Hot Food Packed In Plastic Container Causing Cancer: सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण बाहेर खाण्या-पिण्याला प्राधान्य देतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातून आल्याचा चहा मागवणे किंवा ऑफिसमध्ये बसून पॅकेज्ड फूड किंवा स्ट्रीट फूड खाणे ही एक सामान्य बाब झाली आहे. बाहेरून खाण्याचे पदार्थ मागवले की त्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्लास्टिकचा वापर हा असतोच. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या प्ला्टिकच्या पिशव्या किंवा कपमध्ये तुम्ही हे गरम पदार्थ पॅक करता ते तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक असू शकतात? तज्ज्ञांच्या मते, ही सवय भविष्यात गंभीर धोका निर्माण करू शकते. तुमच्या आरोग्याला आतून नुकसान पोहोचवू शकते आणि कॅन्सरला देखील कारणीभूत ठरू शकते. प्लास्टिक हे आरोग्यासाठी एक सायलेंट किलर ठरू शकते.

जेव्हा अन्न ६० डिग्रीपेक्षा जास्त तापमानाला प्लास्टिकच्या आवरणात पॉलीथिलीनमध्ये किंवा प्लास्टिकच्या कपमध्ये ठेवले जाते, तेव्हा प्लास्टिकच्या आवरणातून अनेक हानिकारक रसायने बाहेर पडतात. या हानिकारक रसायनांमध्ये फॅथलेट्स, बिस्फेनॉल ए, मायक्रोप्लास्टिक्स आणि स्टायरीन मोनोमर्स यांचा समावेश होतो. ही रसायने सूक्ष्म असतात. मात्र त्यांचा शरीरावर परिणाम खूपच हानिकारक असू शकतो. ही रसायने दररोज तुमच्या शरीरात प्रवेश करत असल्याने तुम्हाला लगेच काही लक्षणे जाणवणार नाहीत. मात्र कालांतराने ही रसायने तुमच्या हार्मोनल प्रणालींवर नकारात्मक परिणाम करतात. त्यामध्ये एस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, थायरॉईड हार्मोन्स आणि इन्सुलिन यांचा समावेश आहे. या हार्मोन्समधील असंतुलन तुमच्या संपूर्ण शरीराच्या प्रणालीमध्ये व्यत्यय आणू शकते आणि कॅन्सरसह गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते.

प्लास्टिकमध्ये अन्न खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कसा वाढू शकतो?

प्लास्टिक फॉइल, पॉलिथिन किंवा प्लास्टिक कपमध्ये अन्न पॅक केल्याने प्लास्टिकच्या थरातून अनेक हानिकारक रसायने अन्नात प्रवेश करतात. ही हानिकारक रायने हार्मोनल असंतुलन, पुरूष आणि महिलांमध्ये प्रजनन क्षमता कमी होणे, जलद वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा आणि झोपेचा त्रास, इन्सुलिन प्रतिरोध आणि टाइप २ डायबिटीजसाठी जबाबदार असतात. ते प्रोस्टेट, ब्रेस्ट कॅन्सर आणि थायरॉईड कॅन्सरचा धोकादेखील वाढवू शकतात.

अनेक संशोधनातूंन असे दिसून आले आहे की, प्लास्टिकमध्ये आढळणारे बीपी, फॅथलेट्स आणि मायक्रोप्लास्टिक्स सारखी रसायने शरीरात प्रवेश केल्यावर ऑक्सिडेटिव्ह ताण, डीएनए नुकसान आणि हार्मोनल असंतुलन निर्माण करतात आणि हे कॅन्सरच्या सुरूवातीची लक्षणं मानली जातात.