High BP Symptoms: धावपळीचे जीवन, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाढता तणाव यामुळे आजकाल अनेक लोकांना कमी वयातच हाय ब्लड प्रेशरचा (High Blood Pressure) त्रास होत आहे. ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जाणारा हाय बीपी शरीरात हळूहळू वाढत जातो आणि कोणतीही गंभीर चेतावणी न देता हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनीचे मोठे नुकसान करू शकतो.

मात्र, वेळेत शरीरात दिसणारी हाय बीपीची लक्षणे ओळखली तर भविष्यात हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हृदयाच्या आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. हाय बीपीची काही लक्षणे सकाळी उठल्यानंतरच दिसू लागतात. डोक्यात जडपणा जाणवणे, झोपेतून उठल्यानंतरही थकवा जाणवणे, डोळ्यांसमोर धूसर दिसणे किंवा छातीत अस्वस्थ वाटणे यांसारख्या छोट्या-छोट्या समस्या हाय बीपीचे संकेत असू शकतात.

सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे इंटरव्हेंशनल आणि कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिजीत पालशीकर यांनी सांगितले की, हाय बीपीची लक्षणे ओळखणे आणि योग्य पद्धतीने नियमित बीपी तपासणे हा हाय बीपीचा धोका टाळण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. वेळेत हाय बीपीची लक्षणे समजून घेतली आणि वेळोवेळी योग्य पद्धतीने बीपी तपासले तर या समस्येपासून सहज बचाव करता येऊ शकतो. चला तर मग, तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की हाय बीपी झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, त्यापासून बचाव कसा करता येतो आणि बीपी तपासण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

हाय ब्लड प्रेशर झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसू शकतात?

जेव्हा बीपी खूप जास्त वाढतो, तेव्हा काही लोकांमध्ये खालील लक्षणे दिसू शकतात.

  • तीव्र डोकेदुखी
  • चक्कर येणे
  • धूसर दिसणे
  • छातीत दुखणे किंवा दाब जाणवणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • हृदयाचे ठोके जलद किंवा अनियमित असल्यासारखे वाटणे
  • नाकातून रक्त येणे
  • खूप अस्वस्थ किंवा घाबरल्यासारखे वाटणे
  • अशक्तपणा किंवा असामान्य थकवा जाणवणे
  • उलटी किंवा मळमळ होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

दीर्घकाळ ब्लड प्रेशर वाढलेले राहिल्यास शरीराला कोणते नुकसान होऊ शकते?

ब्लड प्रेशर दीर्घकाळ नियंत्रणात न राहिल्यास हृदय, मेंदू आणि किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे पुढे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी फेल होण्यासारख्या गंभीर समस्या होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे फक्त काही लक्षणे जाणवल्यानंतरच बीपी नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे नाही, तर नियमितपणे बीपी तपासणेही आवश्यक आहे.

बीपीची औषधे सुरू केल्यानंतर ती स्वतःहून बंद करू नका

ब्लड प्रेशरची औषधे घेतल्यानंतर बीपीची रीडिंग सामान्य झाली, म्हणजे हाय ब्लड प्रेशर कायमचा बरा झाला असे नाही. अनेक वेळा औषधांमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करणे योग्य नाही. काही लोकांमध्ये जीवनशैलीत बदल केल्यानंतर औषधांचा डोस कमी केला जाऊ शकतो किंवा औषधे बंद केली जाऊ शकतात. मात्र, हा निर्णय डॉक्टर नियमित बीपी तपासणीच्या आधारे घेतात.

बीपी तपासण्याची योग्य पद्धत कोणती?

जर तुम्हाला बीपी तपासायचा असेल तर बीपी मोजण्याच्या अर्धा तास आधी चहा-कॉफी पिणे, धूम्रपान करणे आणि व्यायाम करणे टाळावे.

बीपी तपासण्यापूर्वी ५ मिनिटे आरामात रिलॅक्स होऊन बसा.

बीपीची रीडिंग घेण्यासाठी पाठीला आधार देऊन बसा आणि दोन्ही पाय सरळ जमिनीवर ठेवा. पाय क्रॉस करून बसू नका.

हात टेबलवर अशा प्रकारे ठेवा की कफ लावलेला हात हृदयाच्या पातळीवर राहील.

लक्षात ठेवा, कफ कपड्यांवर लावू नका. तो नुसत्या हातावर, कोपराच्या थोडे वर योग्य पद्धतीने लावा.

बीपीची रीडिंग घेताना बोलू नका आणि शरीराची हालचाल करू नका.

एकावेळी २ रीडिंग घ्या. दोन्ही रीडिंगमध्ये साधारण १ मिनिटाचे अंतर ठेवा आणि त्यांची सरासरी नोंदवा.

दररोज बीपी तपासत असाल तर शक्यतो रोज जवळपास एकाच वेळी बीपी मोजणे अधिक चांगले असते.

बीपीच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

हाय ब्लड प्रेशरमध्ये फक्त आपल्याला काही लक्षणे जाणवत आहेत की नाहीत, एवढे पाहणे पुरेसे नाही. नियमितपणे बीपी तपासणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि जीवनशैलीत योग्य बदल करणे हे दीर्घकाळ ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक आहे. जर बीपीची रीडिंग सतत सामान्यपेक्षा जास्त येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)