हिवाळा ऋतू थंडीबरोबरच त्वचेचा कोरडेपणाही घेऊन येतो. पण, त्याचा योनीच्या त्वचेवरही परिणाम होतो. या काळात अनेक महिलांना योनीत खाज सुटणे, जळजळ होणे, कोरडेपणा जाणवणे या समस्या उद्भवतात; त्यामुळे ही समस्या फक्त शारीरिक अस्वस्थता वाढवत नाही तर आत्मविश्वास आणि लैंगिक जीवनावरही परिणाम करतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी सुचवलेल्या काही सोप्या टिप्स या समस्येपासून सुटका करण्यास मदत करू शकतात…
हिवाळ्यात योनीमार्गाच्या समस्या का वाढतात?
हेल्थ अँड वेलनेस एक्स्पर्ट डॉक्टर सोनू खोखर यांच्या मते, हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे आपली संपूर्ण त्वचा कोरडी होते. केवळ चेहरा, हात आणि पायच नाही तर योनीमार्गाची त्वचादेखील कोरडी होते. शिवाय, थंड हवामानात लोक कमी पाणी पितात, गरम कपडे घालतात आणि घाम सुकल्यानंतर स्वच्छता राखण्यात अयशस्वी होतात, म्हणूनच या ऋतूत योनीमार्गात कोरडेपणा, खाज सुटणे आणि जळजळ होण्याच्या तक्रारी अधिक आढळतात.
स्वतःला हायड्रेटेड ठेवा
हेल्थ अँड वेलनेस एक्स्पर्ट डॉक्टर सोनू खोखर यांच्या मते, हिवाळ्यात योनीमार्गातील कोरडेपणा टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हायड्रेटेड राहणे. थंड हवामानात तहान कमी लागते, पण शरीराची पाण्याची गरज तशीच राहते. कमी पाणी प्यायल्याने शरीरात ओलावा कमी होतो; ज्याचा योनीमार्गावरही परिणाम होतो. दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. याव्यतिरिक्त तुमच्या आहारात सूप, कोमट पाणी आणि इतर द्रवपदार्थांचा समावेश करा.
योग्यरित्या स्वच्छ ठेवा
योनीमार्गाची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. पण, जास्त किंवा अयोग्य स्वच्छता हानिकारकसुद्धा ठरू शकते. डॉक्टर तुमचा योनीमार्ग कोमट पाण्याने स्वच्छ करण्याची शिफारस करतात. यामुळे त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो आणि नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी तुमचा योनीमार्ग नेहमी समोरून मागे धुवा. रासायनिक साबण किंवा सुगंधी उत्पादने वापरणे टाळा.
सुती अंडरवेअर घाला
हिवाळ्यात लोक अनेकदा जड आणि घट्ट कपडे घालतात; ज्यामुळे योनीमार्गात हवा पोहोचू शकत नाही. यामुळे घाम आणि ओलावा जमा होऊ शकतो; ज्यामुळे खाज सुटणे आणि संसर्ग होऊ शकतात. अशा परिस्थितीत सुती अंडरवेअर घालणे चांगले ठरेल. यामुळे त्वचेला ओलावा शोषून घेण्यास मदत होते; ज्यामुळे खाज सुटणे आणि जळजळ कमी होऊ शकते.
मॉइश्चरायझर लावा
जर तुम्हाला हिवाळ्यात योनीभोवती वारंवार कोरडेपणा जाणवत असेल, तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलके, सुगंध नसलेले मॉइश्चरायझर वापरता येते. मॉइश्चरायझर फक्त योनीच्या बाहेरील भागात लावा, आत नाही. त्याचा चुकीचा वापर केल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो.
ओलेपणा टाळा
धुतल्यानंतर योनी ओली ठेवल्यानेदेखील समस्या वाढू शकते. ओले राहिल्याने खाज सुटणे आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो, म्हणून धुतल्यानंतर योनीचा भाग मऊ, कोरड्या आणि धुतलेल्या टॉवेलने स्वच्छ करा.
निष्कर्ष
हिवाळ्यात योनीमार्गात खाज सुटणे, कोरडेपणा याकडे दुर्लक्ष करू नये. थोडसं सामान्य ज्ञान आणि तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या काही सोप्या टिप्स या समस्येपासून बचाव करण्यास मदत करू शकतात.
