रोजच्या कामाच्या व्यापातून सुटीवर गेल्यामुळे हृदयरोग होण्याची जोखीम कमी होऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सुटी घेतल्याने आरोग्याला काय फायदा होतो, याबाबत केवळ निरीक्षणात्मक ढोबळ पुरावे उपलब्ध आहेत. परंतु, अमेरिकेतील सीरॅक्युस विद्यापीठातील संशोधकांनी सुटीचा हृदयाच्या आरोग्याला काय लाभ होतो, याबाबत अभ्यास केला आहे.
सीरॅक्युस विद्यापीठातील सहायक प्राध्यापक ब्रीस हृस्का यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात ज्यांनी अधिक वेळा सुटय़ा घेतल्या आहेत, त्यांच्यात हृदयरोग, मस्तिष्काघात आदींसाठी कारणीभूत ठरणारी चयापचयातील बिघाडाची जोखीम कमी प्रमाणात दिसून येते. अशा लोकांमध्ये यासाठीची लक्षणे दिसण्याची शक्यता कमी असते.
‘मेटाबोलिक सिन्ड्रोम’ म्हणजेच चयापचयात्मक लक्षणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लक्षणांत हृदयरोगांची जोखीम दर्शविणाऱ्या अनेक बाबी अंतर्भूत असतात. त्या जेवढय़ा अधिक दिसून येतील, तेवढी हृदयरोग होण्याची शक्यता अधिक असते, असे हृस्का म्हणाले. एखादी व्यक्ती जितक्या जास्त सुटय़ा घेते, तितक्या प्रमाणात त्या व्यक्तीला हृदयरोग होण्याची जोखीम कमी होते, असे आम्हाला आढळून आले. चयापचयात्मक लक्षणांमध्ये बदल होऊ शकतो, किंवा ते नष्टही होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुटीच्या काळाचा हृदयाच्या आरोग्यासाठी नेमका कसा फायदा होतो, यावर अद्याप संशोधन सुरू आहे. पण, आपल्याला असलेल्या सुटय़ांचा विनियोग करणे महत्त्वाचे असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
‘‘पूर्णवेळ काम करणाऱ्या ८० टक्के कर्मचाऱ्यांना सुटय़ा लागू असतात. पण, त्यापैकी निम्म्याहूनही कमी जण त्या सुटय़ांचा पूर्णाशाने उपयोग करून घेतात, असे महत्त्वाचे निरीक्षण या अभ्यासातून पुढे आले आहे,’’ अशी माहिती हृस्का यांनी दिली. लोकांनी उपलब्ध सुटय़ांचा अधिकाधिक उपयोग केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी ते लाभदायी राहील, असा या संशोधकांचा निष्कर्ष आहे.