जर तुम्हाला दररोज कमी झोप मिळत असेल किंवा तुम्ही मध्यरात्रीपर्यंत जागे राहत असाल, तर सुरुवातीला तुम्हाला कदाचित कोणतीही लक्षणे जाणवणार नाहीत; पण ही सवय हळूहळू तुमच्या मेंदूला कमकुवत करत असते. खरे तर, झोपेच्या कमतरतेमुळे तुमचा मेंदू केवळ थकत नाही, तर त्याची कार्य करण्याची क्षमताही कमी होते. फोर्टिस हॉस्पिटल, नोएडा येथील वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजिस्ट आणि युनिट हेड डॉ. नेहा पंडिता म्हणतात की, झोपेच्या वेळी मेंदू माहितीवर प्रक्रिया करतो, आठवणी पक्क्या करतो आणि निर्णय घेण्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सांभाळतो. पण जेव्हा तुम्हाला सातत्याने झोप मिळत नाही, तेव्हा त्याचा तुमच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अलीकडे झालेल्या संशोधनानुसार झोपेची कमतरता मेंदूवर मद्याच्या प्रभावाप्रमाणे काम करते, असे उघड झाले आहे.

झोपेच्या कमतरतेचा मेंदूवर कसा विपरीत परिणाम होतो?

लक्ष्यावर होणारा परिणाम :

झोपेच्या कमतरतेचा परिणाम प्रामुख्याने लक्ष्यावर होऊ शकतो. पुरेशी झोप न मिळालेल्या व्यक्तींना लक्ष केंद्रित करणे आणि सातत्याने योग्य प्रतिसाद देणे कठीण जाते. तुम्ही दैनंदिन कामे पूर्ण करू शकत असलात तरी तुमचे लक्ष सहज विचलित होऊ शकते. अशा परिस्थितीत, व्यक्तीला कामे करण्यास आपण सक्षम आहोत, असे वाटू शकते; परंतु नेहमीपेक्षा जास्त किरकोळ चुका होऊ शकतात. म्हणजे एक प्रकारे मेंदूमध्ये जमा झालेला कचरा स्वच्छ करण्याचे कामच आपण झोपेत असताना होत असते. पण, सातत्याने अपुरी झोप घेतल्यामुळे हे काम व्यवस्थित होत नाही आणि मेंदूवर त्याचा वाईट परिणाम होत जातो. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कोणतीही हयगय नको, असं त्यांनी सुचवलं आहे.

सतत चिडचिड होणे

अनेक रात्री झोप नीट न झाल्यास, लोक अगदी लहानसहान गोष्टींवरूनही अधिक अस्वस्थ होऊ शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे भावना हाताळण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे लोक अधिक चिडचिडे किंवा कमी सहनशील बनतात. याचा अर्थ असा की, कधी कधी ज्याला आपण ‘वाईट मनःस्थिती’ म्हणतो तो प्रत्यक्षात मेंदूने पुरेशी विश्रांती न घेता, काम केल्याचा विपरीत परिणाम असतो.

माहितीपूर्ण निर्णय घेण्यास असमर्थता

झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. जेव्हा मेंदूला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा माहितीपूर्ण निर्णय घेण्याच्या, समस्या सोडवण्याच्या आणि स्पष्टपणे विचार करण्याच्या त्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

किती झोप आवश्यक?

डॉ. नेहा पंडिता म्हणतात की, झोप म्हणजे केवळ काम आणि जागे होण्यामधला वेळ नव्हे. हा तो वेळ आहे जेव्हा मेंदू दुसऱ्या दिवसाच्या कामासाठी स्वतःला तयार करतो. त्यामुळे जरी प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असल्या तरीही प्रौढांसाठी साधारणपणे सात किंवा अधिक तास झोपेची शिफारस केली जाते. कारण- झोपेची नियमितता आणि गुणवत्तादेखील महत्त्वाची आहे.