flies Control at Home : हळूहळू गारठा कमी होऊन उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. परिणामी, डास आणि माश्यांची संख्यासुद्धा वाढू लागली आहे. घरात, स्वयंपाकघरात फळे आणि भाज्यांवर माश्या, तर रात्री झोपताना मच्छर त्रास देऊ लागले आहेत. उन्हाळ्यात त्यांची संख्या झपाट्याने वाढते. त्यामुळे फक्त फळे खराब होत नाहीत, तर रोगदेखील पसरतात. त्यामुळे माश्यांना फळांच्या टोपलीपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्या पद्धतींचा उपयोग करून बघू शकता…

व्हिनेगर वापरा – व्हिनेगरमध्ये कापसाचा बोळा बुडवून कोणत्याही प्लेट, वाटी किंवा फळे असलेल्या टोपलीच्या कडांना लावा. वासाने माश्या दूर राहतील. त्याचबरोबर स्वयंपाकघरात फळांपासून माश्यांना दूर ठेवण्यासाठी लिंबाचे तुकडे पाण्यात उकळवा. ते सिंकमध्ये ओता आणि बेकिंग सोडा व व्हिनेगरही टाका. त्यामुळे फळांजवळ माश्या जमण्यापासून नियंत्रण ठेवता येईल.

स्वयंपाकघर आणि घरापासून माश्या दूर ठेवण्याचे सोपे मार्ग…

  • जास्त पिकण्यापूर्वी साठवता येणारी फळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
  • फळे आणि भाज्या घरी आणल्यानंतर त्यांना स्वच्छ धुऊन घ्या.
  • तुमच्या सिंकचे ड्रेन स्वच्छ ठेवा. कारण- माश्या तिथे जास्त प्रमाणात फिरू शकतात.
  • कचराकुंडी नियमितपणे स्वच्छ ठेवा.
  • स्पंज, वाइप्स आणि कापड वेळोवेळी बदला.
  • भांडी ताबडतोब धुवा, विशेषतः वाइन किंवा ज्यूसचे ग्लास.

१. एक वाटी तयार करा

एका बरणीत किंवा वाटीत खराब झालेल्या फळांचे तुकडे ठेवा. त्यानंतर त्या बरणीच्या वर सेलोफेन (प्लास्टिक शीट) लावून रबर बँडने घट्ट बांधा. मग टूथपिकने त्या सेलोफेनमध्ये छोटे-छोटे छिद्र करा. वास येऊन माशा त्या छिद्रातून आत जातात, यामुळे माश्या अडकतात.

२. वाइन ट्रॅप बाटली बनवा

उरलेली वाइनची बाटली घ्या. ती ग्लास किंवा बरणीत ओता आणि बाहेर ठेवा. त्यानंतर वरून सेलोफेन (प्लास्टिक शीट) लावून रबर बँडने घट्ट बांधा. मग टूथपिकने त्या सेलोफेनमध्ये छोटे छिद्र करा. वाइनचा वास येऊन माशा त्या छिद्रातून आत जातात. पण, पुन्हा बाहेर येणे त्यांना कठीण जाते. त्यामुळे माश्या ग्लास किंवा बरणीत अडकतात.

३. ॲपल सायडर व्हिनेगर आणि डिश सोप वापरा

एका ग्लासमध्ये ॲपल सायडर व्हिनेगर घाला आणि डिश सोपचे काही थेंब घाला. जेव्हा माश्या त्या द्रवावर (लिक्विडवर) बसतात, तेव्हा त्या द्रवाचा पृष्ठीय ताण (वरचा पातळ थर) तुटतो. त्यामुळे माश्यांना आधार मिळत नाही आणि त्या द्रवामध्ये खाली पडतात