घसा खराब झाल्याने घशात खवखवण्याबरोबरच दुखऱ्या घशामुळे खातानादेखील खूप त्रास होतो. अनेकवेळा कणकणदेखील जाणवते. हवामानातील बदलाच्या काळात हा त्रास अधिक प्रमाणात जाणवतो. या काळात थोडादेखील निष्काळजीपणा केल्यास घशाच्या समस्येचा सामना करावा लागतो. घसा खराब झाल्यास काय करू शकता आणि अँटिबायोटिक्सचे सेवन कधी करावे याबाबत जाणून घेऊया.
व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन अथवा घशाला काही इजा झाल्यास घशाच्या समस्येला सामोरे जावे लागते. तुम्हीदेखील या समस्येने त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांनी घशाला आराम पडू शकतो. गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणे हा यावरचा उत्तम उपाय ठरू शकतो, यात थोडीशी हळद टाकल्यास घशाला लवकर आराम पडण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर मधाचे सेवनदेखील यावरील चांगला उपाय ठरू शकतो. खवखवणाऱ्या घशावर मधाचे सेवन थेट परिणाम करण्यास मदत करू शकते. घशाला त्रास जाणवत असल्यास ‘सी’ जीवनसत्वाची मात्रा अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास घशाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.




घसा खराब झाल्यास अनेकजण लसणाच्या पाकळीचेदेखील सेवन करतात. कच्च्या लसणामध्ये एंटिबॅक्टेरिया आणि एंटिसेप्टिक गुण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जे घशासाठी फायदेशीर ठरू शकतात. याचबरोबर आलंयुक्त चहा, तुळशीची पाने, तुळशीचा काढा किंवा चिकन सूपचे सेवन करू शकता. यामुळे विनाऔषध तुम्हाला आराम मिळू शकतो. काहीजण घरगुती उपायांबरोबरच औषध घेणे देखील पसंत करतात. याविषयातील तज्ज्ञांच्या मते, श्वसन प्रणालीतील वरच्या नळीला संसर्ग झाल्यासदेखील घशाचा त्रास जाणवतो. लॅबमधील टेस्टद्वारेच याचे निदान होऊ शकते. गरज नसताना अँटिबायोटिक्सचे सेवन हानिकारक ठरू शकते. अधिक त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधाचे सेवन करावे.