीटरूटचा रस
सकाळी उठल्यानंतर बीटरूटचा रस घेणे रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते. बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. शरीरात त्यांचे रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये होऊ शकते. त्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होण्यास आणि रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.
काही संशोधनांमध्ये बीटरूटच्या रसामुळे सिस्टोलिक रक्तदाबात घट होऊ शकते, असे आढळले आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी आहारातील हा एक पर्याय ठरू शकतो. मात्र, बीटरूटचा रस हा रक्तदाबावरील औषधांचा पर्याय नाही.
२. जास्वंदाचा चहा
दुसरे पेय म्हणजे जास्वंदाच्या फुलांपासून तयार केलेला चहा. जास्वंदामध्ये जैविकदृष्ट्या सक्रिय अशी काही संयुगे असतात. काही अभ्यासांमध्ये या चहाच्या सेवनाचा रक्तदाबावर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
काही संशोधनानुसार, दिवसातून तीन कप जास्वंदाचा चहा घेतल्याने अगोदरपासून उच्च रक्तदाब असलेल्या काही व्यक्तींमध्ये सिस्टोलिक रक्तदाब कमी झाल्याचे दिसून आले. जास्वंदातील काही घटक रक्तवाहिन्या शिथिल ठेवण्यास मदत करू शकतात. त्यातील दाह कमी करणारे घटक हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात.
त्याशिवाय जास्वंदाचा चहा नैसर्गिकरीत्या कमी उष्मांक असलेले पेय आहे; मात्र त्यात साखर मिसळल्यास त्याचे आरोग्यदायी फायदे कमी होऊ शकतात.
३. मीठ नसलेला टोमॅटोचा रस
तिसरा पर्याय म्हणजे मीठ न घातलेला टोमॅटोचा रस. टोमॅटोमध्ये लाइकोपीन व पोटॅशियम यांसारखे घटक असतात. लाइकोपीन हे प्रभावी अँटिऑक्सिडंट असून, शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करू शकते.
टोमॅटोमधील पोटॅशियम शरीरातील सोडियमचे संतुलन राखण्यास मदत करते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. काही अभ्यासांमध्ये नियमितपणे मीठ न घातलेला टोमॅटोचा रस घेतल्याने रक्तदाब आणि एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलच्या पातळीत सुधारणा दिसून आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, बाजारातील टोमॅटोचा रस घेताना त्यामध्ये सोडियमचे प्रमाण किती आहे, हे तपासणे महत्त्वाचे आहे. जास्त मीठ असलेला रस उलट रक्तदाब वाढवू शकतो.
आणखी कोणती पेये घेता येतील?
बीटरूटचा रस, जास्वंदाचा चहा आणि मीठ नसलेला टोमॅटोचा रस याशिवाय डाळिंबाचा रस, ग्रीन टी व क्रॅनबेरीचा रस यांचाही हृदयाच्या आरोग्यासाठी विचार केला जातो. डाळिंबामधील अँटिऑक्सिडंट हा घटक रक्तदाबासाठी फायदेशीर ठरू शकतो. ग्रीन टी रक्तवाहिन्यांची लवचिकता सुधारण्यास आणि शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतो.
मात्र, या सर्व पेयांमध्ये अतिरिक्त साखरेचा वापर टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. साखरयुक्त पेयांचे नियमित सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
रक्तदाब नियंत्रणासाठी या गोष्टीही लक्षात ठेवा
ही पेये घेताना आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवणे, भरपूर फळे व भाज्या खाणे आणि दिवसभर पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास रक्तदाबाच्या मोजमापावर परिणाम होऊ शकतो.
त्यासोबतच कॅफिनचे अतिसेवन, मद्यपान आणि साखरयुक्त पेये टाळण्याचा सल्ला दिला जातो. नियमित व्यायाम आणि योग्य वजन राखणेही रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वाचे आहे.
सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही रक्तदाबाची औषधे घेत असाल, तर आहारात मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. केवळ नैसर्गिक पेयांवर अवलंबून राहून औषधे स्वतःहून बंद करणे धोकादायक ठरू शकते.
(टीप : ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. ती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
