Spicy Food Side Effects : बरेच लोक त्यांच्या जेवणात गरजेपेक्षा जास्त मसाले वापरतात. त्यांना मसाल्यांशिवाय जेवण बेचव वाटते. पण, तुम्ही तिखट, मसालेदार खाण्याच्या नादात तुम्ही तुमच्या आतड्यांच्या आरोग्याला धोका पोहचवत आहात. त्यामुळे कोणते मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, कोणी टाळावे याने आरोग्यावर काय परिणाम होतात याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेऊ…
एका वृत्तसंस्थेशी बोलताना एम्स दिल्ली येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागातील डॉ. अनन्या गुप्ता यांनी सांगितले की, मसालेदार पदार्थ आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात; पण ते फक्त जास्त प्रमाणात सेवन केले तरच. अति मसालेदार पदार्थ खाण्यामुळे आतड्यांच्या अस्तराला इजा होऊ शकते, जी अनेकदा लक्षात येत नाही. सुरुवातीला यामुळे छातीत जळजळ, गॅस व आम्लपित्त अशी लक्षणे जाणवतात; पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि हळूहळू ती एक मोठी समस्या बनते.
आयबीएसपासून ते अल्सर अशा गंभीर आजारांचा धोका
डॉ. गुप्ता स्पष्ट करतात की, जे लोक दररोज किंवा आठवड्यातून तीन ते चार दिवस मसालेदार पदार्थ खातात, त्यांना काही वर्षांत अल्सरपासून इरिटेबल बाऊल सिंड्रोम (आयबीएस ) अशा विविध आजारांची लक्षणे जाणवू शकतात. या दोन्ही समस्या आतड्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. मसालेदार पदार्थांमुळे आतड्यांच्या अस्तराला इजा झाल्याने अल्सर होतो. मसालेदार पदार्थांमुळे पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो आणि त्यामुळे आयबीएस होतो; पण प्रत्येकाची सहनशीलता वेगवेगळी असते. काही लोक मसालेदार पदार्थ सहज पचवू शकतात; तर काहींना अगदी कमी प्रमाणात खाल्ल्यावरही त्रास होतो. त्यामुळे आपल्या शरीरातील ही लक्षणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर नेमका काय त्रास होतो?
१) पोटदुखी
२) आतड्यांमध्ये जळजळ
३) उलट्या आणि जुलाब
४) खशाजवळ जळजळ होणे
५) अॅसिडिटी
६) पोटात भरल्यासारखे वाटणे
७) पोट साफ न होणे
८) भूक न लागणे
कोणी मसालेदार पदार्थ खाऊ नयेत?
डॉ. गुप्ता सांगतात की, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असल्यास, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे किंवा दर दोन महिन्यांतून एकदाच मसालेदार पदार्थ खावा. मात्र, जर तुम्हाला या समस्या जाणवत नसतील, तर तुम्ही असे पदार्थ माफक प्रमाणात खाऊ शकता; पण, ज्यांना पोटाचे काही आजार आहेत, त्यांनी मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
