DIY Quick & Free Organic Fertilizer from Kitchen Waste : पूजेदरम्यान देवाऱ्यातील देवी-देवतांना ताजी फुले अर्पण करणे हा आपल्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो; पण दुसऱ्या दिवशी ती फुलं कोमेजतात. त्यामुळे ती काढून नद्या आणि तलावांमध्ये विसर्जित केली जातात किंवा कचऱ्यात टाकली जातात. पण, फार कमी लोकांना माहीत आहे की, ती फुले निरुपयोगी नाहीत; ती अनेक घरगुती कामांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. बागकाम करण्यासाठी ही फुलं विशेषतः उपयुक्त ठरू शकतात.

फुलांमध्ये नैसर्गिक पोषक घटक असतात, जे मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. तुम्ही त्यांचा वापर घरी सेंद्रिय खत तयार करण्यासाठी करू शकता. जर तुमच्या बाल्कनी किंवा बागेतील झाडं सुकत असतील, कोमेजत असतील, तर हे नैसर्गिक खत खूप फायदेशीर ठरू शकते. ते झाडांना आवश्यक पोषण प्रदान करते आणि त्यांची वाढ सुधारते. त्यामुळे केवळ तुमचे पैसेच वाचत नाहीत, तर पर्यावरणाचे नुकसानदेखील टाळते. पण, या फुलांपासून सेंद्रिय खत कसे बनवायचे जाणून घेऊ.

१) फुलं गोळा करण्याची योग्य पद्धत

दररोजच्या पूजेत अर्पण केलेली फुलं काही दिवसांसाठी वेगळी गोळा करायला सुरुवात करा. प्लास्टिक, धागा, फॉईल, रिबन किंवा अगरबत्ती यांसारख्या कोणत्याही गोष्टी फुलांमध्ये ठेवू नका. त्यांना फुलांपासून वेगळे करा. कारण- त्या वस्तू कुजत नाहीत आणि कंपोस्टिंग खत प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यानंतर वेगळ्या केलेल्या फुलांचे लहान तुकडे करा किंवा हातांनी ती हलकीच कुस्करून टाका. असं केल्यानं फुलं लवकर कुजतात आणि कंपोस्टिंगची प्रक्रियादेखील जलद होते. जर मोठ्या प्रमाणात फुलं, गोळा केली गेली असतील तर ती झाकलेल्या बॉक्स किंवा बादलीत साठवा.

Award Banner

२) खत बनवण्याची पहिली पायरी

जुनी कुंडी, बादली, ड्रम किंवा मोठे प्लास्टिकचे कंटेनर घ्या. कंटेनरच्या तळाशी लहान छिद्रे करा, जेणेकरून हवा खेळती राहील. तसेच जास्तीचे पाणी त्यातून बाहेर पडेल. त्यामुळे कंपोस्टिंग प्रक्रिया सुधारेल. प्रथम कंटेनरमध्ये कोरड्या पानं, कागदाचा तुकडा किंवा थोड्या मातीचा पातळ थर पसरवा.

३) फुलांसह ‘या’ गोष्टींचा करा वापर

​​कंपोस्टिंग खत प्रक्रिया सुरू करण्यासाठी हा थर आवश्यक आहे. कारण- त्यामुळे खाली संतुलित ओलावा राखण्यासदेखील मदत होते. आता त्यावर गोळा केलेल्या फुलांचा थर पसरवा. स्वयंपाकघरातील कचरा (भाज्या आणि फळांच्या साली आणि चहा पावडर)देखील त्यात घालता येतो. त्यामुळे कंपोस्ट खतामध्ये अधिक पोषक घटक मिळतात, ज्यामुळे ते झाडांसाठी अधिक प्रभावी बनते. आता या फुलांवर थोडी माती टाका. त्यामुळे दुर्गंधी येण्यापासून बचाव होतो आणि कुजण्याची प्रक्रियादेखील संतुलित राहते.

४) नैसर्गिक कंपोस्ट तयार होण्यासाठी किती दिवस लागतात?

जेव्हा कंटेनरमध्ये फुले, माती आणि स्वयंपाकघरातील कचऱ्याचे थर टाकले जातात तेव्हा त्यावर थोडेसे पाणी शिंपडा. जास्त पाणी घालू नका; फक्त मिश्रण थोडे ओले राहण्यासाठी पुरेसा ओलावा मिळेल, असे पाहा. जास्त पाणी टाकल्याने कंपोस्ट खताला वास येऊ शकतो. हे कंटेनर सावलीत असलेल्या ठिकाणी ठेवा. दर तीन-चार दिवसांनी लाकडी काठीने हे मिश्रण हलक्या हाताने फिरवा. त्यामुळे त्यातील हवा मोकळी होईल. तसेच फुलांतील घटकांचे जलद आणि चांगल्या रीतीने विघटन होते. हे सेंद्रिय कंपोस्ट तयार होण्यास २० ते ३० दिवस लागू शकतात. त्यानंतर फुलं आणि इतर सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे विघटित होतात आणि मातीसारखे खत तयार होते, जे तुमच्या झाडांसाठी नैसर्गिक आणि पौष्टिक खत असते.

५) कसे वापरावे?

कंपोस्ट खत पूर्णपणे तयार झाल्यावर, ते कुंडीत किंवा बागेच्या मातीत मिसळता येते. प्रत्येक कुंडीत एक ते दोन मूठभर कंपोस्ट खत पुरेसे आहे. कुंडीतून थोडी माती काढा आणि हे नैसर्गिक कंपोस्ट मातीत पूर्णपणे मिसळा. त्यानंतर माती पुन्हा कुंडीत टाका आणि वर थोडे पाणी शिंपडा. त्यामुळे झाडांना आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. त्यांची मुळे मजबूत होतात. पाने हिरवी राहतात आणि झाड जलद वेगाने वाढते.