House Flies Control Tips : पावसाळा आपल्याबरोबर गारवा तर घेवून येतोच, पण त्याबरोबरच अनेक अडचणीही घेऊन येतो. त्यातीलच एक मोठी समस्या म्हणजे माश्यांचा त्रास. या दिवसांत स्वयंपाकघर, जेवणाची जागा आणि घराच्या इतर भागांत माशा वारंवार फिरताना दिसतात, ज्या अन्नपदार्थांवर घाण आणि जीवाणू (बॅक्टेरिया) पसरवतात, ज्याने आजारी पडण्याचा धोका वाढतो. जर तुमच्याही घरात अचानक माश्यांचा उपद्रव वाढला असेल तर तुम्हाला खालील उपाय उपयुक्त ठरू शकता त.

डिजिटल क्रिएटर शशांक आल्शी यांनी एक इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी किचनमधील काही गोष्टींचा वापर करून माशा पळवण्याचा उपाय सांगितला आहे.

१. सर्वांत आधी घर ठेवा स्वच्छ

शशांक यांच्या मते, माशा सर्वांत जास्त कुजलेले अन्न, घाण आणि उग्र वास असणाऱ्या जागांकडे आकर्षित होतात, त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर अन्न, पाणी, ज्यूस किंवा कोणतेही गोड पदार्थ खाली सांडले असतील तर ती जागा त्वरित पुसून घ्या. स्वयंपाकघरात उरलेले अन्न उघडे ठेवू नका आणि कचऱ्याची बादली वेळोवेळी खाली करा. स्वच्छता राखल्यास माश्यांना घरात थांबायला जागा मिळत नाही.

२. एसी (AC) ठरेल उपयुक्त

माशांना उष्ण किंवा दमट हवामान आवडते. अशा वेळी तुम्ही घरातील एसी (AC) सुरू ठेवू शकता. एसीच्या थंड हवेमुळे माश्यांचे प्रमाण कमी होऊ शकते.

३. हा घरगुती उपाय ठरेल फायदेशीर

जर घरात माश्या खूप जास्त येत असतील तर दोन कप उकळलेले पाणी घ्या. त्यात एक चमचा मीठ आणि थोडी काळी मिरी पावडर टाकून चांगले मिसळा. हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर स्प्रे बाटलीमध्ये भरा. आता तयार लिक्विड खिडक्या, दारे आणि ज्या ठिकाणी माश्या जास्त दिसतात तिथे स्प्रे करा. हा सोपा उपाय माश्यांना दूर ठेवण्यास मदत करतो.

४. सुंठ पावडरचा करा वापर

सुंठ पावडरदेखील घरातील माश्या पळवून लावण्यास मदत करू शकते. यासाठी एका कप पाण्यात एक मोठा चमचा सुंठ पावडर (ड्राय जिंजर पावडर) मिसळा. हे द्रावण चांगले ढवळून ज्या ठिकाणी माश्या वारंवार येतात तिथे फवारा. हा घरगुती उपाय माश्या कमी करण्यासाठी खूप उपयुक्त मानला जातो.

५. साचलेले पाणी त्वरित हटवा

पावसाळ्यात बादली, कुंड्यांचा ट्रे, सिंक किंवा कोणत्याही भांड्यात साचलेले पाणी माश्यांना आणि इतर किड्यांना आकर्षित करू शकते, त्यामुळे घरात कुठेही साचलेले पाणी असेल तर ते लगेच रिकामे करा.

अशा प्रकारे स्वच्छता ठेवून आणि हे सोपे घरगुती उपाय करून तुम्ही पावसाळ्यात माश्यांच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता.