How To Build Habit Of Drinking Green Tea Daily: वाईट सवयी सोडणे आणि चांगल्या सवयी स्वतःला लावणे नेहमीच कठीण जाते. त्यामुळे अनेकदा आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून अशा गोष्टी कराव्या लागतात ज्या आपण कधीच केलेल्या असतात. त्यातील एक म्हणजे ग्रीन टी पिणे होय. पण, चहा किंवा कॉफी पिणाऱ्यांना ही सवय स्वतःला लावणे एका आव्हानापेक्षा कमी नाही आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही सवय स्वतःला कशी लावून घ्यावी.
तेव्हा आज आपण फक्त ग्रीन टीचे फायदेच नाही, तर ग्रीन टी पिण्याची सवय कशी लावून घ्यायची याबद्दलसुद्धा सांगणार आहोत.
दररोज ग्रीन टी पिण्याचे आरोग्यदायी फायदे (Green Tea Health Benefits)
१. जास्त अँटिऑक्सिडंट्स – ग्रीन व ब्लॅक टी दोन्ही एकाच वनस्पतीपासून येतात. पण, त्यांच्या पानांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते. ग्रीन टीमध्ये ब्लॅक टीप्रमाणे ऑक्सिडेशन होत नाही आणि त्यामुळे वनस्पतीमधील आरोग्यदायी अँटीऑक्सिडंट्सचे चांगल्या रीतीने जतन होते ; असे हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील पोषण तज्ज्ञ व सहायक प्राध्यापक टेरेसा फंग स्पष्ट करतात.
२. हृदयरोगाचा धोका कमी – चहामध्ये पॉलीफेनॉल असतात, जे एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असते आणि ते ऑक्सिडेटिव्ह तणावापासून आपले संरक्षण करते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी करते.
३. रक्तातील साखरेचे नियमन – ग्रीन टी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करू शकते. २०१९ मध्ये २७ अभ्यासांच्या विश्लेषणात असे आढळून आले की, अल्पकालीन आणि दीर्घकालीन ग्रीन टीचे सेवन उपवासाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करते.
४. दात किडण्यास प्रतिबंध – ग्रीन टी प्यायल्याने दात किडण्यास प्रतिबंध होतो. कारण- त्यात नैसर्गिकरीत्या फ्लोराईड असते.
५. वजन कमी करण्यास मदत – हार्वर्ड हेल्थच्या मते, ग्रीन टीमध्ये आढळणारे कॅफिन आणि कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स चयापचय क्षमता वाढवू शकतात. त्यामुळे वजन कमी करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.
ग्रीन टी पिण्याची सवय कशी लावायची (How To Build Habit Of Drinking Green Tea Daily)
१. अलार्म सेट करा- अरे यार, मी विसरलो, असे आपण अनेकदा म्हणून मोकळे होतो. तर यावर मार्ग म्हणून तुम्ही तंत्रज्ञानाची मदत घ्या. एक कप ग्रीन टी पिण्याची आठवण करून देण्यासाठी तुमच्या फोनवर अलार्म सेट करा. एकदा सवय झाली की, आठवण करून देण्यासाठी तुम्हाला अलार्मची गरज भासणार नाही.
२. वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करा- बऱ्याच लोकांना ग्रीन टीची चव आवडत नाही आणि म्हणूनच ते पिण्यास नकार देतात. पण, तुम्ही ग्रीन टीमध्ये पुदिना, लिंबू, मध टाका आणि मग पिऊन पाहा.
३. ग्रीन टीचा सॅशे आजूबाजूला ठेवा- जर ग्रीन टी जवळपास नसेल, तर त्याचे सेवन करण्याचे तुम्हाला विस्मरण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ग्रीन टीचा सॅशे तुमच्या डेस्कवर किंवा तुमच्या बॅगेत ठेवा.
४. तुमचे विचार बदला- कधी कधी मानसिकतेतील एक साधा बदल सर्व फरक निर्माण करतो. ‘ग्रीन टी पिणे’ याकडे कंटाळवाणी कृती म्हणून पाहू नका. त्याऐवजी त्याकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघा आणि कामातून छोटासा ब्रेक घेऊन ग्रीन टी प्या. म्हणजे तुम्हाला दररोज ग्रीन टी पिण्याची सवय लागेल.
५. संयम बाळगा- सर्व चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी वेळ लागतो,. किमान या बाबतीत तरी. तुम्ही व्यग्र असल्याने विचलित झाल्यामुळे किंवा मन नसेल म्हणून एक किंवा दोन दिवस ग्रीन टी पिण्याचे विसरल्यास काही हरकत नाही. पण, ग्रीन टी पिण्याची सवय स्वतःला लावूनच घ्या.