Oesophagus Cancer: चहा किंवा कॉफीसारखी पेये सहसा खूप गरम पिणेच अनेकांना आवडते. मात्र, काही वेळा लोक ही पेये इतकी गरम पितात की घसा जळल्यासारखे वाटते. खरं तर, घसा जळण्याची ही भावना शरीराकडून मिळणारा इशारा असू शकतो. यामुळे होणारे थर्मल डॅमेज म्हणजेच उष्णतेमुळे होणारे नुकसान अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका वाढवू शकते.
‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर’मध्ये प्रकाशित झालेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात असे आढळून आले की, खूप गरम पेये पिणाऱ्या लोकांमध्ये कोमट पेये घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत कॅन्सरचा धोका ३ पटीने जास्त आढळला.
खूप गरम पेये घशातून पोटात जातात. घशातून खाली जाताना या पेयांमुळे अन्ननलिकेच्या आतील थराला नुकसान होऊ शकते.
किती गरम पेयांमुळे कॅन्सरचा धोका वाढतो?
अभ्यासात संशोधकांना असे आढळले की, ६५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानाची पेये खूप गरम आणि संभाव्य धोका निर्माण करणारी मानली जातात. संशोधकांच्या मते, लोकांनी खूप गरम पेये पिणे टाळले तर दर १० पैकी १ ते २ अन्ननलिकेच्या कॅन्सरची प्रकरणे टाळता येऊ शकतात. मात्र, खूप गरम पेये प्यायल्याने कॅन्सर होईलच असे निश्चित नाही. पण यामुळे अन्ननलिकेच्या आतील भागाला नुकसान होऊ शकते.
अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची कारणे काय?
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही जोखमीचे घटक म्हणजेच रिस्क फॅक्टर्स आहेत, ज्यामुळे अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो.
तंबाखू किंवा दारूचे सेवन केल्यामुळे अन्ननलिकेच्या आतील थरातील पेशींच्या डीएनएचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. याशिवाय, अन्ननलिकेच्या आतील थराला दीर्घकाळ जळजळ किंवा त्रास होत राहिल्यास त्याचाही डीएनएवर परिणाम होऊ शकतो.
वय वाढणे, तंबाखूचे सेवन करणे, दारू पिणे, शरीराचे वजन जास्त असणे, गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) किंवा आनुवंशिक सिंड्रोम्स हे अन्ननलिकेच्या कॅन्सरचे काही सामान्य रिस्क फॅक्टर्स आहेत.
अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे कोणती?
- गिळताना त्रास होणे
- छातीत जळजळ जाणवणे
- छातीमध्ये दुखणे किंवा दाब जाणवणे
- आवाजात बदल होणे
- अचानक वजन कमी होणे
- उलटीतून रक्त येणे
- सतत खोकला येणे
यापैकी कोणतेही लक्षण दिसत असेल आणि अन्न गिळताना त्रास होत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यास उशीर करू नका.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
