3 Ingredient Homemade Bone Health Powder: वय वाढू लागले की, शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. त्यात अनेकांना हाडांची ताकद कमी होणे, गुडघे दुखणे, कंबरदुखी व सांधेदुखी यांसारख्या तक्रारी सतावतात. विशेष म्हणजे हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वयाची पन्नाशी किंवा साठी गाठण्याची वाट पाहण्याची गरज नाही. अगदी तरुण वयापासूनच योग्य आहार आणि पोषणाकडे लक्ष दिल्यास पुढील काळात हाडांचे आरोग्य टिकवण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल, तर पोषणतज्ज्ञांनी सांगितलेली ‘या’ सोप्या घरगुती पावडरचे महत्त्व काय ते नक्की जाणून घ्या.
आजकाल कमी वयातही हाडांच्या आरोग्याशी संबंधित समस्या दिसून येतात. काही जणांना थोडीशी दुखापत झाली तरी हाडांना इजा होण्याची भीती वाटते, तर काहींना गुडघे, पाय आणि कंबरेमध्ये वारंवार वेदना जाणवतात. वाढते वय, शरीराला पुरेसे पोषण न मिळणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि जीवनशैलीतील बदल यांसारख्या अनेक कारणांचा हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वयाच्या तिशीपासूनच हाडांची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांनी हाडांच्या आरोग्यासाठी तीन पदार्थांपासून तयार होणाऱ्या एका घरगुती पावडरची कृती सांगितली आहे. विशेष म्हणजे ही पावडर तयार करण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही. मखाना, पांढरे तीळ व खसखस या तीन पदार्थांचा वापर करून ही पावडर तयार करता येते. हे तिन्ही पदार्थ पोषक घटकांनी समृद्ध असल्याने संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा समावेश करता येऊ शकतो.
हाडांच्या आरोग्यासाठी पावडर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- एक वाटी मखाना
- एक वाटी पांढरे तीळ
- एक वाटी खसखस
- आवश्यकतेनुसार कोमट दूध
घरच्या घरी कशी तयार कराल पावडर?
सर्वप्रथम मखाना, पांढरे तीळ व खसखस हे तिन्ही पदार्थ वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्या. पदार्थ भाजताना ते करपणार नाहीत, याची काळजी घ्या. भाजल्यानंतर हे पदार्थ पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून त्यांची बारीक पूड तयार करा.
तयार झालेली पावडर स्वच्छ आणि कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवा. हा डबा थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावा. पावडरमध्ये ओलावा जाणार नाही, याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे घरच्या घरी पौष्टिक घटकांनी युक्त पावडर तयार होईल.
पावडरचे सेवन कसे करावे?
ही पावडर कोमट दुधात मिसळून घेता येते. दुधाच्या एका ग्लासात आवडीनुसार किंवा पचेल इतक्या प्रमाणात पावडर घालून व्यवस्थित मिसळा. त्यानंतर या मिश्रणाचे सेवन करा. मात्र, प्रत्येकाची पचन क्षमता आणि आहाराच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात सेवन करणे योग्य ठरू शकते.
मखाना, पांढरे तीळ व खसखस हाडांसाठी कसे उपयुक्त?
पांढऱ्या तिळांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात. हाडांच्या रचनेसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी ही खनिजे महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात तिळांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते.
खसखसमध्येही कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व मँगनीज यांसारखे घटक आढळतात. हे घटक हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषणात हातभार लावतात. त्यामुळे खसखस केवळ चवीसाठीच नव्हे, तर पोषणमूल्यांसाठीही आहारात वापरली जाते.
मखान्यामध्ये प्रथिने आणि काही खनिज घटक असतात. त्यामुळे तो पौष्टिक आहाराचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मखाना, तीळ व खसखस या तिन्ही पदार्थांचा एकत्रित वापर केल्याने आहारात विविध पोषक घटकांचा समावेश होतो. दुधातूनही कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात. त्यामुळे या पदार्थांचे मिश्रण आहारात घेता येऊ शकते.
हाडांची काळजी घेण्यासाठी आणखी काय कराल?
हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केवळ एका पावडरवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. आहारात कॅल्शियम आणि प्रथिनांचे योग्य प्रमाण असणे, शरीराला पुरेसे जीवनसत्त्व ड मिळणे, नियमित चालणे आणि वजन पेलणारे व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे. सूर्यप्रकाशातून ड जीवनसत्त्व मिळण्यास मदत होते. तसेच पुरेशी झोप आणि संतुलित जीवनशैली यांकडेही लक्ष द्यावे.
(टीप : ही पावडर पौष्टिक आहाराचा एक भाग म्हणून घेता येऊ शकते. मात्र, तिच्यामुळे सांधेदुखी किंवा हाडांचे आजार बरे होतील अथवा हाडे ठरावीक काळात मजबूत होतील, असा दावा करता येत नाही. सतत सांधेदुखी, हाडांमध्ये वेदना किंवा किरकोळ दुखापतीतही फ्रॅक्चर होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कॅल्शियम किंवा ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास आवश्यक ती तपासणी करून योग्य ते उपचार घेणे महत्त्वाचे आहे.)
