3 Home Remedies to Clear Lung Phlegm: सप्टेंबरचा महिना आता संपत आला आहे. दिवसभर कडक ऊन, तर संध्याकाळी अचानक ढगाळ वातावरण, पाऊस किंवा गार वारा असा हवामानाचा लहरीपणा सध्या जाणवत आहे. त्यातच धूळ, धूर आणि प्रदूषणाची भर पडल्याने अनेकांना सर्दी, खोकला आणि कफाचा त्रास जाणवू शकतो. सुरुवातीला हा त्रास किरकोळ वाटतो; मात्र घट्ट कफ फुप्फुसात किंवा श्वसनमार्गात साचल्यास छातीत जडपणा, कफासह खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. शरीरात तयार होणारा कफ हा प्रत्यक्षात श्वसनमार्गाचे संरक्षण करणारा नैसर्गिक घटक आहे. धूळ, धूर आणि जंतू अडकवण्याचे काम तो करतो. मात्र, कफाचे प्रमाण किंवा घट्टपणा वाढला तर तो त्रासदायक ठरू शकतो.
अशावेळी लगेच औषधांचा आधार घेण्याऐवजी काही साधे उपाय घरच्या घरी करून पाहता येतात. मात्र, हे उपाय लक्षणांमध्ये आराम मिळवण्यासाठी आहेत; फुप्फुसातील कोणताही आजार बरा करण्याचा पर्याय नाहीत. मग आजीच्या बटव्यातील कोणते उपाय उपयोगी ठरू शकतात?
१. वाफ घेण्याचा उपाय
घट्ट कफामुळे नाक किंवा श्वसनमार्ग अडकल्यास उबदार वाफ किंवा गरम पाण्याच्या वाफेमुळे काही लोकांना आराम मिळू शकतो. उबदार, दमट हवा श्वसनमार्गातील कोरडेपणा आणि कोंडलेपणा कमी करण्यास मदत करू शकते. गरम पाण्याची वाफ घेण्यापेक्षा गरम पाण्याच्या शॉवरमधील वाफ हा अधिक सुरक्षित पर्याय मानला जातो.
मात्र, उकळत्या पाण्याच्या भांड्यावर चेहरा नेऊन वाफ घेणे विशेषतः लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. भाजण्याचा धोका असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच वाफ घेतल्याने फुप्फुसातील कफ कायमचा निघून जातो असा दावा करता येत नाही.
२. कोमट पाणी आणि मध-लिंबू
कफ घट्ट होऊ नये यासाठी शरीर पुरेसे पाण्याने युक्त ठेवणे महत्त्वाचे आहे. भरपूर द्रवपदार्थ घेतल्याने श्लेष्मा म्हणजेच कफ पातळ होण्यास आणि तो खोकून बाहेर काढण्यास मदत होऊ शकते.
कोमट पाण्यात मध आणि लिंबू घालून घेतल्याने घशाला आराम मिळू शकतो. विशेषतः सततच्या खोकल्यामुळे घशात खवखव किंवा जळजळ होत असेल तर हा उपाय उपयोगी वाटू शकतो. मात्र मध एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नये.
३. कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
कफासोबत घशात खवखव, दुखणे किंवा जळजळ जाणवत असेल तर कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करता येतात. यामुळे घशाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते. एका ग्लास कोमट पाण्यात साधारण अर्धा चमचा मीठ टाकून गुळण्या करून ते पाणी थुंकून द्यावे.
याशिवाय धूळ आणि धूर यांसारख्या त्रासदायक घटकांपासून शक्य तितके दूर राहणेही महत्त्वाचे आहे. धूम्रपान किंवा तंबाखूचा धूर कफ वाढवू शकतो आणि खोकला अधिक त्रासदायक करू शकतो. खोलीतील हवा खूप कोरडी असल्यास स्वच्छ ह्युमिडिफायरचा वापर काही लोकांना आराम देऊ शकतो; मात्र त्याची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे.
कफाकडे दुर्लक्ष करू नका!
साधा सर्दी-खोकला अनेकदा काही दिवसांत कमी होतो. परंतु कफ वाढत असेल, अनेक दिवस खोकला कायम राहत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत दुखत असेल किंवा ताप येत असेल तर घरगुती उपाय करत बसू नये. अशा लक्षणांमागे ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया, दमा किंवा इतर श्वसनविकार असू शकतात. तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला राहिल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
कफामध्ये रक्त दिसणे, श्वास घेण्यास तीव्र त्रास होणे किंवा छातीत तीव्र वेदना जाणवणे ही अधिक गंभीर इशार्याची लक्षणे असू शकतात, अशावेळी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
महत्त्वाचे : वरील उपाय सामान्य सर्दी-खोकला किंवा कफाच्या त्रासात आराम मिळवण्यासाठी आहेत. दमा, COPD, ब्रॉन्कायटिस किंवा अन्य फुप्फुसाचा आजार असल्यास डॉक्टरांनी सांगितलेले उपचार बंद करून केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये.
