घरातील काने-कोपरे, जुने स्टोरेज रूम, गॅरेज, शेड्स किंवा बागेतील झुडपांमध्ये फिरणारे उंदीर अनेकदा सामान्य समस्या वाटते. मात्र, काही परिस्थितींमध्ये हेच उंदीर गंभीर आणि जीवघेणा ठरू शकणारा संसर्ग पसरवू शकतात. त्यापैकी एक म्हणजे हंता व्हायरस (Hantavirus) जो दुर्मिळ असला तरी अत्यंत गंभीर आजार निर्माण करू शकतो.
विशेषतः साफसफाईच्या काळात, बंद खोली उघडताना किंवा धूळ साचलेल्या ठिकाणी काम करताना या संसर्गाचा धोका वाढतो. प्रत्येक घरातील उंदीर धोकादायक नसतो, पण काही विशिष्ट वन्य उंदीर प्रजातींमध्ये हा विषाणू आढळू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
प्रत्येक उंदीर धोकादायक नसतो (Not Every Mouse is Dangerous)
तज्ज्ञांच्या मते घरात दिसणारे सर्व उंदीर हंता व्हायरस पसरवत नाहीत. या विषाणूचा संबंध प्रामुख्याने काही विशिष्ट वन्य उंदरांशी आहे.
डॉ. सुचिस्मिता राजमान्य, लीड कन्सल्टंट आणि विभाग प्रमुख – अंतर्गत औषधशास्त्र, अॅस्टर व्हाइटफील्ड हॉस्पिटल यांच्या म्हणण्यानुसार,“घर, बाग, शेड किंवा ग्रामीण भागात आढळणारे काही वन्य उंदीर हंता व्हायरसचे वाहक असू शकतात. विशेषतः डिअर माईस(deer mice). Deer mice म्हणजे उत्तर अमेरिकेत आढळणारी लहान वन्य उंदरांची एक प्रजाती (Peromyscus maniculatus) जी हंता व्हायरसचा नैसर्गिक मुख्य वाहक म्हणून ओळखली जाते. मात्र शहरातील घरातील उंदीर सामान्यतः हा आजार पसरवत नाहीत.”
उत्तर अमेरिकेसारख्या भागात deer mice हा मुख्य वाहक असल्याचे सीडीसी (रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र) स्पष्ट करते. संशोधनानुसार काही भागांतील १०–१४% deer mice विषाणू बाळगू शकतात, परंतु ते स्वतः आजारी दिसत नाहीत.
संसर्ग कसा होतो? (How the Infection Spreads)
हंता व्हायरसचा संसर्ग थेट उंदीर चावल्यामुळे किंवा संपर्कामुळे क्वचितच होतो. मुख्य धोका हा हवेतून होतो.
डॉ. राजमान्य स्पष्ट करतात,की उंदरांच्या मूत्र, लाळ, विष्ठा किंवा घरट्यांमधून बाहेर पडलेल्या कणांमुळे हंता व्हायरस पसरतो. कोरड्या धुळीची साफसफाई करताना हे सूक्ष्म कण हवेत मिसळतात आणि श्वसनाद्वारे शरीरात जातात.”
या प्रक्रियेला aerosol transmission (एरोसोल टान्समिशन) म्हणतात. विशेषतः जुनी स्टोरेज रूम, गॅरेज, लाकूड साठवण्याची जागा किंवा बंद शेड्स उघडताना धोका वाढतो.
महत्त्वाचे म्हणजे, सामान्य बाहेरील वातावरणात या विषाणूचा धोका तुलनेने कमी असतो. पण बंद आणि दुर्लक्षित जागांमध्ये तो वाढू शकतो.
साफसफाई करताना सर्वाधिक धोका (Risk During Cleaning Activities)
अनेक संसर्ग हे साध्या घरगुती कामांदरम्यान होतात. उदाहरणार्थ—
- जुने कपाट उघडणे
- गॅरेज झाडणे
- शेड किंवा स्टोरेज साफ करणे
- लाकूड किंवा गोदामातील वस्तू हलवणे
- उंदरांचे बीळ साफ करणे
या सर्व परिस्थितींमध्ये धूळ उडते आणि विषाणू हवेत पसरू शकतो.
CDC च्या मार्गदर्शनानुसार कोरड्या झाडून (dry sweeping) सफाई करणे किंवा व्हॅक्यूमिंग टाळणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे विषाणू हवेत अधिक प्रमाणात पसरतो.
हंता व्हायरस का गंभीर मानला जातो? (Why Hantavirus is Considered Serious)
हंता व्हायरस दुर्मिळ असला तरी त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. सुरुवातीची लक्षणे सामान्य फ्लूसारखी दिसतात, त्यामुळे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात.
लक्षणांमध्ये समावेश होतो:
- ताप
- थकवा
- स्नायू दुखणे
- डोकेदुखी
- मळमळ किंवा उलट्या
- चक्कर येणे
पण काही दिवसांत परिस्थिती गंभीर होऊ शकते.
डॉ. राजमन्य यांच्या मते, “हंताव्हायरस pulmonary syndrome (HPS) मध्ये मृत्यूदर सुमारे ३८% पर्यंत जाऊ शकतो, विशेषतः श्वसनाच्या त्रासाची सुरुवात झाल्यावर.”
या स्थितीत फुफ्फुसांमध्ये द्रव साचू शकतो आणि श्वास घेणे कठीण होते. रुग्णांना तातडीने हॉस्पिटलायझेशनची गरज भासते.
NIH (National Institutes of Health) नुसार, लवकर निदान आणि योग्य सपोर्टिव्ह केअर दिल्यास रुग्णाच्या बरे होण्याची शक्यता वाढते.
बागा, शेड्स आणि स्टोरेज रूम्सचा धोका (Risk in Gardens, Sheds and Storage Areas)
उंदीर शांत, अंधार आणि अन्न सहज मिळणाऱ्या जागा पसंत करतात. त्यामुळे खालील ठिकाणी धोका वाढतो:
- बागेतील शेड्स
- जुने बॉक्स आणि पेपर स्टोरेज
- पाळीव प्राण्यांचे अन्न ठेवण्याची जागा
- कंपोस्ट एरिया
- वापरात नसलेली कपाटे
विशेषतः पावसाळ्यानंतर किंवा थंड हवामानात उंदीर घराजवळ येण्याची शक्यता वाढते.
धोक्याची चिन्हे:
- कोपऱ्यांत लहान विष्ठा
- कागद/कापडाचे तुकडे
- लाकडावर चावल्याचे खुणा
- बंद जागेत दुर्गंधी
- अन्नाजवळ उंदरांच्या हालचाली
सुरक्षित साफसफाई कशी करावी? (Safe Cleaning Practices)
तज्ज्ञांच्या मते घाई न करता योग्य पद्धतीने साफसफाई करणे महत्त्वाचे आहे.
डॉ. राजमन्य सांगतात, “हंता व्हायरसपासून बचावासाठी योग्य स्वच्छता पद्धती, संरक्षणात्मक साधनांचा वापर आणि घरात उंदरांचा प्रवेश रोखणे अत्यंत आवश्यक आहे.”
सुरक्षित उपाय:
- खोलीत ३० मिनिटे हवेशीर वातावरण तयार करणे
- हातमोजे आणि मास्क वापरणे
- विष्ठेवर आधी जंतुनाशक किंवा ब्लीच स्प्रे करणे
- कोरडी झाडणी टाळणे
- पेपर टॉवेलने साफ करणे
- कचरा बंद पिशवीत टाकणे
- हात साबणाने नीट धुणे
EPA (Environmental Protection Agency) देखील घरातील भिंतीतील भेगा, पाईप्स आणि दरवाज्यांभोवतीची उघडी जागा बंद करण्याचा सल्ला देते.
निष्कर्ष: भीती नाही, जागरूकता महत्त्वाची (Awareness, Not Fear)
उंदीर हा घरातील सामान्य त्रास वाटत असला तरी काही परिस्थितींमध्ये तो गंभीर आरोग्य धोका निर्माण करू शकतो. मात्र सर्व उंदीर हंता व्हायरस पसरवत नाहीत आणि योग्य स्वच्छता पद्धती वापरल्यास धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
हंता व्हायरससारखे आजार आपल्याला पर्यावरण आणि आरोग्य यांचा संबंध किती जवळचा आहे हे दाखवतात. त्यामुळे घाबरण्यापेक्षा जागरूक राहणे आणि सुरक्षित स्वच्छता सवयी पाळणे हेच सर्वोत्तम संरक्षण आहे.
