5 Home Remedies for Toothache and Cavities: दातदुखीचा त्रास सुरू झाला की खाणे-पिणे तर कठीण होतेच, शिवाय दैनंदिन कामांवरही त्याचा परिणाम होतो. दातांमध्ये कीड लागणे, पोकळी निर्माण होणे, हिरड्यांमध्ये वेदना होणे आणि अचानक दात ठणकू लागणे अशा समस्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना जाणवतात. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा त्रास पुढे असह्य होऊ शकतो. अशा वेळी दातांची योग्य काळजी घेण्यासोबतच काही घरगुती उपायांची माहिती असणेही महत्त्वाचे ठरते. आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर दातांच्या आरोग्यासाठी पाच घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय नेमके कोणते आणि त्यांचा वापर कसा करायचा जाणून घेऊया.

दातांमध्ये कीड लागण्यामागे काय कारण असते?

आपल्या तोंडात असंख्य सूक्ष्म जीवाणू असतात. आपण गोड पदार्थ, साखर आणि पिष्टमय पदार्थ खातो, तेव्हा हे जीवाणू त्यातील घटकांवर प्रक्रिया करून आम्ल तयार करतात. या आम्लामुळे दातांचा बाहेरील संरक्षक थर म्हणजेच इनॅमल हळूहळू कमकुवत होऊ शकतो. कालांतराने दातांमध्ये कीड निर्माण होऊन पोकळी तयार होण्याची शक्यता असते.

दातांची स्वच्छता योग्य पद्धतीने न राखणे, जेवल्यानंतर दातांमध्ये अन्नकण अडकून राहणे, वारंवार गोड पदार्थ खाणे आणि रात्री झोपण्यापूर्वी दात न घासणे यांमुळेही दातांच्या समस्या वाढू शकतात, म्हणूनच दंतवैद्य दिवसातून दोन वेळा दात घासण्याचा सल्ला देतात.

दातांच्या आरोग्यासाठी डॉ. सलीम झैदी यांनी सांगितलेले ५ उपाय…

१. लवंग तेलाचा वापर

दातदुखीवरील पारंपरिक उपायांमध्ये लवंग तेलाचा वापर केला जातो. लवंग तेलामध्ये युजेनॉल नावाचे संयुग असते. यामध्ये वेदनाशामक आणि जंतुविरोधी गुणधर्म आढळतात, त्यामुळे दातदुखीमध्ये काही काळ आराम मिळण्यास मदत होऊ शकते. मात्र, लवंग तेल थेट आणि जास्त प्रमाणात दातांवर किंवा हिरड्यांवर लावल्यास जळजळ होऊ शकते, त्यामुळे त्याचा वापर काळजीपूर्वक करावा.

२. मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या

दात आणि हिरड्यांच्या स्वच्छतेसाठी मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करणे हा सोपा उपाय आहे. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून हे पाणी तयार करता येते. या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडातील अस्वच्छता कमी होण्यास आणि हिरड्यांची सूज किंवा जळजळ शांत होण्यास मदत होऊ शकते. मात्र, हे पाणी पिऊ नये.

३. लसूण

लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचा घटक आढळतो. त्याला जंतुविरोधी गुणधर्म असल्याचे मानले जाते, त्यामुळे लसणाचा वापर दातांच्या आरोग्याशी संबंधित काही पारंपरिक उपायांमध्ये केला जातो. मात्र, कच्चा लसूण ठेचून थेट किडलेल्या दातावर लावणे टाळावे, त्यामुळे तोंडातील नाजूक त्वचा आणि हिरड्यांना जळजळ किंवा इजा होऊ शकते. आहारात योग्य प्रमाणात लसणाचा समावेश करणे हा अधिक सुरक्षित पर्याय आहे.

४. कडुनिंबाचा वापर

कडुनिंबाचा वापर पारंपरिकरीत्या दातांच्या स्वच्छतेसाठी केला जातो. कडुनिंबामध्ये काही जंतुविरोधी घटक आढळतात. पूर्वीपासून कडुनिंबाच्या काडीचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. कडुनिंबाच्या पानांचा वापरही काही घरगुती उपायांमध्ये केला जातो.

५. अंड्याच्या कवचाची पावडर

अंड्याच्या कवचामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण मोठे असते, त्यामुळे त्याच्या पावडरचा वापर दातांच्या काळजीसाठी काही घरगुती प्रयोगांमध्ये केला जातो. डॉ. सलीम झैदी यांनीही अंड्याच्या कवचापासून पावडर तयार करण्याची कृती सांगितली आहे. यासाठी अंड्याचे कवच स्वच्छ करून उकळणे, त्यानंतर वाळवून त्याची बारीक पूड करणे अशी पद्धत सांगितली जाते. मात्र, दात स्वच्छ करण्यासाठी दंतवैद्यांनी सुचवलेली फ्लोराइडयुक्त दंतमंजनाचीच निवड करावी.

दातांची काळजी घेण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा फ्लोराइडयुक्त दंतमंजनाने दात घासावेत. गोड पदार्थ आणि शीतपेयांचे सेवन मर्यादित ठेवावे. जेवल्यानंतर तोंड स्वच्छ धुवावे आणि दातांमध्ये अन्नकण अडकणार नाहीत याची काळजी घ्यावी. नियमितपणे दंतवैद्यांकडून दातांची तपासणी करून घेणेही आवश्यक आहे.

(टीप : दातदुखीवरील काही घरगुती उपायांमुळे तात्पुरता आराम मिळू शकतो. मात्र, दातांमध्ये कीड लागून पोकळी निर्माण झाली असल्यास दंतवैद्यांकडून योग्य उपचार करून घेणे महत्त्वाचे आहे. वेदना सतत होत असल्यास, हिरड्यांना सूज येत असल्यास किंवा पू येत असल्यास तपासणीसाठी विलंब करू नका.)