Prostate Gland: शरीरात युरिक अॅसिड वाढल्याने अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हायपरयुरिसेमियाची लक्षणेदेखील प्रोस्टेट कर्करोगाचे लक्षण असू शकतात. प्रोस्टेट ही अक्रोडाच्या आकाराची ग्रंथी आहे, जी पुरुषांच्या प्रजनन अवयवांचा एक भाग आहे. ती मूत्राशय अन् मूत्रमार्गाजवळ असते.
प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे काय?
प्रोस्टेट ग्रंथी सेमिनल फ्लुइड स्रावित करते, ज्यामध्ये एंझाइम, प्रथिने व खनिजे असतात. हे घटक शुक्राणूंचे संरक्षण करण्यास आणि त्यांचे पोषण करण्यास मदत करतात. पुरुषांना साधारणपणे ५० वर्षांच्या वयानंतर प्रोस्टेटशी संबंधित समस्या येतात. सामान्य प्रोस्टेट सुमारे तीन सेंटीमीटर जाड आणि चार सेंटीमीटर रुंद असते, ज्याचे वजन सुमारे २० ग्रॅम असते. तथापि, या वयाच्या आसपास पुरुषांमध्ये प्रोस्टेट वाढू लागते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया (BPH) म्हणतात.
बीपीएचची लक्षणे काय?
या स्थितीची लक्षणे हळूहळू दिसून येतात आणि जर दुर्लक्ष केले, तर दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. याचा परिणाम लोकांच्या जीवनशैलीवर होतो. सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासियाची सामान्य लक्षणे म्हणजे लघवी करण्यास त्रास होणे, वारंवार लघवी होणे, रक्ताळलेली लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे आणि रात्री वारंवार लघवी होणे. याव्यतिरिक्त, ज्या लोकांना लघवीच्या प्रवाहात अडथळा येतो त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या समस्या असण्याची शक्यता
वयानुसार, प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणून, जर सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासियाची लक्षणे दिसू लागली तर लोकांनी सावध राहून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तथापि, या प्रकारच्या कर्करोग आणि सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासियामध्ये फरक करण्यासाठी, गुदाशय तपासणी आणि सीरम PSA चाचणीची शिफारस केली जाते. त्याव्यतिरिक्त, प्रोस्टेट-विशिष्ट अँटीजेन चाचणी, MRI, ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाऊंड स्कॅन, हाड स्कॅन आणि PACS स्कॅन करून प्रोस्टेटचा आकार तपासता येतो.
कसे टाळावे?
डॉक्टरांनी द्रवपदार्थांचे सेवन मर्यादित ठेवण्याची शिफारस केली आहे. अल्कोहोल आणि जास्त कॉफी टाळा. विशेषतः जे रात्री वारंवार लघवी करतात त्यांनी झोपेच्या दोन तास आधी काहीही पिणे टाळावे. लठ्ठपणा नियंत्रित करा आणि संतुलित आहार घ्यावा.
