Ayurvedic Tips For Cough: बदलत्या हवामानामुळे लोकांना सर्दी, खोकला आणि इतर विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. बरेच लोक यासाठी औषधे घेतात, मात्र कधीकधी आयुर्वेदिक उपायांमुळे अनेक किरकोळ समस्यांवर उपाय देखील मिळू शकतात. आयुर्वेदात मध हे एक विशेष गुणकारी औषध मानले जाते आणि योग्य घटकांसह ते मिसळून त्याचे सेवन केल्यास शरीराला असंख्य फायदे देऊ शकते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि छातीतील घट्ट कफ कमी करण्यासाठी मध सर्वात उत्तम मानले जाते.

‘या’ गोष्टी मधात मिसळा

आयुर्वेदात मधाला योगवाही म्हणतात. म्हणजेच मधासोबत जे काही घेतले जाते त्याचे गुणधर्म शरीरात शोषून घेण्यास ते मदत करते. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ते घसा खवखवणे आणि खोकल्यापासून आराम देतात. हळद आणि काळी मिरी मधामध्ये मिसळून खाल्ल्याने खोकला, सर्दी आणि कफच्या समस्यांपासून आराम मिळतो. हे मिश्रण रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसंच खोकला आणि सर्दी बरे करण्यासाठी गुणकारी ठरते. जर खोकला आणि सर्दी खूप तीव्र असेल तर तुम्हाला या मिश्रणाचा तेवढा फायदा होऊ शकत नाही. आयुर्वेदानुसार, या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे शरीराला आतून उबदारपणा देतात. त्यामुळे छातीत साचलेला कफ हळूहळू काढून टाकण्यास मदत होते.

हळद फायदेशीर

भारतात हळदीचा वापर नेहमीच स्वयंपाकासाठी म्हणून केला जातो. हळदीतील कर्क्यूमिन घटक जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. मधासह घेतल्यास, घशातील जळजळ आणि छातीत जळजळ कमी करण्यास हळद उपयुक्त ठरू शकते.

काळी मिरी देखील फायदेशीर

काळी मिरी कफ कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे. आयुर्वेदानुसार, काळी मिरी शरीरातील श्लेष्मा सैल करते त्यामुळे कफ बाहेर काढणे सोपे होते. काळी मिरी पचनक्रिया देखील सुधारते, तसंच बंद नाक आणि सर्दीशी संबंधित जडपणापासून आराम देऊ शकते. हा उपाय तयार करण्यासाठी, एक चमचा शुद्ध मध घ्या आणि त्यात एक चिमूटभर हळद पावडर आणि एक चिमूटभर काळी मिरी घाला. ते चांगले मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी चाटण घ्या. यामुळे घसा आणि छातीत साचलेला कफ हळूहळू कमी होईल आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.