Cockroaches Removal Tips:  झुरळांना पळवून लावण्यासाठी महागडे स्प्रे आणि केमिकल वापरण्याची गरज नाही. पावसाळा आपल्याबरोबर गारवा तर आणतोच, पण ओलसरपणामुळे घरांमध्ये झुरळे आणि इतर कीटक-किड्यांचा सुळसुळाट होतो. त्यातही किचनमध्ये झुरळे दिसणे ही चिंतेची बाब ठरते, कारण ते खाण्यापिण्याच्या वस्तू खराब करू शकतात. अशा वेळी दरवेळी केमिकल स्प्रे वापरणे योग्य नाही. घरात उपलब्ध असलेल्या काही सोप्या वस्तूंच्या मदतीनेही झुरळांना दूर ठेवता येते. जर तुम्हीही पावसाळ्यात या समस्येमुळे हैराण असाल, तर काही सोपे घरगुती उपाय करून किचन स्वच्छ आणि झुरळमुक्त ठेवण्यास मदत मिळेल.

पावसाळ्यात झुरळं का वाढतात?

पावसाळ्यात ड्रेनेज (नाल्या), भिंतींमधील ओलावा आणि दमट वातावरणामुळे झुरळे वेगाने घरात शिरतात. त्यातही किचनमध्ये अन्न आणि पाणी सहज उपलब्ध होत असल्याने ते सर्वात जास्त तिथेच ठाण मांडून बसतात.

झुरळं पळवण्याचे ५ सोपे घरगुती उपाय:

१. पीठ आणि बोरिक पावडरचा सोपा उपाय

एका वाटी पिठात २ चमचे साखर, १ चमचा हळद आणि २ चमचे बोरिक पावडर मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट किचनचे कोपरे, ओट्याची (स्लॅब) कडा, भिंतींमधील फटी आणि झुरळे येण्याच्या संभाव्य जागांवर लावा. या मिश्रणाचा वास आणि गुणधर्मांमुळे झुरळे दूर राहण्यास मदत होते.

२. कडुनिंबाचा स्प्रे करेल कमाल

कडुनिंबाचे तेल किंवा कडुनिंबाचे पाणी एका स्प्रे बाटलीत भरा आणि किचनसह घराच्या कानाकोपऱ्यात फवारा. कडुनिंबाचा उग्र वास आणि त्यातील नैसर्गिक गुणधर्मांमुळे झुरळांबरोबर इतर कीटकही दूर पळतात.

३. तमालपत्र (तेजपत्ता) देखील आहे प्रभावी

काही तमालपत्रे बारीक करून गरम पाण्यात मिक्स करा. हे पाणी थंड झाल्यावर ज्या ठिकाणी झुरळे जास्त दिसतात तिथे स्प्रे करा. तमालपत्राचा सुवास झुरळांना पळवून लावण्याचा एक नैसर्गिक मार्ग मानला जातो.

४. लवंगाच्या वासाने पळतील झुरळे

लवंग किंचित कुटून किचनच्या आणि घराच्या कोपऱ्यात टाकून द्या. लवंगाचा तीव्र सुगंध झुरळांना अजिबात सहन होत नाही, त्यामुळे ते त्या जागांपासून दूर राहतात. यामुळे इतर लहान कीटकांचा त्रासही कमी होतो.

५. स्वच्छता हाच सर्वात मोठा बचाव

जर तुम्हाला वाटत असेल की, झुरळे घरात वारंवार येऊ नयेत, तर किचन नेहमी स्वच्छ ठेवा. रात्रीच्या वेळी सिंकमध्ये खरकटी भांडी तशीच ठेवू नका, अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवा आणि कचऱ्याची कुंडी (डस्टबिन) नियमितपणे रिकामी व स्वच्छ करा. स्वच्छतेच्या या छोट्या सवयींमुळे झुरळांची समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.