एकदा आरोग्य बिघडले ते पुन्हा बरे करणे हे काही अशक्य गोष्ट नाही. सुनैना रोशन या त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. ग्रेड ३ फॅटी लिव्हर सारख्या गंभीर आजाराचा सामना केल्यानंतर त्यांनी केवळ आजारावर नियंत्रण मिळवले नाही, तर आपली जीवनशैलीदेखील पूर्णपणे बदलली. जंक फूड, मद्यपानाची सवय सोडल्यापासून आरोग्यदायी शरीर मिळवण्यापर्यंतचा प्रवास प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणा आहे जे चुकीच्या जीवनशैलीमुळे त्रस्त आहेत. ५४ वर्षी सुनैना रौशन यांना फॅटी लिव्हर रिव्हर्स करण्यात यश मिळवण्यासाठी हिंमतीबरोबर शिस्तीची गरज होती. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, शिस्तीमुळे माझा जीव वाचला. त्यांनी सांगितले की मला जंक फूड खाण्याचे व्यसन लागले होते आणि मद्यपानाची सवयीमुळे ते व्यसन आणखीच वाढले. मला कळालेच नाही की त्याचा माझ्या शरीरावर किती गंभीर परिणाम झाला.
चित्रपट निर्माता आणि अभिनेता हृतिक रोशनची बहीण, सुनैनाने सांगितले की, फॅटी लिव्हरचे निदान झाल्यावर तिने नियमित व्यायाम करण्यास सुरुवात केली, आरोग्यदायी आणि चविष्ट घरगुती जेवण खाल्ले आणि आपल्या आरोग्याला प्राधान्य दिले. सुनैनाने सांगितले, “मी व्यायाम केला, सक्रिय राहिले आणि ज्या दिवशी मला इच्छा नव्हती त्या दिवशीही स्वतःला झोकून दिले.” तिच्या अढळ निर्धाराच्या जोरावर, तिने तिच्या ग्रेड ३ फॅटी लिव्हरच्या स्थितीवर यशस्वीपणे मात केली. सुनैनाने फॅटी लिव्हरवर मात करण्यासाठी वापरलेली पद्धत खरोखरच व्यवहार्य आहे की नाही, हे समजून घेण्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊया.
तज्ज्ञ काय सांगतात?
वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील यकृत प्रत्यारोपण आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जन डॉ. स्वप्निल शर्मा यांनी ‘सुनैनाच्या मताला दुजोरा दिला आणि सांगितले की,”योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे खूप महत्त्वाचे आहे. सुनैनाला फॅटी लिव्हरचा गंभीर आजार होता, जो त्यांनी बरा केला. योग्य वेळी उपचार आणि जीवनशैलीत बदल केल्यास फॅटी लिव्हरची स्थिती लक्षणीयरीत्या सुधारू शकते. कायमस्वरूपी नुकसान म्हणजेच सिरोसिस होण्यापूर्वी उपचार आणि बदल सुरू केल्यास ही स्थिती पूर्ववत करता येते. यकृत स्वतःहून बरे होऊ शकते, परंतु त्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. वजन कमी करणे, चांगला आहार घेणे आणि मद्यपान कमी करणे हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत.
बरे होण्यासाठी शिस्त किती महत्त्वाची आहे?
फॅटी लिव्हर एका दिवसात होत नाही आणि एका दिवसात बरा देखील होत नाही. डॉ. शर्मा यांच्या मते, नियमित व्यायाम, आरोग्यदायी आहार आणि मद्यपान व प्रक्रिया केलेले अन्न टाळल्याने यकृताला बरे होण्यासाठी योग्य वातावरण मिळते. येथे शिस्त म्हणजे परिपूर्ण असणे नव्हे, तर दररोज कठोर प्रयत्न करणे होय.
फॅटी लिव्हरची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा?
फॅटी लिव्हर बरा करण्यासाठी आहारात साधे आणि संतुलित घरगुती जेवण समाविष्ट केले पाहिजे. आहारात अधिक भाज्या, पुरेसे प्रथिने, संपूर्ण धान्य आणि आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. या सर्व पद्धती यकृतामध्ये साठलेली चरबी कमी करण्यास मदत करतात. फॅटी लिव्हरमधून बरे होण्यासाठी काही विशिष्ट पदार्थ टाळणे देखील महत्त्वाचे आहे. आहारात साखर, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि तळलेले पदार्थ टाळावेत. अनेक लोक साखरयुक्त पेये आणि पॅकेज केलेल्या पदार्थांच्या दुष्परिणामांना कमी लेखतात, जरी ते फॅटी लिव्हरची स्थिती आणखी बिघडवू शकतात.
फॅटी लिव्हरची स्थिती सुधारण्यासाठी व्यायाम किती प्रभावी आहे?
डॉ. शर्मा म्हणाले की, या संपूर्ण प्रक्रियेत शारीरिक हालचाल हे सर्वात प्रभावी शस्त्र मानले जाते. यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते, साठलेली चरबी जळते आणि यकृतातील चरबी थेट कमी होते. जलद चालणे, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा सायकलिंग यांसारख्या मध्यम स्वरूपाच्या हालचाली नियमितपणे केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. हे खूप तीव्र न करता, सातत्यपूर्ण ठेवणे महत्त्वाचे आहे.
फॅटी लिव्हरवर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ आहार आणि व्यायाम पुरेसे नसून नियमित आरोग्य तपासणी, पुरेशी झोप आणि ताणतणाव कमी करणे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, दर ६ ते १२ महिन्यांनी लिव्हर फंक्शन चाचणी करून यकृताची स्थिती तपासणे गरजेचे आहे. तसेच दिवसभर पुरेसे पाणी पिणे, उशिरापर्यंत जागरण टाळणे आणि ध्यान किंवा योगासारख्या पद्धतींचा अवलंब केल्यास शरीराची कार्यक्षमता सुधारते. या छोट्या पण सातत्यपूर्ण सवयी दीर्घकाळात यकृत निरोगी ठेवण्यास आणि फॅटी लिव्हरची पुनरावृत्ती टाळण्यास मोठी मदत करतात.
