Reduce Blood Pressure Naturally: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत एक आजार वेगाने पसरताना दिसतोय तो म्हणजे उच्च रक्तदाब. अनेकांना सुरुवातीला याची जाणीवही होत नाही म्हणूनच या आजाराला ‘सायलेंट किलर’ असं म्हटलं जातं. चुकीचा आहार, जास्त मीठ, तणाव व व्यायामाचा अभाव यांमुळे हा त्रास वाढत चालला आहे.

तज्ज्ञांच्या मते, जगभरात अब्जावधी लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. साधारणपणे १२०/८० mmHg हा रक्तदाब सामान्य मानला जातो. पण हा स्तर वाढला, तर शरीराला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. सुरुवातीला डोकेदुखी, अंगदुखी, डोळ्यांसमोर धूसर दिसणे अशी लक्षणे जाणवतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन मेंदूविकार (स्ट्रोक), हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंडाचे आजार आणि दृष्टी कमी होण्यासारखे धोके वाढतात.

पण सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे हा आजार औषधांशिवायही नियंत्रणात आणता येऊ शकतो. तज्ज्ञ सांगतात की, जीवनशैली आणि आहारात काही साधे बदल केल्यास रक्तदाब केवळ कमीच नाही, तर पूर्णपणे नियंत्रणातही राहू शकतो.

‘हे’ ४ नैसर्गिक उपाय ठरतील रामबाण

१) वनौषधींचा वापर करा

काही नैसर्गिक घटक शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. लसूण, आले व जास्वंद (हिबिस्कस) यांसारख्या वनस्पतींमध्ये असलेले गुणधर्म रक्तवाहिन्या मोकळ्या करतात आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. लसणातील ‘अ‍ॅलिसिन’, आल्यामधील ‘जिंजरॉल’ आणि जास्वंदातील ‘पॉलीफेनॉल’ हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

२) मिठावर नियंत्रण ठेवा

दररोजच्या आहारात मिठाचं प्रमाण जास्त असेल, तर रक्तदाब झपाट्याने वाढू शकतो. त्यामुळे आहारात शक्य तितकं कमी मीठ वापरणं आणि सोडियमयुक्त पदार्थ टाळणं आवश्यक आहे.

३) अजवाइनचा (ओव्याचा) वापर करा

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला ओवा हा रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतो. त्यामधील घटक रक्तवाहिन्यांना आराम देतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. तसेच, पचन सुधारण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात.

४) योग आणि ध्यानाचा आधार घ्या

तणाव हा अनेक आजारांचा मूळ कारण मानला जातो. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान केल्याने मन शांत राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यासोबतच दररोज सात-आठ तासांची पुरेशी झोप घेणेही अत्यंत आ आवश्यक आहे.

वेळीच सावध व्हा!

उच्च रक्तदाब हा छोटा त्रास वाटू शकतो; पण त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. त्यामुळे वेळेतच योग्य उपाय करणं आवश्यक आहे. आहार, व्यायाम व मानसिक आरोग्य यांचा समतोल राखला, तर या आजारावर सहज नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

त्यामुळे आजच निर्णय घ्या – औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा नैसर्गिक पद्धत स्वीकारा आणि आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्या!

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)