recipes : मधल्या वेळेला भूक लागलीय? पटकन होतील असे पौष्टिक पदार्थ…

पोटभरीचे आणि रुचकरही

संग्रहित छायाचित्र)

मसाला चपाती

साहित्य :
चपात्या – २ शिळ्या किंवा ताज्या
कांदा – १ बारीक चिरलेला
टोमॅटो – १ बारीक चिरलेला
हिरवी मिरची – १ बारीक चिरलेली
कोथिंबीर – १/४ वाटी बारीक चिरलेली
लिंबाचा रस – १/२ लिंबू
तिखट – १/४ चमचा
जिरे – १/४ चमचा
मीठ – चवीप्रमाणे
चीज – एक क्यूब किसलेले
बटर – २ चमचे

कृती :
चीज आणि चपाती सोडून बाकी सर्व जिन्नस नीट एकत्र करून घ्या. तवा गरम करून त्यावर थोडे बटर घाला. वर चपाती ठेवून अर्ध्या भागावर मसाला भरा. त्यावर थोडे चीज पसरा आणि चपाती दुमडून घ्या. खालच्या बाजूने चपाती नीट भाजून घ्या. नंतर उलटून परत नीट कुरकुरीत (क्रिस्पी) होईपर्यंत भाजा. वर परत चीज घालून सव्‍‌र्ह करा.

मुगाचे चिल्ले
साहित्य :
सालासकट मुगाची डाळ – १ ते दीड वाटी – ४ तास भिजवलेली
लसूण – २-३ पाकळ्या
आलं – १ इंच
हिरवी मिरची – २-३ किंवा चवीप्रमाणे
हळद – १/४ चमचा
हिंग – चिमूटभर
कांदा – १ लहान बारीक चिरलेला
कोथिंबीर – १/४ वाटी
मीठ – चवीप्रमाणे
तेल – गरजेप्रमाणे
चटणी आणि दही – सर्व्हींगसाठी

कृती :
प्रथम मुगाची डाळ, लसूण, आलं आणि मिरची एकत्र करून पाणी घालून नीट वाटून घ्या. डोशाच्या पिठाप्रमाणे करा. त्यात हळद, मीठ, कांदा आणि कोथिंबीर मिसळा. तवा गरम करून त्यावर डोशाप्रमाणे चिल्ली करून घ्या. तळताना बाजूने तेल सोडा. दोन्ही बाजूनी नीट परतून घ्या. चटणी, सॉस किंवा दह्याबरोबर गरम गरम सव्‍‌र्ह करा.

नाचणीचे घावन
साहित्य :
नाचणीचे पीठ – १ वाटी
टोमॅटो – १ बिया काढून बारीक चिरलेला
कांदा – १ बारीक चिरलेला
कोथिंबीर – १/४ वाटी बारीक चिरलेली
हिरवी मिरची – ३-४ बारीक चिरलेली
धणे-जिरे पावडर – १/२ चमचा
मीठ – चवीप्रमाणे
तेल – गरजेप्रमाणे

कृती :
तेल सोडून सर्व साहित्य एकत्र करून घावनाच्या पिठाप्रमाणे भिजवा. तव्यावर तेल लावून घावन घाला. वर झाकण ठेवून एका बाजूने नीट भाजून घ्या. नंतर तो उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या. खोबऱ्याच्या चटणीबरोबर गरम सव्‍‌र्ह करा.
टीप :नारळाचे दूध, वेलची पावडर आणि गूळ वापरून गोड घावनही करता येतात. फक्त तेव्हा तेलाऐवजी साजूक तूप वापरावे.

लाल भोपळ्याचे थेपले
साहित्य :
लाल भोपळा – २ वाटय़ा किसून वाफवलेला
कणीक – २ वाटय़ा
जिरा पावडर – १ चमचा
कोथिंबीर – १/२ वाटी चिरलेली
हिरवी मिरची – ४-५ बारीक चिरलेल्या
हळद – १/२ चमचा
मीठ – चवीप्रमाणे
साखर – १ चमचा
दही – १/२ वाटी
तेल – मोहनासाठी
साजूक तूप – सर्व्हींगसाठी
कृती :
प्रथम वाफवलेला भोपळा, कणीक, जिरा पावडर, हळद, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, साखर, तेलाचे मोहन आणि दही घालून नीट एकत्र करा. थोडं पाणी घालून कणीक छान मळून घ्या. अर्धा तास झाकून ठेवा. सारख्या मापाचे गोळे करून ठेपले करा. दोन्ही बाजूनी नीट भाजून वर तूप लावा. दह्याबरोबर सव्‍‌र्ह करा.

ओट्स कटलेट
साहित्य :
ओट्स – १ कप भाजून घ्या
मूगडाळ – १/२ कप धुऊन भिजवलेली
कांदा – १ बारीक चिरलेला
हिरवी मिरची – २-३ बारीक चिरून
कोथिंबीर – १/२ वाटी बारीक चिरलेली
चाट मसाला – १ चमचा
तेल – तळण्यासाठी
पुदिना चटणी – सर्व्हींगसाठी
दही – २ टेबलस्पून
मीठ – चवीपुरते
कृती :
मुगाची डाळ वाफवून घ्या आणि रवाळ वाटून घ्या. त्यात ओट्स, कांदा, मिरची, कोथिंबीर, मीठ आणि दही एकत्र करा. जरूर वाटल्यास थोडं दही आणखी घाला. कटलेटचा आकार देऊन पॅनमध्ये थोडय़ा तेलात शॅलोफ्राय करा. पुदिना चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा.
अलका फडणीस – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Homemade healthy and testy recipes

ताज्या बातम्या