High BP in 30s Stroke Risk : ऑफिसचे काम, धावपळीचे जीवन, उशिरापर्यंत जागी राहणे आणि सततचा ताण. ३० व्या वयात बहुतांश लोक या गोष्टींना आपल्या आयुष्याचा भाग मानतात. यादरम्यान जर तुमचा रक्तदाब वाढत असेल आणि कोणतीही लक्षणे दिसत नसतील, तर कदाचित तुम्ही याकडे गांभीर्याने पाहणार नाही. पण हीच बेफिकीर वृत्ती पुढे जाऊन स्ट्रोकसारख्या मोठ्या धोक्याचे कारण बनू शकते.

सीके बिर्ला हॉस्पिटलचे डायरेक्टर-कार्डिओलॉजी डॉ. अंशुल कुमार जैन सांगतात की, आजकाल हाय ब्लड प्रेशर ही फक्त वाढत्या वयाची समस्या राहिलेली नाही. ३० ते ३५ वयोगटातील लोकांमध्येही हे वेगाने पाहायला मिळत आहे आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे बहुतांश प्रकरणांमध्ये लोकांना याबद्दल अजिबात माहिती नसते. या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया-

चांगले वाटण्याचा अर्थ सर्वकाही ठीक आहे असा होत नाही

डॉ. जैन सांगतात की, हाय ब्लड प्रेशरला अनेकदा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते, कारण ते शरीराचे नुकसान करत राहते, पण सुरुवातीच्या काळात कोणतेही स्पष्ट संकेत देत नाही. तुम्ही दररोज ऑफिसला जाऊ शकता, जिम करू शकता, मित्रांबरोबर फिरायला जाऊ शकता आणि तुम्हाला अगदी सामान्य वाटू शकते. पण तरीही वाढलेला रक्तदाब आतील बाजूने तुमच्या रक्तवाहिन्या आणि हृदयावर दबाव वाढवत असतो. म्हणूनच ‘मला तर कोणतीही अडचण नाही’ या एकाच कारणावरून हाय बीपीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

मेंदूवर सर्वाधिक परिणाम का होतो?

आपला मेंदू सतत ऑक्सिजन आणि पोषक तत्वांनी युक्त रक्तावर अवलंबून असतो. जेव्हा रक्तदाब दीर्घकाळ वाढलेला राहतो, तेव्हा मेंदूपर्यंत रक्ताचा पुरवठा करणाऱ्या लहान-लहान रक्तवाहिन्या कमजोर होऊ लागतात. हळूहळू धमन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचा आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अनेकदा रक्तवाहिन्या (Blood Vessels) फाटण्याची भीतीही निर्माण होते. याच कारणामुळे डॉक्टर हाय बीपीला स्ट्रोकच्या सर्वात मोठ्या आणि नियंत्रणात आणता येण्याजोग्या धोक्यांपैकी एक मानतात.

३० च्या वयात हाय बीपी का वाढत आहे?

डॉ. अंशुल जैन म्हणतात की, गेल्या काही वर्षांत तरुणांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. तासनतास लॅपटॉपसमोर बसणे, शारीरिक हालचाली कमी होणे, जंक फूड जास्त खाणे आणि पुरेशी झोप न मिळणे ही गोष्ट सामान्य बनली आहे. हे सर्व घटक रक्तदाब वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय इतर काही कारणे खालीलप्रमाणे आहेत-

  • मिठाचे जास्त सेवन
  • सततचा मानसिक ताण (स्ट्रेस)
  • धुम्रपान
  • मद्यपानाचे अधिक सेवन
  • लठ्ठपणा
  • मधुमेह (डायबेटिस)
  • मूत्रपिंड (किडनी) संबंधित समस्या
  • कुटुंबात हाय बीपीचा इतिहास
  • ताणतणाव हे कारण मानून दुर्लक्ष करू नका

लोक म्हणतात की ऑफिसचा ताण आहे, म्हणूनच बीपी वाढला आहे. या विषयावर डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ताणामुळे काही वेळासाठी रक्तदाब वाढू शकतो, पण जर मोजमाप (Reading) वारंवार जास्त येत असेल, तर फक्त ताणालाच जबाबदार धरले पाहिजे असे नाही. अशा स्थितीत वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून परिस्थिती सामान्य आहे की खरोखरच उच्च रक्तदाबाची सुरुवात झाली आहे, हे स्पष्ट होऊ शकेल.

स्ट्रोकचा धोका कसा कमी करावा?

तर हाय ब्लड प्रेशर बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आणता येऊ शकते. तो कमी करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टींकडे लक्ष देऊ शकता-

  • वेळोवेळी रक्तादाबाची (ब्लड प्रेशर) तपासणी करा.
  • जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा.
  • दररोज किमान ३० मिनिटे शारीरिक व्यायाम वा हालचाल करा.
  • फळे आणि भाज्यांचे सेवन अधिक करा.
  • वजन नियंत्रित ठेवा.
  • धुम्रपानापासून दूर राहा.
  • मद्यपान मर्यादित प्रमाणात करा.
  • ७ ते ८ तासांची गाढ झोप पूर्ण करा.
  • ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

केवळ जीवनशैलीतील बदल पुरेसे ठरत नसतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचारांची गरज भासू शकते.