Home Remedies for Hiccups: जेवताना अचानक उचकी लागली किंवा पाणी पिता पिता सलग ‘हिक-हिक’ सुरू झाली की काही क्षणांसाठी आपणही अस्वस्थ होतो. काही वेळा उचकी काही मिनिटांत आपोआप थांबते. मात्र, वारंवार उचकी येत असेल किंवा बराच वेळ ती थांबत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी काही सोपे उपाय करून पाहता येतात. विशेष म्हणजे उचकी थांबवण्यासाठी केलेला प्रत्येक घरगुती उपाय सगळ्यांना सारखाच उपयोगी पडेलच, असं नाही. उचकी लागली की, लगेच आठवतात आजीच्या बटव्यातील काही सोपे उपाय. थंड पाणी पिण्यापासून श्वास काही क्षण रोखण्यापर्यंत असे कोणते ५ उपाय करून पाहता येतात, जाणून घ्या…

उचकी नेमकी का लागते?

उचकी येण्यामागे मुख्य कारण असतं, ते म्हणजे उदरपटलाचं म्हणजेच डायाफ्रामचं अचानक आणि अनैच्छिक आकुंचन. डायाफ्राम हा छाती आणि पोटाच्या भागामधील श्वसनासाठी महत्त्वाचा स्नायू आहे. त्याचं अचानक आकुंचन झाल्यानंतर स्वरयंत्र काही क्षणांसाठी बंद होतं आणि त्यातून ‘हिक’ असा आवाज येतो.

खूप मोठ्या प्रमाणात जेवण करणं, घाईघाईनं खाणं, कार्बोनेटेड पेयं पिणं, अचानक भावनिक उत्तेजना किंवा ताण, तसेच पोटात जास्त हवा जाणं यांसारख्या कारणांनीही उचकी लागू शकते.

१. थंड पाणी छोटे घोट घेत प्या

उचकी सुरू झाल्यावर बर्फासारखं थंड पाणी एकदम पिण्याऐवजी छोटे छोटे घोट घेत हळूहळू प्या. काही लोकांची उचकी अशा रीतीनं कमी होण्यास मदत होते. घशातील संवेदना बदलल्यामुळे उचकीची अनैच्छिक क्रिया थांबण्यास मदत होऊ शकते. मात्र, हा उपाय प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखाच परिणाम करू शकेल, असंही नाही.

२. काही सेकंद श्वास रोखून ठेवा

दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या क्षमतेनुसार काही सेकंद श्वास रोखून ठेवा. त्यानंतर हळूहळू श्वास सोडा. ही प्रक्रिया काही वेळा करून पाहता येते. श्वास घेण्याची पद्धत बदलल्यानं काही लोकांची उचकी कमी होण्यास मदत होऊ शकते.

३. जिभेवर थोडी साखर ठेवा

एक छोटा चमचा साखर जिभेवर ठेवून, ती हळूहळू विरघळू द्या आणि नंतर गिळा. NHS च्या मार्गदर्शनातही उचकीसाठी दाणेदार साखर गिळण्याचा उपाय नमूद करण्यात आला आहे. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

४. लिंबाची फोड चोखून पाहा

लिंबाच्या फोडीची आंबट चवही काही लोकांमध्ये उचकीची लय थांबवण्यास मदत करू शकते. NHS च्या माहितीनुसार, लिंबू चावणे किंवा त्याची चव घेणे हा उचकीसाठी करून पाहता येणारा उपाय आहे. मात्र, यामुळे हमखास उचकी थांबेल, असं म्हणता येत नाही.

५. गुडघे छातीजवळ घेऊन पुढे झुका

उचकी सुरू असताना बसून दोन्ही गुडघे छातीजवळ आणा आणि शरीर थोडं पुढे झुकवा. या स्थितीमुळे उदरपटलाच्या भागावर सौम्य स्वरूपाचा दाब येऊ शकतो आणि काही लोकांची उचकी कमी होण्यास मदत होऊ शकते.

उचकी वारंवार येत असेल तर…?

सामान्य उचकी बहुतेक वेळा काही मिनिटांत किंवा थोड्या वेळात आपोआप थांबते. त्यामुळे अधूनमधून उचकी लागल्यास घाबरण्याची गरज नसते. मात्र, ४८ तासांपेक्षा जास्त काळ उचकी सुरू राहिली अन् ती परत वारंवार येत असेल किंवा त्याचा परिणाम खाणे, झोपणे, बोलणे अथवा श्वास घेण्यावर होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. दीर्घकाळ टिकणाऱ्या उचकीमागे काही वैद्यकीय कारणं किंवा औषधांचा परिणाम असू शकतो.

(टीप : हे उपाय सामान्य माहितीसाठी आहेत. कोणताही घरगुती उपाय उचकी हमखास थांबवेलच, असं नाही. उचकी दीर्घकाळ टिकत असल्यास किंवा इतर त्रासांसोबत येत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)